Friday, May 29, 2020

भ्रमंती - अंदमान सफर

अंदमान सफर - एक समृद्ध अनुभव.

२/३ वर्षांच्या विश्रांती नंतर आम्हां मित्र मंडळींच्या या वर्षी  फिरायला कुठे जावं या चर्चेत अंदमान वर एकमतानं शिक्कामोर्तब झालं. प्रवासाची  तिकीटस्, हॉटेल बुकिंग्ज वगैरे  प्राथमिक फेरीचे सोपस्कार पूर्ण झाले आणि आम्ही थोडे निश्चिंत झालो. माझ्या मनात पर्यटनाच्या आनंदा बरोबरच  अंदमानचा नितांतसुंदर  निसर्ग , स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोठडीचं दर्शन, या बेटांचा आपल्या पासून भौगोलिक आणि शासकीय दृष्ट्या असलेला दूरस्थपणा , तांत्रिकदृष्ट्या सुधारणांचा अभाव, त्सुनामीचे दूरगामी परिणाम अशा अनेक उत्सुकतांच्या संमिश्र भावना दाटल्या होत्या.  अजून एक  आकर्षण होतं ते म्हणजे राजधानीचं शहर असलेलं पोर्ट ब्लेअर बंदर !     या बंदराचं भारताच्या  सामान्य जीवनाशी असलेल्या तुटलेपणा विषयी वाचून होते. आणि म्हणूनच ते पहाण्याची मनात खूप उत्सुकता होती.

अंदमानचं बोलीभाषेतलं स्थानिक रुढ नाव अंडमान आहे. अंदमान हा एक द्विपसमूह आहे. भारताचा केंद्रशासित प्रदेश म्हणून अंदमानचे पालकत्व भारताकडे आहे. पण भौगोलिकदृष्ट्या हे बेट भारताच्या सीमेपासून खूप दूर आहे. इतके की तिथल्या आणि आपल्या सूर्योदय - सुर्यास्ताच्या वेळेतही खूप फरक आहे. सकाळी ५/५:३० ला चांगलं उजाडलेलं असतं व संध्याकाळी ५:१५/५:२० ला सूर्यास्त  झाला की ५:३० ला सगळीकडे अंधाराचं साम्राज्य पसरलेलं असतं. त्यामुळे हॉटेल मधली खाद्यसंस्कृती ९:३० ला च बंद होते. इथली माणसं निसर्गाच्या कलाकलानी जगणारी, त्याचे नियम पाळणारी आहेत. निसर्गाला  नमवणारी नाहीत.  एकूणच जनजीवनाचा वेग स्वभावत:च मंद आहे. त्या वेगाशी आपल्याला जुळवून घ्यावं लागतं. इथे ऐहिक श्रीमंतीच्या तुलनेत निसर्गाची अमाप श्रीमंती आहे. लौकिक दृष्टीने श्रीमंत कुटुंबसमूहातील एखादे कुटुंब आचार विचार आणि मूल्यांची जपणूक करणारं परंतू  तुलनेनं कमी श्रीमंत असेल तर त्यांचा बाणेदारपणा जसा चारचौघांमध्ये  उठून दिसतो  त्याचा मला इथे भास जाणवला. आमच्या गाईडने पहिल्याच दिवशी सांगितलं की इथे गरीबी असली तरी सर्व लोकं कष्ट करून खातात, इथे एकही भिकारी दिसणार नाही. आणि खरोखरच आमच्या मुक्कामात आम्हाला एकही भिकारी दिसला नाही. थर्मास मधून हिंडून  चहा/ कॉफी विकणं , फळं विकणं ही कामं आणि अशी अनेक कामं  पुरुषांच्या बरोबरीने बायकाही करताना दिसत होत्या.   एकदा एका बेटावरील  रिसॉर्टमध्ये एका मुलाला मी , इथे  इंटरनेट सेवाच  नाही तर तुम्ही कसे काय व्यवहार करता बुवा ? असं भाबडेपणाने  विचारल्यावर " अच्छा है नं, इधर का नेचर, पौधे , पंछी, जानवर  सब अच्छे रहते है. इंटरनेट टॉवर की वजह से नेचर और सब पर गंदा असर होता है न , हमे आदत हो गयी है " अशी एक बाणेदार चपराक मला त्या रिसॉर्टच्या मुलाने दिली. मी अवाक झाले. हाच तो स्वाभिमानाचा भास !

अंदमान ला जाताना प्रत्येक भारतीयाची पहिली ओढ ही सावरकर स्मारक पहाण्याची असते. पोर्ट ब्लेअरलाच हे राष्ट्रीय स्मारक आहे. राष्ट्रीय स्मारकाच्या तुलनेत पर्यटकांच्या दृष्टीने व्यवस्थापन व  स्वयंस्पष्टतेचा थोडा अभाव जाणवला. सावरकरांच्या कोठडीत बाहेर भाऊगर्दी असतानाही दोन घटका निवांत बसता आलं, " ने मजसी ने " या गीताने आदरांजली वाहता आली याचं आत्मिक समाधान आम्हां सर्वांना नक्कीच आहे. बाकी स्मारक छान आहे.  पर्यटकांचं दुसरं आकर्षण म्हणजे इथला निसर्ग अर्थात वेगवेगळे समुद्र किनारे. तिथलं सुरक्षाव्यवस्थापन मात्र वाखाणण्या सारखं आहे. प्रत्येक किनाऱ्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पाण्यात जाणारे पर्यटक, बोटचालक , हवामानात होणारे तात्कालिक बदल यावर त्यांची बारीक नजर असते  व त्याबाबत माईकवरून सतत सूचना ही दिल्या जातात. अंदमानला पर्यटक खास करून हॅवलॉक , रॉस व नील आयलंडस् ना भेट देतात. रॉस आयलंड वर मुक्तपणे विहरणारे  प्राणी, पक्षी आणि त्यांच्याशी आणि आपल्याशी ही  संवाद करणाऱ्या अनुराधा ताई हा अतिशय सुंदर अनुभव आहे.सर्वदूर दिसणारी  हिरवीगार वनश्री आणि निळाशार समुद्र मन मोहून टाकतो. बऱ्याचशा रिसॉर्टमध्ये खाजगी किनाऱ्याचीही  सोय असते. त्यामुळे निळ्याशार अथांग जलाशयासमोर बसून आपापल्या आवडीप्रमाणे वेळ घालवण्याचा आनंद घेता येतो. 

इथल्या सेवा सर्वसाधारणपणे महाग आहेत. कारण इथल्या व्यावसायिकांना सर्व गोष्टींसाठी कलकत्ता , मद्रास , विशाखापट्टणम या शहरांवर अवलंबून रहावे लागते. सर्वसाधारणपणे खाद्यसंस्कृती थोडी बेतानेच दिसली. ताजे पदार्थ बनवून देण्याच्या हातगाड्या ही पद्धत फारशी दिसली नाही. नारियल पानी, फ्रूट डिश , क्वचित कुठे भेळ वगैरे आणि चहा/ कॉफी ती देखिल थर्मास मधे .... मिळते. गरमागरम भजी / समोसे / अमृततुल्य वगैरे सर्व  फक्त बीच परिसरात दिसून आलं. एकूण जनजीवन शांत, सुशेगाद वाटलं. इथे प्रगत तंत्रज्ञानाचा वेग मोठ्या शहरांच्या तुलनेत कमी आहे. सरकारी इमारतींवर  " शासकीय " ऐवजी 
" राजकीय " असा उल्लेख बघून मजा वाटली. काही बीच व आयलंडस् वर त्सुनामीच्या खुणा बघून मन गलबलून जातं.

 मूळ प्रवाहापासून तुटलेपण म्हणजे काय आणि त्यात स्वत:ला निभावणं म्हणजे काय , ही क्रांतीवीरांची भावना समजून घ्यायची असेल तर ऐहिक सुखाच्या मागे धावणाऱ्या आणि नविन तंत्रज्ञानाच्या वेगात होसपटणाऱ्या आपल्या सारख्या  जीवांनी अंदमानची सफर एकदा तरी  करावीच ! 

उत्सुकतांची सगळी गाठोडी मोकळी झाली होती . तिथल्या वातावरणातली शांत निळाई आणि  निसर्गसमृद्ध अनुभव घेऊन आम्ही सारे तृप्त मनाने  परतलो.


©️ ॲड.स्वाती लेले
अलिबाग - रायगड



  



Tuesday, May 12, 2020

देवाज्ञा...कैवल्याचे चांदणे

कैवल्याचे चांदणे .....

२२ ऑगस्ट २०१८ ला माझ्या सासूबाईंना देवाज्ञा झाली . गेले काही महिने त्यांच्या भोवती सुरु असलेला दिनक्रम अचानक थांबला आणि आठवणींचं मोहोळ उठलं . १९८१ साली लग्न होऊन मी या घरात आले . तेव्हापासून आज ३७ वर्षांचा माझा त्यांच्या बरोबर सहवास झाला . त्यांच्या विषयीच्या मनातल्या  भावना / आठवणी या लेखातून व्यक्त करणे एवढाच या लेखाचा प्रांजळ हेतू आहे  . 

पूर्वाश्रमीच्या सुधा भिकाजी भिडे लग्नानंतर सुमती पद्माकर लेले झाल्या. भिडे घराणं मुंबईचं तर लेले घराणं अलिबागचं ! मुंबई महानगरी तर तुलनेने अलिबाग निमशहर !   दोन्ही शहरांचा  प्रादेशिक आब सोडला तर  लौकिक धन, विचारधन, बुध्दीमत्ता या सर्वच दृष्टीने दोन्हीही घराणी समसमान ! लग्नापूर्वी इंटर आर्टस पर्यंतचं  कॉलेजच शिक्षण त्यांच विल्सन कॉलेजला  झालं . अलिबागच्या घरात पुढील शिक्षण पूर्ण करायला मुभा होती किंबहुना त्यांच्या सासऱ्यांची तशी इच्छाच होती. नंतर रुइया कॉलेज मधून त्यांनी बी . ए .केलं . बी .ए . झाल्यावर अलिबागला को. ए .सो. च्या शाळेत नोकरी सुरु झाली. . यथावकाश त्यांनी मुंबई  एस .एन .डि .टी . मधून बी .एड . व पुणे विद्यापीठातून एम .एड . केलं . साधारण २५ वर्ष शिक्षणसेवा केली. या काळात त्यांनी थळ व खंडाळा येथील शाळांमध्ये  मुख्याध्यापकपदाची धुरा सांभाळली. त्यांचा आवाज चांगला होता व लग्नापूर्वी त्यांच्या गाण्याच्या थोड्या परीक्षाही झाल्या होत्या . गाण्याचं पुढचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांच्या सासूबाईंनी पाठिंबा दिला आणि त्यांच संगीत विशारद पूर्ण झालं . या कामी सुरुवातीचं संगीत शिक्षण नव्याने सुरु करताना त्याना अलिबागच्या वाखारकर बाई व उकिडवे बाई यांनी खूप सहकार्य केलं अस त्या आवर्जून सांगत .सुप्रसिद्ध गायिका सरला भिडे , मुक्ता भिडे या त्यांच्या चुलत बहिणी तर माणिक भिडे चुलत वहिनी  व विदुषी आश्विनी भिडे देशपांडे त्यांची भाची ! अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे शास्त्रीय संगीताचे रितसर  क्लास त्यांनी अलिबागमधे सुरु करुन हाच संगीताचा वारसा पुढे चालू ठेवला . जवळजवळ ३०/३५ वर्ष त्यांनी क्लास चालवले .त्यांचे अनेक  विद्यार्थी संगीत क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत . अलिबागला श्वेता कारभारी या त्यांच्या क्लासच्या आता उत्तराधिकारी म्हणून चांगली धुरा सांभाळत आहेत .
अलिबागच्या वीणा भजनी मंडळात त्यांनी हार्मोनियमची साथ अनेक वर्ष केली . क्वचितप्रसंगी त्या तबल्याची साथही करत असत. मंडळात त्या अनेक पदं म्हणत . मला स्वत:ला त्यांचं " वृंदावनी वेणू वाजे  " खूप आवडायचं . त्यांना दिलरुबाही वाजवता येत असे . आमच्याकडे एक दिलरुबाही  होता .दत्त मंदिर देवस्थानच्या त्या १२/१३ वर्ष अध्यक्ष होत्या. त्यांच्या कालावधीतच देवळाचा जीर्णोद्धार झाला .शाळा , क्लास , भजनी मंडळ या सर्वच ठिकाणी त्या लेलेबाई म्हणूनच ओळखल्या जायच्या. माझे सासरे सुद्धा त्यांना " लेलेबाई "नावानेच हाक मारत ! नातवंडां मुळे मात्र  आम्हां कुटुंबियांमध्ये त्या सर्वांसाठी  "आबी "  होत्या .

स्वभाव मुळातच शांत ! क्लास किंवा शाळे मधले विद्यार्थी असोत किंवा भजनी मंडळातील भगिनी असो चुकलेली गोष्ट समजावून सांगण्याकडेच कल असायचा. शाळेत इंग्लिश ,गणित , भूगोल , संगीत हे त्यांचे खास विषय असत . त्यातही गणितावर विशेष प्रभूत्व होतं . 

निसर्गत:च त्यांची प्रकृती राजस !  त्यामुळे तामसी खाणं त्यांना विशेष रुचत नसे .  दुधी , पडवळ , भोपळा, गवार ,ताकातली पालकाची भाजी या भाज्या, सर्व कोशिंबीरी  विशेष आवडायच्या . दुधीच्या भाजीला त्या सुकुमार भाजी म्हणायच्या .सर्व प्रकारची फळं ,सुकामेवा आवडत असे .दही आणि दह्याचे पदार्थ हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय ! पाककृतींमध्ये दुधी हलवा , सुरळीची वडी , दही वडा , मोदक ,कणसाची मसालाभाजी सुंदर करत असत .

लांब घनदाट केसांची निसर्गदत्त देणगी त्यांना लाभली होती. शाळेतल्या नोकरीच्या काळात त्या इंग्रजी 8 आकाराचा अंबाडा घालत असत . पण अलिकडे काही वर्षं  पांढऱ्या केसांची लांबसडक वेणी ही  व्यकिमत्वाची खास ओळख म्हणता येईल. केसांच्या निगराणीसाठी कायम शुध्द खोबरेल तेलाचाच वापर केला .

आमच्या अंगणात पूर्वी सकाळी पुरुष व संध्याकाळी महिला असा रितसर बॅडमिंटन क्लब चालत असे . भगिनीवर्गात त्या बॅडमिंटनही खेळायच्या . पत्ते आणि क्रिकेटची मॅच बघणे हे आवडीचे खेळ. मनोरंजनासाठी पेपर वाचन , शब्दकोडे - सुडोकू सोडवणे , चायनीज कोडे , अवांतर वैचारिक वाचन , टिव्ही , इत्यादी गोष्टी आवडायच्या .

या व्यतिरिक्त शिवण , वीणकाम , या गोष्टींवर सफाई होती . दोन सुयांवरील  वीणकामात विशेष गती होती . लोकर आणून दिल्या पासून अगदी कमी कालावधीत सेट तयार होत असे . 

माझे सासरे  जिल्हा होमगार्ड कमांडंट होते . त्या सहयोगातून होमगार्ड संघटनेतही त्यांचे योगदान होते . अलिबाग नगरपालिकेच्या त्या सदस्यही होत्या . हौशी नाटकां मधूनही  त्यांनी काम केले होते . शाळा , भजनी मंडळ , ट्रॅव्हल कंपनीच्या माध्यमातून जवळजवळ भारतभ्रमण झाले होते .चारधाम , नर्मदा परिक्रमा , काशीयात्रा या विशेष पण कठीण अशा यात्रांचा योगही त्यांनी साधला होता. योग्य ठिकाणी दानधर्म करण्याची त्यांना आवड होती .

निवृत्तीनंतर विशेष करुन त्यांनी गाण्याचे क्लास , दत्तमंदिर सेवा , वीणा भजनी मंडळ यात स्वत:ला गुंतवून घेतले होते .  रोजच्या जीवनातलं त्यांचं वागण म्हणजे जणू पाण्यातलं लोणीच !  पाण्यापासून अलिप्त पण तुम्ही स्पर्श केलात तर मधुर चव मिळेल .निरलसपणे कसं जगावं , कशातही अवास्तव न गुंतता कसं  रहावं  , अविचार नाही आणि अति विचार नाही याचा त्या वस्तूपाठ होत्या .

कौटुंबिक पातळीवर नातवंडे / पणतवंडे यांच्या सहवासाने त्या समृद्ध होत्या .

ईश्वर आणि ईश्वरी योजना यावर त्यांचा गाढ विश्वास होता . गेले काही महिने श्वसनाच्या विकाराने त्यांना हैराण केले होते.  दोन महिन्यांपूर्वी माझ्याकडून कॅलेंडर घेउन आषाढी एकादशी कधी आहे ते पाहिले होते . अजून त्यांनी काय हेरलं होतं कळायला मार्ग नाही . पण दिवसेंदिवस प्रकृती खालावत होती व औषधोपचारांचा म्हणावा तसा फायदा दिसत नव्हता .

२१ ऑगस्टला माझ्याकडे मंगळागौरीचा कार्यक्रम होता . त्या आधी आठवडाभर त्यांनी मला व माझ्या मिस्टरांना २१ ता.चा कार्यक्रम पुढे ढकलावा असं सूचित केलं . त्याप्रमाणे आम्ही पूर्वनियोजित कार्यक्रमाचे स्वरुप बदलून अगदी घरगुती स्वरूपात करायच ठरवलं . पण आत्तापर्यंतच्या दुखण्यां मधे त्यांनी दाखवलेली उमेद आता कमी पडत्ये हे जाणवत होतं . नकारात्मक विचार दिसू लागले होते.

जन्मत:च घेउन आलेले 'सुधा'मृत सु ' मती ' ने आतापर्यंत अनेकांना देउन झाले होते .

 आता मोक्षाची आस लागली होती. गेल्या आठ दिवसांपासूनच त्यांनी भैरवीसाठी तानपुरा लावायला घेतला होता . आम्ही त्यांना त्यापासून परावृत्त करण्याचा निष्फळ  प्रयत्न करत होतो पण त्यांनी मनातून वेळ निश्चित करून ठेवली असावी . २१ ऑगस्टच्या मध्यरात्रीच त्यांनी भैरवी आळवायला सुरुवात केली ती २२ तारखेच्या सूर्योदयानंतर  मैफिल संपली .

कैवल्याच्या चांदण्याला आसुसलेला चकोर " चंद्र व्हा हो पांडुरंगा "  म्हणत श्रावण शु . एकादशीला कैवल्यधामाकडे  मार्गस्थ झाला .

ईश्वरेच्छा बलियेसी !!!

प्रणाम !!!

©️स्वाती लेले 
अलिबाग .
मो . 9923885500

देवाज्ञा... यशवंत देव

देवाज्ञा...

आज सकाळीच मोबाईल बघितला आणि पं . यशवंत देवांच्या दुख:द निधनाची बातमी कळली .  मन सुन्न झालं .लहानपणापासून ऐकलेल्या त्यांच्या अनेक गाण्यांनी मनात ताल धरला . सर्वच गाणी सर्वोत्तम- एकाच नाव घ्याव तर दुसऱ्यावर अन्याय होईल इतकी मधुर , गोड , श्रवणीय ! 

१ नोव्हेंबर १९२६ रोजी रायगड जिल्ह्यातील पेण गावात या देव माणसाचा जन्म झाला . ते जात्याच गुणवंत , कलावंत , विचारवंत , ज्ञानवंत आणि म्हणूनच शब्द - सुरांचे प्रत्यक्ष ' यशवंत ' ' देव ' ! 

कळत्या - नकळत्या वयाच्या उंबरठ्यावर उभं असल्यापासून आकाशवाणीच्या माध्यमातून यशवंत देवांच्या गाण्यांची ओळख होत गेली . १९७० च्या दशकात आकाशवाणीने मराठी संगीतप्रेमींना उदंड श्रवणानंद दिला - त्या पिढीची मी प्रतिनिधी ! आकाशवाणीच्या समृद्ध मराठी गीतांच्या कार्यक्रमातला ' भावसरगम ' हा असाच एक ' देवस्पर्शी ' कार्यक्रम. सुगम संगीताची मधुर धारा चोहोबाजूंनी अक्षरश: बरसत होती . गीतकार , संगीतकार , गायक /गायिका सर्वांच्याच  स्वरांचं , शब्दांच , देवांनी शब्दशः सोनं केलं . पण तरीही मंगेश  पाडगावकर ,अरुण दाते , आणि यशवंत देव या त्रिगुणात्मक त्रयीने मराठी सुगम संगीताच्या शिरपेचात  अनेक नवे तुरे खोवले . बाबूजी , आशा भोसले , लतादीदी, सुधा मल्होत्रा ,सुमन कल्याणपूर ,रविन्द्र साठे , सुरेश वाडकर ,रंजना जोगळेकर यांच्या सारखे गायक तसंच गदिमा , वसंत बापट , कुसुमाग्रज ,सुधीर मोघे ,वंदना विटणकर असे अनेक गीतकार , तसंच प्रभाकर जोग , मिलिंद जोशी  ,बाबूजींसारख्या संगीतकारांच्या विश्वात देवांच संगीत व काव्यप्रतिभा खऱ्या अर्थानं  बहरत गेली फुलत गेली . 
स्वर आले दुरुनी , जीवनात ही घडी , शुक्रतारा मंद वारा , येशील येशील राणी , कधी बहर कधी शिशिर , प्रिया आज माझी , दिल्या घेतल्या वचनांची , तुझ्या चंद्रशाळेत नेशील का रे , तुझे गीत गाण्यासाठी, या जन्मावर , अशी एका पेक्षा एक सुरेल सरस गाण्यांची त्यांनी निर्मिती केली .

यशवंत देवांनी  शब्द - सुरांना कुरवाळत ज्या रचना स्वरबद्ध केल्या त्या सरळ , साध्या ,सोप्या शब्दप्रधान होत्या . आणि म्हणूनच त्यांच्या हाती आलेली सगळी शब्द लेणी सुरांच्या धुमाऱ्यानी तेजाळली . अजिबात विसरता न येणारं '' विसरशील खास मला ' हे गीत त्याचं उत्तम उदाहरण आहे . आज पाच दशकांहून अधिक काळ त्यांची गीतं रसिकांच्या ह्रदयावर अधिराज्य करत आहेत . सुगम संगीतातल्या ' भावा ' इतकाच कुठे शोधिसी रामेश्वर  , हे आदिमा हे अंतिमा ,कोटि कोटि रुपे तुझी अशा  काही रचनांमधून त्यांचा  चिंतनशील आध्यात्मिक पिंडही दिसतो . ओशोंच्या सानिध्यात आल्यानंतर त्यांनी स्वतः काही स्वतंत्र हिंदी रचना करुन त्या स्वरबद्ध केल्या .

सुरांचं साम्राज्य निर्माण करताना ' शब्द ' हा ब्रह्मस्थानी आहे या विचारधारेचे ते प्रथम उद्गाते ! या मध्यवर्ती भूमिकेवर ठाम राहूनच त्यांनी अनेक अनवट सुरावटींची निर्मिती केली . भावगीतातला भाव कटाक्षाने जपला जाईल याची कायम काळजी घेतली.  शब्दप्रधान गायकीच्या कार्यशाळेचा उगम यातूनच झाला . या माध्यमातून अनेक उभरत्या कलाकारांना या ' देवाचे ' आशीर्वाद मिळाले .

त्यांच्या लेखणीने अनेक अजरामर गीतं लिहिली तसच कृतज्ञतेच्या सरी ,रियाजाचा कानमंत्र , शब्दप्रधान गायकी , पत्नीची मुजोरी अशी काही पुस्तकेही लिहिली. पत्नीची मुजोरी मधे त्यांच्यातला मिश्किल , खट्याळ स्वभावही दिसतो . याच पुस्तकातली ' मी शिवाजी ' ही कविता कोणत्याही काळाला पूरक वाटते .

लग्नानंतर मी मुंबईहून अलिबागला आले . संसारसंगीता सोबत मनातल्या मनात इतर गाण्यां बरोबर देवगाण्यांची रुंजी चालू असे . अलिबागला त्यांचे खाजगी ,सार्वजनिक अनेक कार्यक्रम झाले . शब्दसुरांची प्रेमी म्हणून  त्या प्रत्येक कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित राहिले केवळ  देवदर्शनाच्या ओढीनं ! देवसरां नी सुरु केलेले सुगम संगीताचे क्लास कालौघात अलिबाग इथेही सुरु झाले . मंदार भिडे या शिष्योत्तमाने देवदूताची भूमिका बजावली व त्यांची देवगाणी आमच्यासारख्या नवशिक्यांपर्यंत पोचवली . आयुष्याच्या या टप्प्यावर देव असे गाण्यांमधून भेटण्याचा दैवी योग होता .

यशवंत देवांच संगीत म्हणजे पौर्णिमेच्या अर्ध्या रात्री उमलणारं  चंद्रविलसिनी ब्रह्मकमळच ! वाऱ्यावर डुलताना फुलणारं ते सहस्त्रदळ पाहणं , त्याचा पसरणारा मंद सुगंध अनुभवणं यातून मनाला जो ताजेपणा येतो तो ,  आनंद अवर्णनीय असतो . आज अनेकजण  या सुगंधात  परत हरवून गेले असतील .

देवांच्या शब्द सुरांच्या या अथांग सागरात कितीही डुबकी मारली तरी त्यांनी दिलेल्या अविनाशी अवीट संगीताचा अमाप ठेवा उरतोच .

गेले अनेक दिवस ते वेगवेगळ्या व्याधींशी सामना करत होते. पण या लढाईला अखेर यश यायचं नव्हतं . दोनच दिवसांनी येणारा त्यांचा वाढदिवस स्वर्गलोकात साजरा करण्याची ' त्या ' देवाची इच्छा असावी . परम ईश्वराने पं . यशवंत देवांना तशी ' देवाज्ञा ' दिली आणि ती शिरसावंद्य मानून ईहलोकावरील हा सर्वाथाने ' यशवंत ' देव आज  देवाघरी ' गेला .

ईश्वरेच्छा बलियसी ! 

प्रणाम !

©️स्वाती लेले 
अलिबाग 

माझिया मना ...होळी

हो ssss ली हो....

होळी , शिमगा आणि कोकण याच्या  अनेक रंजक गोष्टी लहानपणापासून ऐकल्या , वाचल्या होत्या पण अनुभवलेल्या नव्हत्या. तसं काही कारणही नव्हतं म्हणा ! मनात सुप्त इच्छा होती एवढीच ! इथे कोकण म्हणजे प्रामुख्याने रत्नागिरी असं समजायचं बरं का ! श्री देव भैरी बुवा , गावाच्या बारा वाड्या आणि समस्त रत्नागिरीकर यांचं एक वेगळं नातं आहे. मुंबईतला चाकरमानी सगळं काही बासनात बांधून ठेवून होळीला रत्नागिरीत हजर होणारच. माझ्या धाकट्या सुनेचं माहेर रत्नागिरीचं असल्यामुळे या वर्षी आम्हाला ही  होळी जवळून पाहण्याचा आणि तो माहोल अनुभवण्याचा योग आला. 

श्री देव भैरी व देवी जोगेश्वरी ( जुगाई ) यांची भेट हा सर्व उत्सवातला प्रमुख गाभा आहे . श्री देव भैरी बुवा हा सगळ्या गावाचं रक्षण करतो , आपल्या भक्तांच्या अडचणींचं निवारण करतो अशी सर्व ग्रामस्थांची गाढ श्रद्धा आहे. होळीच्या दिवशी रात्री बारा वाजता श्री देव भैरीची पालखी मोठ्या दिमाखात निघते. पालखी फुलं , हार यांनी सजवलेली असते.
होळीच्या दिवशी सकाळी श्री देव भैरीची मूर्ती पालखीत ठेवण्यात येते. मूर्ती सोन्याची असून  सुंदर सजवलेली असते. त्याला रूपं लावणं म्हणतात. या श्री भैरीला वेगवेगळ्या गावातून पालख्या येतात. काही भैरीच्या असतात तर काही जुगाईच्या असतात. रात्री या वेगवेगळ्या पालख्यांची वाटेत प्रेमाची भेट होते. ढोल ताशा च्या तालावर धुंद होऊन भाविक या पालख्या पुढे नेतात. भैरी व जुगाई हे पती पत्नी आहेत असा समज आहे. गावात असलेल्या जुगाईला भैरी वर्षभराने होळी पौर्णिमेला भेटायला जातो. तिथे ही पालखी २/३ तास थांबते. यावेळी भाविकांना  दर्शन घ्यायला परवानगी नसते.   पहाटे परत ही पालखी उठते व दुतर्फा उभ्य असलेल्या सुवासिनींकडून पूजा , आरती , मान घेऊन बारा वाड्यांचा मान घेऊन दुपारपर्यंत सहाणेवर जाऊन थांबते. दुसरीकडे होळीचं  प्रतिक म्हणून सुरमाड तोडण्याची तयारी चालू असते. तो तोडणे , त्यानंतर तो सर्व गावकऱ्यांनी वाहून नेणे या साठी वेगवेगळ्या ज्ञातींचे मानकरी ठरलेले आहेत. हे सर्व काम जोखमीचे असते. पण सर्व ग्रामस्थ ते प्राणपणाने व मोठ्या श्रद्धेने ते पार पाडतात. तोडलेला सुरमाड म्हणजेच होळी ठरलेल्या मार्गावरून मिरवत सहाणेवर नेऊन उभा करतात. पहाटे परत ही पालखी जुगाईच्या (जोगेश्वरीच्या)देवळातून निघून तिच्या ठरलेल्या मार्गाने ढोल ताशांच्या गजरात  मार्गात दुतर्फा पूजा आरती घेवून उभ्या असलेल्या सुवासिनींकडील मान घेवून ज्या ठिकाणी होळी असते तेथे येते.व होळी(सुरमाड)उतरे पर्यत तिथेच थांबते.सुरमाड उतरल्यानंतर(तोडल्यानंतर)तो सर्व ग्रामस्थ मिळून सहाणेपर्यंत उचलून नेतात.या होळीसोबतच पालखी सहाणेवर येवून स्थानापन्न होते.मग उचलून आणलेली सुरमाडाची होळी सहाणेसमोर उभी करतात. धुलीवंदनाच्या दिवशी पालखी सहाणेवर बसते ती रंगपंचमीच्या दिवशी ऊठून ठरलेल्या मार्गाने रंग खेळत आपल्या मंदिरात जाते.मात्र सहाणेवर उभी केलेली होळी ही गुढीपाडव्याला ढोलताशांच्या गजरात उतरवली (तोडली) जाते. इथे प्रत्यक्ष होळीचा होम हा त्या सुरमाडा शेजारी थोड्या प्रमाणात करण्याची प्रथा आहे. 

एकूणच या सणात ग्रामस्थांचा एकोपा , श्री देव भैरी वर असलेली परम श्रद्धा , आणि हा उत्सव साजरा करण्यासाठी जीवाचं रान करायची सर्वांची तयारी दिसून येते. समस्त रत्नागिरी आणि पंचक्रोशीतील सर्व गावे शिमगामय झालेली असतात. काही गावांमध्ये श्री देव भैरीच्या पालखी बरोबर शंकासूर नाचवण्याची प्रथा आहे. होळीच्या वेळी घातलेल्या फाका हा स्थानिक संस्कृतीचा महत्त्वाचा घटक आहे.

त्याच प्रमाणे दापोली , खेड ,  मंडणगड या भागात शिमग्याची सोंगे  दिसून येतात. यात शंकासूराची भूमिका महत्त्वाची असते. काळ्या कपड्यातला शंकासूर भितीदर्शक आकर्षणाचा भाग असतो. लांजा ,राजापुर रत्नागिरी येथे  खेळे खेळले जातात. एखादी पौराणिक कथा घेऊन त्यावर स्थानिक कवि काव्य करून नाट्यरूपात सादर केली जाते. स्त्री पात्रे पुरुष च रंगवतात. संस्कृतीची ही सारी रुपं  मजेशीर असतात.

तसं पाहिलं तर प्रत्येक उत्सव आपापली खासियत जपतच असतो. . पण होळीच्या पुरणपोळीच्या पुरणाचा गोडवा , आणि मऊसूतपणा हा  जेव्हा मानवी नातेसंबंध आणि संस्कृती जपण्यात उतरतो तेव्हा तो सण , सण न राहता संस्कृतीचा  मापदंड बनतो.

©️ स्वाती लेले, अलिबाग.
swatilele31@gmail.com.










नांदा सौख्यभरे .....

शुभ मंगल (अति ) सावधान......

विवाह हा खरं तर हिंदूंच्या सोळा संस्कारांपैकी एक संस्कार !  हिंदू धर्म शास्त्राप्रमाणे विवाहाचे एकूण आठ प्रकार आहेत . आज सर्वसाधारणपणे जी पध्दत प्रचलित आहे ती  त्यापैकी ब्राह्म विवाह या पध्दतीतून निर्माण झाली आहे . वेदांना अपेक्षित विवाह म्हणजे शारिरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम स्त्री व पुरूष यांनी एकत्र येउन विशिष्ट समाजाचे , कुळाचे , संस्कारांचे वहन करणे म्हणजेच पुढे नेणे. यात सहचर्य , सहजीवन, प्रेम , त्याग ,कर्तव्य हेही अपेक्षित असल्यामुळे विवाह हा केवळ " करार " नसून नव्या सक्षम प्रजेच्या उत्पत्तीसाठी समाजमान्यता मिळालेला तो एक " संस्कार  " आहे .

असं म्हटलं जातं की लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात.
पण हे झालं बाबा आदम च्या काळातलं विधान ! स्वर्ग ते पृथ्वी इतका प्रवास करताना या गाठी खिळखिळ्या होतात की काय असं वाटावं अशी सध्या परिस्थिती आहे ." विवाह " या विषयाला अनेक कंगोरे आहेत आणि सर्वच गोष्टींचा उहापोह करणे इथे शक्यही होणार नाही . त्यामुळे लग्न जमण्याच्या  प्रकीयेतील अडचणी हा या लेखाचा केंद्रबिंदू आहे .माझा वकीलीचा व्यवसाय , समाजकार्य , माझ्या स्वत:च्या तसंच नातेवाईक ,मित्रपरिवारातल्या मुलां मुलींच्या लग्नाच्या वेळचे अनुभव हे  या लेखाचे स्फूर्तिस्थान आहे . 

कोणत्याही काळात कोणत्याही प्रांतात लग्न किंवा विवाह हा मुला मुलीं इतकाच कुटुंबातल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे . असं जरी असलं तरी सध्याच्या काळात लग्न आणि त्या संबंधी अनेक गोष्टींचे आयाम बदलले आहेत . अर्थात बदलत्या सामाजिक परिस्थितीचा हा परिणाम असावा . आणि सामाजिक परिस्थिती काही एका दिवसात बदलत नाही . अनेक स्थित्यंतरांचा तो परिपाक असतो . लग्न जमणे / जमवणे ही एक प्रक्रिया आहे . पति - पत्नीचं नातं विवाहाच्या संस्काराने पक्कं होतं . साधारण ६०/७० वर्षांपूर्वी टिपण चांगलं जुळतय या निकषावर लग्न ठरत असे  . या प्रकारात मुला मुलीची पसंती दुय्यम असे .ज्येष्ठ लोक घराण्याची माहिती काढत  व त्यांच्या निकषांनुसार लग्नाची गाडी पुढे सरकत असे .३०/३५ वर्षांपूर्वी पत्रिके बरोबर मुला -  मुलीच्या फोटोचीही देवाण घेवाण होऊ लागली . पत्रिके इतकच व्यक्तीचे प्राथमिक दिसणेही महत्वाचे आहे असे वाटू लागले . थोडीफार कुटुंबाची रुपरेषा माहिती करुन घेणे व एकमेक कुटुंब एकमेकांना तोलामोलाची आहेत की नाहीत हे पहात असतानाच  गुप्तपणे कुटुंबाची माहिती काढणे,  वगैरे सुरक्षापट्ट्यांचा उपयोग करणं सुरू झालं . या सगळ्यात थोडी खेळीमेळी आणण्यासाठी " कांदेपोहे " कार्यक्रमही सुरू झाला . " कांदेपोहे " नी लग्नाच्या मार्केटमधे बऱ्यापैकी जम बसवला होता . काळाच्या ओघात आता  " कांदेपोहे " ची गाडी सीसीडी / बरिस्ताच्या स्थानकापर्यंत येउन पोचली आहे . एखाद्या ठिकाणी ते उपलब्ध नसेल तर मग एखाद निवांत रेस्टॉरंटही चालत . कांदेपोह्यात गुदमरलेल्या मुला / मुलींच्या गप्पा या नविन वातावरणात खुल्या दिलाने होऊ लागल्या . तो पर्यंत दोन्ही कडचे पालक पत्रिका जुळवून सज्ज असतात. आता त्यांना बाहेर भेटायला गेलेल्या मुलाकडून / मुलीकडून काय होरा येईल याची आस लागलेली असते . पहिल्याच भेटीत सकारात्मक चित्र दिसण्याचे भाग्य फार थोड्या कुटुंबांच्या बाबतीत दिसतं . सुरुवातीच्या काही भेटी नकारघंटा वाजवण्यात जाऊ लागल्या की दोन्ही कडची कुटुंब , आपापल्या मुला / मुलीची समजूत काढतात की इतक्या काय फटी काढायच्या , हे आधी कळत नव्हतं का ? किंवा हे सांगून मगच पत्रिका दिली होती - भेटायच्या आधी विचार करायचा वगैरे वगैरे. या आणि अशा प्रसंगांची पुनरावृत्ती व्हायला लागली व ती खूप काळ टिकून राहायला लागली की दोन्ही बाजूची उद्वीग्नता वाढायला लागते आणि आपल्यात काय कमी आहे पासून आपल्यात किती काय काय वरचढ आहे याची यादी करणं सुरू होतं . आणि इथेच frustration ला सुरूवात होते . याचं खोलात जाऊन कारण शोधलं तर मुलांचा ( इथे मुलीही अध्यारुत आहेत ) पालकांशी सुसंवाद नाही हेच दिसून येतं . बरेच वेळा पालकांचा थोडा  दबावही कारणीभूत असतो . 

लग्न जुळवण्याच्या प्रक्रियेतील अडथळे :- 

१) वय - आज काल लग्नाचे वय ३० च्या जवळपास येउन ठेपलय .३०/३५ वर्षांपूर्वी तिशीतल्या जोडप्याला निदान एक मूल झालेलं असायचं . काय गैर होतं त्यात ? सर्वसाधारणपणे दोघेही पदवीधर असायचे , ( काही कुटुंबात पालकही पदवीधर असत )दोघांचीही नोकरी किंवा एकाचा उद्योग/व्यवसाय असायचा , थोड्या मौजमजेनंतर यथावकाश मूल होत असे. आता जी पिढी ६०-६५ च्या दरम्यान आहे ती बरीचशी जबाबदारीतून मुक्त आहे . काहींनी लग्नानंतरही स्वतःचे शिक्षण पूर्ण केले अथवा वाढवले व स्वत:ला परिपक्व केलं . नविन टेक्नॉलॉजीही गरजेनुसार  शिकून घेतली.

पण आजकाल मुलगा किंवा मुलगी कोणालाही स्वखुशीने लवकर लग्न करायच नसतं  . ठराविक वयानंतर मतं जास्त ठाम होत जातात , नोकरी/व्यवसायातील आव्हानं साद घालतात, ती पुरी करताना दमछाक होते पण ती शेअर करायला आता आई वडील कमी वाटू लागतात , एकीकडे लग्न ठरत नसल्याची चिडचिड आणि मग frustration वाढीला लागतं . अरे माझ्यात सर्व चांगल्या क्वालिटीज आहेत मग माझ लग्न का ठरत नाही ? असंच प्रत्येकाला वाटत असतं . वाढतं वय हा एक प्रमुख अडथळा आहे . हे झालं स्वेच्छेने लग्न पुढे ढकललेल्या मुलांबाबत .! पण काही मुलां/मुलींचे त्यांची चूक नसताना अकारण वय वाढते उदा : मुलाला गलेलठ्ठ पगाराची नोकरी नसणे , मुलगा महानगर सोडून अन्य गावात अथवा शहरात रहात असेल , मुलावर आई वडिल किंवा अन्य जबाबदारी असेल , मुलगी एकुलती एक असेल , मुलीच्या नोकरीच्या शिफ्ट डुट्या असतील , मुलीवर काही जबाबदारी असेल तर त्यांची लग्न ठरण्यातही अडचणी येतात .
वयातलं अंतरही खूप कमी म्हणजे दोघे बरोबरीचे हवे असतात .

२) उत्पन्न  -  बाकी सगळ्या बाबतीत समानतेचे वारे वहात असताना मुलीना मुलाचा पगार मात्र आपल्यापेक्षा जास्त हवा असतो . पण मग वयात अंतर अगदी कमी हवे . दोघेही जर बरोबरीचेच असतील आणि शिक्षण पण समान पध्दतीचं असेल तर मुलाला वरचढ पगार कसा असेल .? त्याच प्रमाणे मुलगीही शक्यतो वरचढ पगाराची नको असते .

३५/४० वर्षांपूर्वी अशी किती तरी जोडपी मी पाहिल्येत ( आमची वरची पिढी )की पत्नीचं शिक्षण किंवा कमाई पतीपेक्षा लौकिकार्थाने वरचढ असे . पण त्यांच्या संसारात या गोष्टीमुळे काही वादंग झाला असं फारसं कधी ऐकिवात नाही . हां !  नियमाला अपवाद असतोच .

३) रहाण्याचं ठिकाण ( अर्थात मुलाचं  ): मुलाचं रहातं ठिकाण हा आजकाल खूप महत्वाचा मुद्दा ठरत चालला आहे . मोठ्या शहरांचा विचार केला तर मुलींच्या नोकरी व माहेरच ठिकाण या भोवती विचाराची सुई फिरते . निमशहरं किंवा गावांच्या ठिकाणी तर परिस्थिती अजूनच बिकट आहे कारण तिथे शहरीकरणाचा वारा पोचलेला नसतो . शहरातलं पोशाखी नोकझोकवालं वातावरण नसतं . एरवी वीकएन्ड साठी आवडणाऱ्या destinations ना अशावेळी फुल्ली मारली जाते . काहीवेळा मुलींच व तिच्या पालकांच बरोबरही असतं . तिचं शिक्षण , तिची नोकरी जर तेवढ्याच जबाबदारीची ( Hi profile )असेल तर तिच्या भविष्याकरता तिने लग्नानंतरही मोठ्या शहरात रहाणंच केव्हाही योग्य ! पण दर वेळीच अशी परिस्थिती नसते .मध्यम किंवा निमशहरां मधे तुलनेने स्वास्थ्य, रहाणीमानाचा दर्जा , सुरक्षित वातावरण जास्त चांगलं असतं .काही मुलींची प्रोफाइल सर्वसाधारण असते( अशी  की ज्यांच शिक्षण, नोकरी विचारात घेता त्या  कुठेही adjust होऊ शकतील )अशावेळी पालकांनी दुरदृष्टीने  मुलीना समजवण्याची व आपण कुठे आहोत या बाबत आत्मनिरिक्षण करण्याची गरज  आहे असं वाटतं . अस झाल तर लग्न ठरण्यातला विलंब कमी होईल. व योग्य वयात संसाराची गाडी सुरू होईल.

४) छंद, आवडी निवडी , विभक्त / एकत्र कुटुंब , कपडे वापरायच्या पध्दती , स्वत:ची स्पेस वगैरे - या प्रकाराबाबत मुलगे फार आग्रही असतात अस दिसत नाही. अगदीच वेगळ्या पध्दतीचं करिअर असेल तरच ते आग्रही असतात कारण त्या करिअरला सपोर्ट करणारी मुलगी असेल तर सहजीवन नक्कीच आनंदी होतं . मुलांना शक्यतो आई वडिलांसोबत रहाण्याची इच्छा असते . नविन मुली बरोबर संसार सुरू करताना एक माध्यम म्हणून किंवा मॉरल सपोर्ट म्हणून त्यांना ती मानसिक गरज वाटत असावी. काळाप्रमाणे, बदलत्या परिस्थितीनुसार मुलगे ही विभक्त रहायला तयार होतात . थोडी वाट पहायची तयारी हवी . आजकाल सुनांनी आधुनिक कपडे घालायला सासरच्या लोकांची सहसा ना नसते . प्रश्न असतो आपल्याला काय शोभतं आणि वेळप्रसंगी काय उचित दिसेल  याचं भान त्यांनी राखणं गरजेच आहे . 

५) स्वत:चं घर : साधारण १९८०-९० च्या दशकापर्यंत वडिलांच स्वत:चं घर असण हे उत्तम रहाणीमानाच लक्षण  समजलं जायचं . आपली मुलगी तिथेच रहाणार आहे हे ही त्यात गृहीत असायचं . आज काल जर अरेंज मॅरेज असेल तर दाखवायच्या दिवशीच मुलीचे आईवडिल विचारतात हे घर वडिलांच्या नावावर आहे की अन्य कोणाच्या ? किंवा मुलाचं स्वत:चं घर आहे /फ्लॅट आहे का ? मुलाला भाऊ असतील तर ते सर्व एकत्र रहाणार का त्यांची  वेगळी काही  सोय आहे ? २८ ते ३०/३२ वयाच्या मुलाकडून जो कधी कधी मुली इतक्याच वयाचा व थोडफार तिच्या इतकाच कमावणारा असतो त्याच day one ला स्वत:च घर असण्याची अपेक्षा आपण कोणत्या गृहितकावर करतो ? आणि स्वताच घर असेलच तर मग ते लोनच्याच जोरावर घेण्याची शक्यता जास्त.  म्हणजे लग्न झाल्यापासून आपली मुलगी कर्जाच्या छायेत जाईल हा व्यावहारिक विचार आजकाल होताना दिसत नाही. मुलाच घर /फ्लॅट ,गाडी , मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी , गलेलठ्ठ पगार हेच लग्नाच्या बाजारतलं आजच्या आदर्श लग्नाळु मुलाच चित्र आहे. बाकीचे प्रोफाईल हे लो प्रोफाईल समजण्याचा प्रघात बळावत चाललाय .

६) जबाबदारीच्या जाणीवेचा अभाव : आजकाल सर्वचजण मॅट्रिमोनी साईट्स वर मुला/मुलीचे प्रोफाइल अपलोड करतात . प्रोफाइल बघितल्यावर समोरच्या व्यक्तीशी संपर्क साधल्यावर योग्य वेळेत उत्तर देउन समोरच्याला मोकळं करणे कोणालाही महत्वाच वाटेनासं झालय . ही तक्रार दोन्ही कडची मंडळी करताना दिसतात. हे कशाचं द्योतक आहे ? जबाबदारीचा विसर पालक व पाल्य दोघांनाही पडतोय हेच यातून दिसतं .

७) सुसंवादाचा अभाव : जेव्हा मुलगा व मुलगी हॉटेलमधे भेटतात त्यावेळी दोघांपैकी कोणीतरी एक पालक किंवा नातेवाईकांच्या रेट्याला घाबरून किंवा योग्य संवादाचा अभाव असलेल्यामुळे मुलांच्या मनातल्या काही गोष्टी पालकांना माहिती नसताना भेट घडवून आणली जाते व त्यावेळी दोघांच्या प्रत्यक्ष भेटीत अशा काही गोष्टींचा उलगडा होतो की गाडी पुढे नेणं शक्यच नसतं . अशावेळी दोघांचाही वेळ , हॉटेलच बिल वाया , व निष्पन्न काही नाही अशी वेळ येते . अशा वेळा सुसंवादाने टाळता येउ शकतात.

ह्या आणि अशा अनेक छोट्या मोठ्या कारणांमुळे लग्न ठरण्याची प्रक्रिया सध्या लांबत चालली आहे . सगळ्याच गोष्टी सुरुवातीपासून चित्रातल्या चौकटीत बसवल्या सारख्या मिळत नाहीत हे पालकांनी व मुलां/मुलींनी समजून घ्यायला हवं . लौकिक सुखाची चौकट परिपूर्ण असावी ही इच्छा रास्त असली तरी वाट पहाण्याची समंजस सबूरीही हवी हे दोन्ही  पालक व मुला/मुलींनी विसरून चालणार नाही . " हे लग्नाच्या आधीच सांगितल होतं मग आता असं  कसं  म्हणता ? तेव्हा तुम्ही अस अस म्हणला होतात वगैरे वगैरे .... " असा कडक करारातला सूर लावणं  योग्य नाही . यामुळे नात्याची वीण घट्ट होण्याऐवजी सैलावते व त्यामुळेच कुटुंबसंस्था धोक्यात येते . कोणत्याही गोष्टीची खात्री ही आधी करुन मगच पुढे जाणं केव्हाही योग्य .

माझ्या वकिली व्यवसायात गेल्या २८ वर्षात कौटुंबिक केसेसचे अनेक वेगवेगळे नमुने बघायला मिळाले . काही ठिकाणी खरोखरच अन्याय झालेला असतो तर काही ठिकाणी अन्यायाचा बेमालूम आभास तयार केलेला असतो .
कुटुंबसंस्थेशी  निगडीत बरेच कायदे सध्या महिलांच्या बाजूने आहेत.  त्यांच्यासाठी ते सध्या दुधारी शस्त्र ठरतय . लग्न करायच ,जरा काही पटल नाही की नवऱ्यावर कोर्टात केस घालायची की कोणत्या ना कोणत्या कायद्याखाली पोटगी लागू होतेच . नवऱ्याला हे टाळायच असेल तर उगती पोटगी देणे हाच पर्याय उरतो  . कुठूनही नवऱ्याच्या खिशाला भगदाड आहेच .

व्यवसायाचा भाग म्हणून आणि कुटुंबसंस्था टिकायला हवी यावर विश्वास असल्याने मी समुपदेशनही करते . १५/२० वर्षापूर्वी नवरा बायकोच्या भांडणांमधे साधारणपणे ६० ते ७० % तडजोडी खूप प्रयत्नांअंती का होईना यशस्वी होत असत . कितीतरी टोकाच्या भूमिकांमधेही मी यशस्वी तडजोडी करुन संसार नांदते करुन दिले आहेत . पण गेल्या ५/७ वर्षात तडजोड करणे , १/२ पावलं दोघांनीही मागे येणे , वेगळ्या पर्यायांचा विचार करणे हे होत नाही . दोघेही आपापले पक्के विचार घेउन आलेले असतात व त्यात त्यांना जराही बदल करायची इच्छा नसते . आपण तडजोड घडवून आणायला कमी पडलो या पेक्षा त्यांना सहजीवन , साहचर्य , एकमेकांसाठी सोसणं , काही गोष्टींचा त्याग करणं , काही सोडून देणं या भावना कळत नाहीत किंबहुना त्या कळून घ्यायची इच्छाही नाही याचं दु:ख होतं . संसार हा उभयतांच्या राग , लोभ, प्रेम , त्याग , समंजसपणा , यावर चालतो ५/१० अटींच्या करारावर नाही चालत हे या मंडळीना समजावायला हवं . अति चिकित्सा , काटेकोरपणा ,सावधानता कधी कधी घातक ठरू शकते . आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगाना तोंड देण्याचं सामर्थ्य आपण आपल्या पाल्याला दिलय याबाबत पालकांना विश्वास हवा . मुलींच्या बाबतीत मुलगा बघताना ज्या फूटपट्ट्या असतात त्या त्यांचा मुलगा लग्नाच्या बाजारात उतरतो तेव्हा बदललेल्या असतात. हे ही योग्य नाही . 

अर्थात नियमाला अपवादही असतात. पण त्यांच प्रमाण अगदी नगण्य आहे . काही लोक अर्थात दोन्हीकडचे खूपच मृदू , प्रॅक्टिकल विचारांचे, ऋजू मानसिकतेचेआणि समंजस  असतात. 

शिक्षणाच प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे पण त्याबरोबर पालकांमधल व लग्नाच्या मुला / मुलींमधल्या सजगतेचं  , समंजसपणाचं, स्वत:चा आवाका , कुवत ओळखण्याचं ,सुखाचे मापदंड डोळसपणे बघण्याचं, प्रमाणही वाढायला हवं ,  तरच लग्न जमवणं हा केवळ  एक उपचार न रहाता ( म्हणजे ठरलं बाबा एकदाचं ही भावना न रहाता ) भावी पती पत्नी साठी संस्कारक्षम " विवाह " ठरेल .
आणि घटस्फोटांचं वाढतं प्रमाण आटोक्यात येईल व कुटुंबसंस्था अबाधित राहिल .

ॲड . स्वाती लेले ,
अलिबाग - रायगड 
swatilele31@gmail.com

हा लेख पुणे प्रतिष्ठान च्या २०१८ च्या "  शुभलग्न विशेषांक " या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला होता.







माझिया मना ...वाचन प्रवास

माझा वाचन प्रवास .....

 साधारण आपल्याला वाचता येतंय हे कळायला लागल्या पासून काही ना काही मी वाचत असायची. लहान वयातले कुमार, चांदोबा, फुलबाग, जादूचे अमूक तमूक , प्राण्यांच्या गोष्टी असे कितीतरी प्रकार पटकन  वाचून होत असत. ( ज्योत्स्ना प्रकाशन ची पुस्तकं छान असत.) हे बघून माझ्या वडिलांनी त्यांच्या बरोबरच  दादर च्या सुप्रसिद्ध मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात बालविभागाची रितसर मेंबरशिपच घेऊन दिली. मग काय दर आठ दिवसांनी आपल्या आवडीची पुस्तकं वाचायला मिळायला लागली. वाचन आणि त्याच्यामुळे मनात काही प्रतिमा तयार होणं हे ज्या पुस्तकामुळे पहिल्यांदा घडलं ते म्हणजे " श्यामची आई ". हे पुस्तक त्या वयात किती वेळा वाचलं असेल त्याला काही गणतीच नाही. आईचं प्रेम , संस्कार , साधं सुधं कोकण, कष्टमय जीवन,  काही बाही मनावर कोरलं गेलं हे खरं. मोठ्या वयात आता फिरण्याच्या निमित्ताने लाडघरला गेल्यावर लाडघरचं तामसतीर्थ पटकन आठवतं. असो.

कुमार, किशोर,चंपक, ठणठणपाळ, गोट्या, बोक्या सातबंडे अशा अनेक घटकांनी त्या त्या वयातली वाचन भूक भागवली आणि वाढवलीही. आता पर्यंत लायब्ररीत जाऊन पुस्तक बदलून आणण्याची गोडी व सवय लागली होती. फक्त आता गाडी कुमार विभागात गेली होती. लायब्ररीत जाणे हा माझ्यासाठी आजही  एक परम सुखानुभव असतो. याची बीजं बहुतेक लहानपणच्या त्या लायब्ररीतल्या विश्वात रुजली गेली असावीत. इतकी की अलिकडेच मी अमेरिकेला गेले असताना एका सार्वजनिक लायब्ररीला भेट देऊन तिथे मनसोक्त वेळ घालवला. 

कॉलेजच्या त्या रंगीबेरंगी दिवसांत कथा, कादंबरी, चरित्र याबरोबरच कविता भेटली आणि मग ती सहप्रवासीच झाली.
आता पर्यंत पु.ल., व.पुं ची पारायणे, द.मा. , शंकर पाटील , व्यंकटेश माडगूळकर, जयवंत दळवी, ना.सी.फडके, खांडेकर, शिरवाडकर , वसंत बापट, रणजित देसाई , शिवाजी सावंत,  विं.दा. ,पाडगावकर , कुसुमाग्रज, शांताबाई, महानोर अशा अनेक अनेक  मंडळींची ओळख झाली होती. गदिमा हे अजून एक स्वतंत्र विद्यापीठ आहे. " गदिमां नी म्हटलंय त्याप्रमाणे " असं म्हणून एखाद्या ओळीने शाळेतल्या  माझ्या अनेक निबंधांचा शेवट व्हायचा. कॉलेज मध्ये भाषा विषय घेतला आणि वाचनाला थोडं वळण लागलं. मराठी बरोबर हिंदी , इंग्रजी भाषा पण जवळून अनुभवता आल्या. भाषेचं सौंदर्य समजू लागलं.  नुसतं मन रमविण्यापेक्षा अभ्यासक दृष्टीकोनातून वाचन करायची जाणीवपूर्वक सवय लागली. गूढकथा , खगोल , इतिहास , डिटेक्टिव्ह यात कधी माझं मन रमलं नाही. वर्तमानपत्र ही मोठ्या लोकांची वाचन मक्तेदारी असं मला वाटायचं. मला फक्त जाहिरातींच्या पानात रस असे. 

दिवाळी अंक हा एक स्वतंत्र विषय आहे. त्यावेळी घरी मासिकही येत असत. महिलांच्यासाठी ललना , माहेर , वसुधा अशी काही तरी असत, या शिवाय मार्मिक , जत्रा , मोहिनी ,   अशी नर्म विनोदी मासिकं ही असत. आता लोकप्रभा, साप्ताहिक सकाळ, अनुभव , वयम् ही काही वाचनीय साप्ताहिकं / मासिकं आहेत.

लग्न होऊन सासरी आल्यावर खरी कसरत होती. घरातील सर्व माणसं कामावर जाणारी. मला एकटीला घर खायला उठे. पण सुदैवाने माझ्या आजे सासऱ्यांचं मराठी / इंग्रजी   पुस्तकांचं कलेक्शन खूप होतं.  विषय रुचणारे नव्हते. पण वाचनीय होते. लो. टिळक , गांधी विचार दर्शन , विवेकानंद , विनोबा , काही नाटके , वगैरे वगैरे. पण वेळ घालवण्याचा तो एकमेव व चांगला पर्याय होता. या वाचनाने विचारांची दिशा बदलू लागली. मग कालांतराने मी सार्वजनिक वाचनालयात जाऊ लागले. वकीलीच्या निमित्ताने कायद्याची क्लिष्ट पुस्तकं व भाषा अभ्यासता येते. तिथे ही  नेटवर केस लॉ शोधण्यापेक्षा पुस्तकातून वाचून शोधायला मला जास्त आवडतं. 

पुस्तक हे मला मित्रासारख वाटतं. त्याने सतत आपल्या सोबत असावं. त्यामुळे माझ्या पर्स मध्ये आणि हल्ली गाडी मध्ये एक - एक पुस्तक असतंच असतं. पुस्तकाला नेटवर्क वगैरे ची गरज भासत नाही. अडचणी च्या वेळी, ट्रॅफिक मधे, आपण एकटे असतो त्या प्रत्येक वेळी पुस्तक आपल्याला सोबत करतं. आणि आपण समृद्ध होत असतो ते वेगळेच.
पुस्तक वाचनात पुस्तक छान पणे सांभाळणे हा पण एक भाग येतो. मला स्वत:ला पुस्तक प्रेमाने,  नेटकेपणाने हाताळायला आवडतं. ( अगदी पेपर सुद्धा )

आता इतर जबाबदाऱ्यांमुळे अवांतर वाचायला वेळ कमी मिळतो. रुखरख वाटते. पण आता घरच्या अनेक पुस्तकांना न्याय द्यायचं ठरवलंय. पाहूया .

त्यामुळे वाचाल तर वाचाल यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
 माझ्या साठी  वाचन हा दीर्घ प्रवास आहे. तो ( मला वाचता येतंय तो पर्यंत ) शेवटपर्यंत  चालूच राहणार आहे.

©️ ॲड. स्वाती लेले, अलिबाग






Saturday, April 11, 2020

मनाचिये गुंती.... ( फेसबुक वरील पोस्टचं संकलन )

मनाचिये गुंती....(१)

सध्या माझ्या अंगणातला आंबा मोहोराने फुलून गेलाय. पानोपानी मोहोराची नाजूक फुलं डोकावत आहेत. ती कमी म्हणून का काय मध्येच बिट्ट्या कै-या पण डुलत असतात. म्हणतात आम्हीही आहोत बरं का ?आसमंतात मोहोराचा एक प्रकारचा गोड,मधुर पण थोडा उग्र सुवास भरून राहिलाय. आंबेमोहोर, आंबेमोहोर म्हणतात ते अगदी रोज याची देही याची डोळां अनुभवा येते. ....रात्री अंगणात शतपावली करण्यासारखा आनंद नाही. फणस पण खुशीत आलाय...फुलताना त्याच्या जवळुन गेलं की चक्क फुलासारखा सुवास येतो... पुढे सुवर्णचंपक आणि पिवळा कवठीचाफा आहेच ! पांढरा ढोपरी चाफ्याचा सुवास मला थेट माझ्या आजोळी केळशीला घेऊन जातो. देवीच्या देवळाजवळ मस्त फुलायचा. सोसासोसाने मी त्याला अलिबागला रुजवलाय ... माझ्या आजोळची ती एक फुलती आठवण आहे.


मनाचिये गुंती .....(२)
सध्या माझ्या बागेचा कायापालट करणे चालू आहे. तिच माती तिच झाडं तेच गवत मग कायापालट कसला? मनात आलं आपण नाही का वेगवेगळे कपडे घालतो, स्वत:ला सजवतो,नटवतो, झाडांना नसेल का कंटाळा येत तेच ते आजूबाजूचं दृष्य बघण्याचा....आपल्याला कसं थोडा हेअरकट बदलला तरी रुपात फरक पडल्या सारख वाटतं...झाडांचं पण तसंच आहे.....त्यांच्या वाढलेल्या , वाळलेल्या फांद्यांचा पसारा कमी केला. कुंड्यांच्या भाऊगर्दीमुळे झाडांना फुलं दिसत नव्हती, फुलांना पलिकडची मित्रमंडळी दिसत नव्हती ...हे म्हणजे एकाच वसाहतीत राहूनही भेटही होऊ नये असा प्रकार झाला होता.

पण हे सर्व करायचं म्हणजे काहींची उचलबांगडी करायला हवी , काहींची जागा बदलायला हवी ......माझ्यासाठी कठीण होतं...पटंत होतं पण करताना त्रास होत होता....शेवटी सगळ्या मंडळींना समजावलं शाळेत असताना नाही का सगळ्या मुलांची बाकं बदलतात तसंच थोडे दिवस नविन मंडळींच्या बरोबर रहा. थोड्या नाठाळ झाडांना एकटंच ठेवलं.... म्हटलं थोडा विरह थोडी नवी मैत्री होऊ दे...
पण हे सगळं करताना माझ्या मनात खूप खळबळ होती. हे स्वयंपाकघरातले डबे बदलणे किंवा कपाटातल्या साड्या बदलण्या इतकं सोपं नव्हतं... पण हे मी त्यांच्या प्रेमापोटीच केलं होतं........ आता सगळी मंडळी मोकळा आणि भरपूर श्वास आणि प्राणवायू घेऊ शकतील.
हळूहळू माझी बाग परत छान हसायला लागेल.....नक्की...
नव्या रंगांत, नव्या ढंगात....
मनाचिये गुंती..... (३)

सध्या आमच्या मुरुडच्या शेतात कांदा काढणीचे काम चालू आहे. अलिबागच्या अनेक प्रसिद्ध गोष्टींपैकी ( तोंडली, वाल, चिंच इ.इ. ) एक म्हणजे पांढरा कांदा ! अतिशय गोड आणि आौषधी... या निमित्ताने माझी ब-याच वेळा शेतावर वारी झाली. कांद्याचे बी पेरणे, त्याचे वाफे करणे, मग परत ती रोपे लावणे अशी क्रमवार कामे चालू असतात. मेहनतीची असली तरी त्या कामातही एक नजाकत असते. रोपं लाईनशीर , सारख्या अंतरावर हवीत. ठरविक दिवसांनी त्याला पाणी देणे, योग्य आकाराचा झाल्यावरच तो उपटायचा, शेतात वाळत ठेवायचा मग त्याच्या वेण्या वळायच्या...ती पण एक कला आहे. वेणी इतकी घट्ट आणि सुरेख वळलेली असते की वर्षभर सहज टिकते.
आता हा कांदा खायला तयार झाला... घरात सुंदरपणे लटकलेल्या पांढ-याशुभ्र कांद्याच्या माळेची ही जन्मकथा आहे. ही सर्व प्रक्रिया यावेळी मी स्वत: अनुभवली... त्या मागचे मजूरांचे कष्ट बघितले. आपल्याला गोड लागणा-या कांद्या मागे त्यांचे खरे जाणते हात असतात. आपण याची नम्र जाणीव ठेवायला हवी.
हा मृदगंध @ My Farm मला मनापासून आवडतो. कारण तो ख-या अर्थानं आपल्याला जमिनीवर ठेवतो. " आमची माती आमची माणसं " जय हो !

मनाचिये गुंती ..... (४)

रोज सकाळी चालायला जाण्याचा रिवाज बराच जुना. घरी परत येताना एस.टी. स्टँड वरून येण्याचा माझा रस्ता... वाटेत ताजी भाजी घ्यायची आणि घरी यायचं. या परिसरात सकाळी अक्षरश: एक झुंबड,लगीनघाई चालू असते. भाज्यांचे टेंपो येत असतात, त्यातून घाऊक भाजी घेणारे, किरकोळ घेणारे यांची हाणामारी, टमटम रिक्षातून स्थानिक भाजी विकायला येणारा बहुतांश महिला वर्ग, त्यांची उतरण्याची,टोपल्या उतरवण्याची रिक्षावाल्याला पैसे देण्याची घाई आणी पाठोपाठ भाजी विकण्याकरता जागा मिळवण्याची घाई... हो तिथे सुद्धा चक्क मुंबईच्या रेल्वेप्रमाणे रोजच्या बायकांच्या जागा ठरलेल्या.... एखादीला उशीर झाला की तिची जागा दुसरीनं घेतलीच...अर्थात ही सगळी धडपड आपला माल पटकन विकला जावा या साठीच... किती तरी वयोगटाच्या, अनेक स्वभाव वैशिष्ट्यांच्या, भगिनी इथे बघायला मिळतात.
आपल्याला सकाळी जी भाजी छान,ताजी मिळते त्या साठी या भगिनी वर्गाचा दिवस पहाटेच सुरू होतो... शेतात जाऊन भाजी, फुलं काढून आाणायची टोपल्या भरायच्या, घरचं जमेल तसं आवरायचं आणि ठराविक वेळेची टमटम रिक्षा पकडायची....... नाहीतर परत जागा जाण्याची आणि माल विकला न जाण्याची भिती आहेच. आपल्याला सकाळची भाजी रात्री चालत नाही, आज केलेली उद्या नको असते... इथे रोज शेतात जाऊन तिच तोंडली, पालक,माठ,मेथी ,भोपळा, दुधी.........त्यांना नसेल कंटाळा येत ? आपल्या बागेत येणा-या फुलांचं आपल्याला कोण कौतुक असतं पण इथे पोटाच्या खळगी करता त्या सुकुमार फुलांचाही व्यवहार करावा लागतो..... सगळी टोपली पटकन संपली तर बाईचा चेहरा फुलासारखा फुलतो. सगळी धडपड कमाईसाठी. आज सकाळी एक नेहमीची आोळखीची बाई भेटली...म्हणाली " काय वैनी हिकडं कुठं ?" म्हटलं " चालून आले. तू इथे कशी ?" तर म्हणाली " कै-या आनल्या हुत्या नं सगल्या संपल्या.आता सितारा मिलला तर परत घरी जाऊन घिऊन येत्ये" एकूण ती खुश होती. मी मनातल्या मनात तिला सलाम ठोकला. आम्हा दोघींचेही त्या वेळी तिथे असण्याचे हेतू वेगवेगळे होते.
इथे भाजी विकणा-या भगिनी वर्गात एक अलिखित नातं आहे, एक अदृश्य भावबंध आहे, इथे भाजी विकण्याचं एक खास तंत्र - शास्त्र आहे. त्यांच्या धडपडीला खरोखर ' अर्थ ' आहे आणि म्हणूनच त्यांचं ' अर्थशास्त्र ' अर्थपूर्ण आहे.
आमचं पोट ज्या हातांवर आहे त्या 'सकाम' हातांना मनापासून त्रिवार सलाम !!!!!

मनाचिये गुंती..... (५)

सहल / ट्रीप.... असं नुसतं म्हटलं तरी सगळा शीण गेल्याचा फील येतो. कुठेही फिरायला जायचं म्हटलं की माझ्या मनात थेट लहानपणची शाळेतली सहल आठवते. सहलीची तयारी....स्पेशल डबा,नेहमी पेक्षा थोडा जास्त खाऊ,गोळ्या, खास सहली साठी आईने दिलेली पिशवी, लवकर उठून तयारी वगैरे वगैरे... थोडं मोठं झाल्यावर या गोष्टी गौण वाटू लागल्या आणि जरा बरे कपडे,कमीत कमी सामान, इ.गोष्टी नजरेसमोर यायल्या लागल्या. कॉलेजची ट्रीप ही ' ट्रीप ' असते, ' सहल ' नसते. त्याची मजा काही आौरच असते. ती मजा,त्या दिवसांची सर कशालाच येणार नाही.
कालांतराने लग्न झाल्यावर नवे गाव,नवे बंध तसेच नवे मैत्र तयार झाले. आता खास मैत्रिणिंचा वेगळा ग्रुप तयार झाला. त्यांच्या बरोबर ट्रीप म्हणजे एक वेगळाच आनंद सोहळा असतो. त्यात हसण्याचे फवारे नाही धबधबेच असतात, मनं मोकळी करण्याचे सर्व मार्ग अवलंबण्याचं स्वातंत्र्य असतं, खादी आणि खरेदी हे 'ख' कार मोकाट सुटलेले असतात, विचारांची म्हणजे रेसिपीजची देवाणघेवाण असते, गाणी,कविता आणि बरं....च काही बाही ' शेअर ' करण्याजोगं असतं.
' मुलांबाळां लेकीसुनांसुद्धा सहकुटूंब सहपरिवार ' अशी ट्रीप सुद्धा छान असते. यात ' लळा जिव्हाळा ' आोतप्रोत भरलेला असतो किंबहुना असावाच लागतो. प्रत्येक जण आपापले संदर्भ सांभाळत पण चिमटा काढण्याची संधी न दवडता मनं मोकळी करत असतो. या ट्रीप मध्येही मजा असते. नात्यांना पुनरुज्जीवन येते.
समवयस्क मित्र मंडळींबरोबर मुलांसह केलेली ट्रीप पण छान असते. रोजच्या नात्यापलिकडे एक नविन दोस्ताना तयार होतो. मुलं लहान असताना अशा ट्रीप झाल्या तर एक वेगळे बंध तयार होतात. अशाच मोठ्या मित्र परिवारातून उरलेले तीन सदस्य डोंगरे,कर्वे,लेले.... आमच्या मुलांनी नाव ठेवलं होतं ' डोंकले ट्रॅव्हल्स'.... आता आमच्या मुलांची लग्नं झाली, त्यांना मुलं झाली तरी त्यांना आमच्या बरोबर यावंसं वाटतं...... ही खरी अॅटॅचमेंट !
पण यावेळी 'डोंकले ट्रॅव्हल्स' चे सदस्य अर्थात तीन (तरूण )आजी-आजोबा उद्या आठ दिवसांच्या ट्रीपला चालले आहेत. आता चित्र....तयारी उडत उडत, कपडे-- जास्त नको, (म्हणजे आोझं), खायची वगैरे सोय आहे म्हणून तिथेही चाट आणि थोडी फार स्वताची आौषधे वगैरे... अजून कामाचा व्याप संपत नाही म्हणून तीनही कुटूंब आपापले एअरपोर्टवर भेटणार आहोत.... पण तरी मी आणि माझी मैत्रिण वैशाली एकदा फोनवर बोलून उगीच कपडे कोणते, पर्स कोणती, तू काय घेणार मी काय घ्यायचे वगैरे चिवचिव आज केलीच.....काय आहे त्या शिवाय ट्रीपचा माहोल तयार होत नाही.
कुठे जाणार ? अं............. याचं उत्तर ब्रेक के बाद !

मनाचिये गुंती.....( ६ )

आठ दिवसांपूर्वी आठवडाभर आम्ही तीन तरुण आजी-आजोबा निसर्गाच्या सहवासात... नैनितालला गेलो होतो. नैनिताल-अल्मोडा-बिनसर-रानीखेत इ. सगळा परिसर खूप सुंदर ! निसर्गाने सगळ्याच गोष्टींची मुक्त हस्ताने उधळण केली आहे. शुद्ध निर्मळ हवा, हिरव्याकंच झाडांनी वेढलेली पर्वतराजी, डोंगर उतारांवरचा ऊन-सावल्यांचा खेळ, खळाळत्या नद्या, फुलांचे रंगीबेरंगी ताटवे ,पानांचे अगणित रंग, रानफुलांची पखरण, डोळ्यांत आणि कॅमे-यात काय साठवू नि काय नको अशी गत ! याच्या जोडीला तिथल्या माणसांमधली आपुलकी,प्रेम, सादगीभरं त्यांचं आदरातिथ्य आणि तितकीच साधी -चविष्ट खाद्यसंस्कृती ! तिथे निसर्गाचा एक स्वत:चाच ख्याल चालू असतो. कधी प्रचंड उकाडा तर कधी थोडंसं मळभ त्यानंतर मधेच चार थेंब हजेरी लावायचे आणि वातावरण मस्त गार होऊन जायचं. यात भरीला एक गोष्ट म्हणजे आम्ही तिथे भाड्याने घेतलेल्या गाडीच्या ड्रायव्हरचं गाण्यांचं कलेक्शन आश्र्चर्यकारकरित्या इतकं सुंदर होतं की प्रवासाचा कुठे कणभरही शीण जाणवला नाही. किशोरदा, महम्मद रफी, हेमंतहुमार, लता - आशा, वेगवेगळी duets, असा मस्त evergreen हिंदी गाण्यांचा खजिना आणी शिवाय मधेच कधीतरी गझल......आहाहा !!!..... जोडीला मराठी गाण्यांचा मोबाईल मधला आमचा खजिना होताच ! एकदा तर आम्ही एका प्रसन्न सकाळी प्रवासात ज्ञानेश्र्वरी वरचं भाष्यंही ऐकलं.तिथल्या निर्मोही वातावरणात ते इतकं सुंदर वाटलं की ते शब्दातीत आहे. याच साठी केला होता अट्टाहास असं काही क्षण वाटून गेलं.... इथून जाताना असलेला शारिरीक-मानसिक ताण सगळा तिकडे सोडून अगदी प्रसन्न मनाने परतलो...
तिथल्या निसर्गात फिरताना सगळ्यांच्याच मनात " कितना हँसी ये मोसम, कितना हँसी सफर है, साथी ये खूबसुरत, ये मोसम को भी खबर है " असाच भाव होता.

मनाचिये गुंती.....(७)

आज फारा दिवसांनी फेसबुकचा ' फेस ' पाहिला. संपूर्ण मे महिना पाहुण्यांनी आणी घरगुती समारंभांनी व्यापला होता. तात्पर्य काय की वेळ मिळाला नाही.... आणी अजून एका व्यक्तीने माझा मे महिना व्यापून टाकला होता ना..... माझी राधामाऊ, माझी गोडू गोडू नात....मे महिन्यात ती मी आणि आंबे... खूप धम्माल केली... तिच्या मागे पळताना दिवस कधी उगवायचा आणि कधी संपायचा कळायचंच नाही. तिला चुकवून जरा कॉंम्प्युटर समोर बसावं की आलीच रांगत बटनांशी खेळायला. हं... ही २१ व्या शतकातली मूलं ....लहान मूल घरात असलं की सारं घर हलत असतं.
या वर्षी पावसाने पण पहिलीच हजेरी दमदार लावल्ये. ' नको नको रे पावसा ...' असं म्हणण्याची पाळी आणल्ये बेट्यानं... याच्या आगमनानं लगेच विजेचा लपंडाव, इंटरनेटचा व्यत्यय, घरातली गळती, इ.इ. सारे ग्रह आवाहन केल्यासारखे वस्तीला आले. त्यांना शांत करताना आपण गरम होतो.
आकाशातून कोसाळणा-या पाण्याने शेतक-यांच्या तोंडचं पाणी पळवलंय एवढं खरं !

मनाचिये गुंती..... (८)

प्रिय वरुणराजा,
' पाऊस कधीचा पडतो '..... म्हणजे खरंतर कधीचा पडून राहिलाय;वैताग आलाय असंच म्हणायचं होतं. जूनच्या सुरुवातीला जो प्रवेश करता झालास,तो exit घ्यायचं नावंच नाही.
खरंतर तुझ्या इतक्या सुरेख,तरल,सुंदर आठवणी मनाच्या कोप-यात आहेत. पूर्वी मे महिन्याच्या अखेरीला आकाशाचा रंग पालटायचा. कधी मळभट असायचं तर संध्याकाळी लाला छटा... यात भरीला गुलमोहरही लाल रंगाने वेडा झालेला असायचा. जणू सांगायचा की वरूणराजे लवकरच येणार आहेत. या वातावरणात मोग-याचा गंधही मिसळून गेलेला असायचा. मध्येच वा-याची हलकी झुळूकही यायची... कुठेतरी दूर 'दिवाना हुवा बादल... ' चे सूर कानी यावेत आणि अचानक एखाद्या बेसावध संध्याकाळी तू अवतीर्ण व्हावास. तो मातीचा सुवास-- आहाहा ! गंधभारलं सारं वातावरण... विसरू म्हटलं तरी कशी विसरू ? मग ती छत्र्या,रेनकोट शोधण्याची गडबड, इंद्रधनुष्य बघण्याची धडपड, पाण्यात होड्या सोडण्याची मज्जा ... कुठे गेलं हे सगळं ?
तुझ्या आगमनाची शान तू दिवसेंदिवस घालवून बसला आहेस. एकतर ' काले मेघा काले मेघा पानी तो बरसा आो ' असं डोळ्यात पाणी आणून म्हणायला लावतोस नाहीतर आत्ता पडतोयस तसा इतका बदाबदा पडतोस की लोक आाता Rain rain go away म्हणू लागलेत. सृजनाची संजीवनी असलेला तू अलिकडे चक्क विध्वंसक झाला आहेस.
सध्या सगळीकडे ' पाऊस गाण्यांचा ' जरी पाऊस पडत असला आणि आम्ही किती जरी ' बरस रे घना ' असं आळवत असलो तरी ते इतकं का मनावर घ्यायचं ? बघ... 'अतिपरिचयात् अवज्ञा ' होईल असे काही करू नकोस बाबा.
तुझी,
एक पाऊसवेडी.

मनाचिये गुंती..... (९)

सालाबाद प्रमाणे आषाढी एकादशी वाजत गाजत आली. " बोलावा विठ्ठल...पहावा विठ्ठल " या चालीवर बोलावी भक्ती...पहावी भक्ती, बोलावी दिंडी...पहावी दिंडी, इकडे निरुपण...तिकडे प्रवचन...चोहिकडे भक्तीरसाचा सुकाळू झाला. साधारण आषाढ महिना निघाल्यापासूनच एकादशीचे वेध लागतात. वारक-यांची पाऊले पंढरीच्या वाटेकडे चालू लागतात. वर्तमानपत्रे,मासिके,दूरदर्शन सगळीकडे विठूनामाचा गजर सुरू होतो. कुठे पाऊले चालती पंढरीची वाट, कुठे चंद्रभागेच्या तीरी, तर कुठे अवघा रंग एकचि .... वगैरे वगैरे. मजसारख्या पामराला काय वाचू नी काय पाहू कळो येईना ! एकदम भक्तीरसाचा पूरच पूर. मार्केटिंगचे तंत्र का काय म्हणतात ते हेच का ? असो !
पूर्वी आषाढीला टाळ, मृदुंग,चिपळ्यांच्या तालावर नाचत-गात वारकरी मंडळींच्या दिंडया गावांतून,शहरांतून जवळपासच्या विठ्ठलाच्या देवळापर्यंत जात असत. ' ज्ञानोबा माऊली तुकाराम ' या पालुपदावर तल्लीन होऊन वेगवेगळ्या मंडळांच्या दिंड्या जात. त्यात कधी कधी संत ज्ञानेश्वर, तुकाराम, मुक्ताबाई यांच्या व्यक्तीरेखाही चितारलेल्या असत. ते पहाताना मन खरंच प्रसन्न होत असे. अर्थात हि गोष्ट आहे ४०/४५ वर्षांपूर्वीची . परंतू आता हे प्रमाण थोडं कमी झालेलं दिसतं.
सध्या लाखोंच्या संख्येने लोक वारीला जातात. त्यांच्या व्यवस्थापनेवर किती ताण येत असेल याचा अंदाजच केलेला बरा. इतके लोक त्या विठ्ठल-रखुमाईच्या पायी आपला माथा टेकतात, आपली गा-हाणी त्याला सांगतात, संकटातून हात देण्याची विनवणी करतात पण किती जण ' भूतां परस्परे जडो / मैत्र जीवांचे ' अशी आळवणी करत असतील ? एकूणच काय विठूरायाच्या कामांची ' फाईल ' दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
म्हणूनच तर रखूमाई विठूरायाला एका गीतात म्हणते...
" पंढरीनाथा झडकरी आता, पंढरी सोडून चला,
विनविते रखुमाई विठ्ठला, विनविते रखुमाई विठ्ठला, "
' ज्ञानोबा माऊली तुकाराम '

मनाचिये गुंती .....(१०)

मा तुझे सलाम !!!
“ स्वतंत्रते भगवती ”
सालाबाद प्रमाणे माते १५ ऑगस्टच्या जन्मदिनी
परत परत उजळल्या जातील स्वातंत्र्याच्या आठवणी......
नेत्यांच्या भाषणांतून मुक्ताफळे उधळली जातील
आणि आठवांनी राष्ट्रपित्यांच्या फुका कढ काढले जातील.....
भगतसिंग,नेहरू,गांधी एकाच दिवशी अवतरतील
आणि त्यांच्या त्यागांनी सत्ताधारी गहिवरतील.....
मोठमोठ्या हारांनी सजतील राष्ट्रपित्यांच्या तसबिरी
गाड्यांमध्ये अन् दुकानी झेंडे फडकतील दारोदारी.....
सारे जहाँ से अच्छा अन् ए मेरे वतन चे सूर गुंजतील
संध्याकाळच्या बातम्यांना ‘ दिन साजरा’ चे विषय मिळतील.....
पण खरंच माते स्वातंत्र्य देवी झाली आहेस का स्वतंत्र ?
घेते आहेस का मोकळा श्वास झुगारून जुने पारतंत्र्य ?.....
वाटतंय गुदमरतो आहे तुझा जीव या भ्रष्ट,मतलबी वातावरणात
विश्वास,स्वाभिमान,त्याग,समाधान गेलंय कधीच विस्मरणात.....
बघता बघता आई तू ‘ सिनिअर सिटीझन ’ झालीस गं
अजून तुझ्या लेकरांना स्वास्थ्य,स्थैर्य नाहीच गं...
शिक्षणात बजबजपुरी, शेतीमध्ये काबाडकष्ट
महागाईचा भस्मासूर, अन् एका घोटाळ्यातून दुसरी गोष्ट.....
उच्चशिक्षित आहे बेकार, ‘कार’ वालाही रडतो आहे
सामान्यांची सारी स्वप्नं, ‘स्वप्नांच्या पलिकडे ‘आहेत.....
वरकरणी सारे छान आहे, मनात सल सलतो काही
इतकी वर्षे लोटली तरी, तुझा ‘झोका उंच नाही’.....

मनाचिये गुंती..... (११) 

नेटची " ग्रेट भेट "...
गेले जवळजवळ महिनाभर आमच्या नेटने आमची इतरेजनांशी नेट मार्फत थेट भेट होऊ द्यायची नाही असा विडा उचलला होता. टेलिफोन आणि नेट हे हातात हात घालून चालतात त्यामुळे फोनचाही वांधा ! संपर्क माध्यमं संपावर गेली की आपली खरी परीक्षा सुरू होते. काही दिवसांनी टेलिफोनने प्रेमाने येऊन सांगितले की बाई गं, माझं आता वय झालंय पण तुमच्या प्रेमाखातर रुजू होतो सेवेत..... कोण आनंद झाला घरात सर्वांना ! पण या नेट ने तर बेट्याने त्याचा असहकार नेटाने लावून धरला होता.
इकडे माझ्या मुलाने दुसरे पर्याय अवलंबायला सुरुवात केली. त्यातही तांत्रिक अडचणी काही कमी नव्हत्या. तेवढ्यात काही काळाकरता आमच्याकडे मुंबई-पुण्याचे पाहुणे येऊन गेले. त्यांच्याकडे कसा नेटचा स्पीड छान मिळतो वगैरे वगैरे.... गप्पांनी आपण अगदीच कुठेतरी आडगावी आहोत की काय असाही " फील " दिला.
या नविन मंडळींनी खरं तर अल्पवधीतच आपला ताबा घेतला आहे हे खरोखर कबूल करायला हवं. इंटरनेट नाही तर मेल चेक करणं, त्यांना सविस्तर उत्तरं देणं, फेसबुकचा खरा आनंद घेणं, नविन माहिती मिळवणं या सगळ्याला आपण मुकतो आणि मग ते करता येत नाही म्हणून चिडचिड होते. हां ! आता काही जण म्हणतील मोबाईल द्वारे पण तुम्ही संपर्कात राहू शकता. हे जरी खरे असले तरी ती शेवटी दुधावरची तहान ताकावरच !
आणि काय सांगू महाराजा ... आज नेटने आपला ' तिसरा डोळा ' आनंदाने उघडला आहे ( डोळ्यांची साथीमुळे चिकटला होता काय ?) आणि माझ्या मुलाच्या पर्यायी व्यवस्थेलाही यश आलंय... अरे देणा-याने देत जावे म्हणजे किती ????
असू दे ! असू दे !!..........तेवढ्यात न जाणो ..........

मनाचिये गुंती.....( १२ )

आज वर्षाचा शेवटचा दिवस... आणि माझा जन्मदिन ! दरवर्षी या दिवशी माझ्या मनात अनेक संमिश्र भावना असतात. नविन वर्ष खुणावत असते. नवे संकल्प मनात असतात. काही गोष्टींची उजळणी मनात चालू असते. काही प्रकर्षाने टाळायच्या असतात तर काही न चुकता करायच्या असतात. सारं वर्ष सरलेलं असतं. मनात खूप काही दाटलेलं असतं. दरवर्षी ते मागे सारून पुढेच जाते. हाच दिवस माझा जन्मदिन असलेल्याने दिवसभर शुभेच्छांचे फोन, sms, whats app, मित्र-मैत्रिणींच्या भेटी गाठी यांनी माझा दिवस अगदी भरगच्च जातो.
अनेकांना ३१ डिसेंबर हा जन्मदिन असल्याची खूप गंमत वाटते. कारण सगळं जग हा दिवस साजरा करतं.
या दिवशी अस्मादिकांना पृथ्वीतलावर पाठवल्या बद्दल मी परमेश्वराची आणि माझ्या आईची ऋणी आहे.
अरे... बघता बघता १२ वाजून गेले.......२०१३संपले... उद्याचा सूर्योदय २०१४ घेऊन येणार आहे. सर्वांना नविन वर्षाच्या अनेकानेक शुभेच्छा !!!
नवे वर्ष.. नव्या आशा,
नवे रंग ..नव्या दिशा,
नवे ध्यास.. नव्या प्रेरणा,
पु-या होवोत हिच कामना...


मनाचिये गुंती..... (१३)

अलिबागचे '' अलिबाग " हे नाव ज्या अलिशहा बाबामुळे पडले त्या अलिशहाबाबाचा दर्गा अलिबाग येथे आहे. विशेष बाब म्हणजे तो आमच्या घराजवळच आहे. दरवर्षी आपल्या मकर संक्रांतीच्या जवळपास अलिशहाबाबाचा दोन दिवस उरुस असतो. या वर्षी काल उरुस होता व आज कव्वाल्यांचा रंगतदार कार्यक्रम आहे. या वर्षी अझिम नाझा हे प्रसिद्ध कव्वाल हजेरी लावत आहेत. आमच्या दारातच ह्या कव्वाल्यांचा कार्यक्रम रंगतो. या कव्वाल्या ऐकताना नीट ऐकल्या तर त्यातला गर्भितार्थ छान कळतो. वरवर पहाता ती कव्वाली एखादं प्रेमगीत वाटतं, पण शेवटच्या कडव्यात ख्वाजा चिश्तीला केलेली आळवणी असते.ती इतकी मनापासून असते की त्या गीताचा सर्व अर्थ एखाद्या प्रियकरा इतकाच त्या ख्वाजालाही लागू होतो. मला भाषेची अभ्यासक म्हणून या गीत रचनेचे नेहमीच कौतुक वाटते. ख्वाजा चिश्तीच्या प्रेमळ आशिर्वादाकरता, त्याच्या कृपाछत्राकरता आसुसलेल्या भक्तीभावाने आोथंबलेल्या या गीतरचना असतात. चांगल्या,सघन अर्थाने द्वयर्थी....
यावर्षी यहाँ ख्वजा का सिक्का चलता है, हम ख्वाजा के साये में रहते है, चढता सूरज धीरे धीरे ... अशा बहारदार कवाल्यांनी हा कार्यक्रम रंगला. जसं भजन, किर्तन ऐकल्यावर मनावर एक सात्विक-आोजस परिणाम होतो तसंच या भक्तीभाव आणि जीवनाचं तत्वज्ञानपूर्ण कव्वाल्या ऐेकून वाटतं.
आता पुढच्या वर्षीपर्यंत हा आनंद तीळा तीळाने जपून ठेवणं हेच आपल्या हाती आहे...

मनाचिये गुंती..... (१४)

जादूची पेटी अर्थात ग्रामोफोन

अंदाजे सात दशकं मागे घेऊन जाणारा हा सुरांचा नजराणा ! हा ग्रामोफोन माझ्या वडिलांचा आहे. त्यांच्या आठवणीप्रमाणे ते लहान असल्यापासून तो घरात आहेच. जणू कुटूंबातील एक सदस्यच ! आता ते ८० वर्षांचे असून गेली अनेक वर्षे त्यांनी तो प्राणपणाने जपलाय. त्यातली रेकॉर्ड ही लाखेची असते. या रेकॉर्ड ना ७८ स्पीडच्या रेकॉर्डस् म्हणत.मध्यभागी म्युझिक कंपनीचं चित्र असतं. HMV, Columbia या त्याकाळी रेकॉर्डक्षेत्रातील अग्रेसर कंपन्या ! ७०/७५ वर्षांपूर्वी त्याची किंमत अंदाजे रु. २००/ २५०/- होती. आणि रेकॉर्डची किंमत असायची ६ ते ८ रुपये. गंमत वाटली ना ? त्यांच्याकडे लाखाची गोष्ट, ऊन-पाऊस, अमर भूपाळी, भाऊबीज, बरसात, आह, श्री ४२०, आवारा...अनेक भावगीते, नाट्यगीते अशा अतिशय जुन्या व दुर्मिळ रेकॉर्डस् चा खजिना आहे. आणि त्याच्याशी निगडीत आठवणी सुध्दा ! सर्वांनी एकत्र बसून गाणी ऐकण्याचा आनंद काही वेगळाच असतो ! सध्या सगळं जवळ असूनही एकटेपण वाटण्याच्या या काळात या सार्वजनिक करमणूकीचं मोल जास्त वाटतं.
या रेकॉर्डस् च्या पिना कुठे मिळतात तसंच त्या अजून चांगल्या टिकण्यासाठी कोणाला काही माहिती असल्यास हवी आहे.
या ग्रामोफोनने गेल्या दोन पिढ्या अजरामर गीतांनी आमची सुरेल करमणूक केली आहे. हा अमोल ठेवा अजून जतन व्हावा व आपल्याकडून त्याची चांगली मरम्मत व्हावी एवढीच निरपेक्ष इच्छा !

मनाचिये गुंती..... (१५)

आज सकाळी नेहमी प्रमाणे चालायला बाहेर पडले. रस्ता नेहमीचाच. वाटेत एका वडाच्या मोठ्या झाडा जवळून जाताना भपकन, कुजट वास आला. म्हणून जवळ जाऊन पाहिलं तर काल वटपौर्णिमेच्या निमित्ताने ज्याला डोक्यावर घेतलं होतं त्याची दयनीय अवस्था आज बघवत नव्हती. त्याला काही तुम्ही वृक्षप्रेमी, पर्यावरणवादी वगैरे असायला हवं अशातला भाग नाही. त्या वडाच्या आसपास काय नव्हतं ? वडाचीच पाने, कुजलेली फुले, फळांचे ताकडे तुकडे,आणि अजून काही बाही पूजेचं साहित्य, त्यात रात्री पाऊस पडलेला, त्यामुळे त्याच्या जवळून जाताना एक विचित्र उग्र दर्प हवेत भरलेला......
त्याच्या कडे निरखून बघितल्यावर तो माझ्याशी बोलू लागला. अगं मला या सूताने इतकं बांधून ठेवलंय की मलाच मोकळा श्वास घेता येत नाहिये. माझ्या अासपास बघ किती कचरा करून ठेवलाय. तुम्ही माणसं तरी रहाल का गं अशा स्थितीत ? माझ्यातला मुबलक प्राणवायू तुमच्या पर्यंत पोचवण्या इतके तरी तुम्ही वाढू देता का आम्हाला ? वटवृक्ष होण्यासाठी फांद्या- पारंब्या शाबूत ठेवाव्या लागतात ना ? तुम्ही तर फांद्या तोडून लचके तोडता आमचे आणि असलाच एखादा वटवृक्ष तर हे असं करून ठेवता. आम्हाला पण स्वच्छ,मोकळ्या वातावरणात, डौलदारपणे उभं राहून तुम्हां मंडळींना सावली द्यायला आवडतं गं ! पण आमचे ऐकतो कोण ?
हेच चित्र कमी अधिक फरकाने वेगवेगळ्या गावांमध्ये,शहरांमध्ये बघायला मिळतं....पूजेसाठी अमाप गर्दी करणारा,त्यासाठी भरपूर वेळ खर्च करणारा भगिनी वर्ग दुस-या दिवशी कुठे जातो ? एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा होत असेल, झाडांची लागवड करण्या ऐवजी तोड होत असेल तर मला वाटतं या गोष्टीचा गांभिर्याने विचार व्हायला हवा. श्रद्धेचं स्तोम किती करायचं हे आपणच ठरवायला हवं. नाही का ?

मनाचिये गुंती..... ( १६ )

भेटी लागे जीवा, लागलीसे आस...
खूप दिवस मनात इछा होती की आषाढी एकादशी ला भल्या सकाळी विठूरायाचे दर्शन घ्यावे. पण आपण पडलो संसारी ."आधी प्रपंच करावा नेटका "
या उक्तीचे पालन करण्यात एवढी वर्ष गेली. असो.
मी व माझी मैत्रीण दिपा ने या वर्षी जायचच अस
ठरवल आणि आज आमच्या येथील वरसोली येथील विठ्ठल मंदिरात गेलो.
इतक सुंदर, प्रसन्न ,मन लुभावणार दर्शन आज पर्यंत झाल नव्हत. सकाळची पूजा नुकतीच झालेली,
गाभारा फुल,उदबत्ती,कापूराच्या वासाने भरलेला, बाहेर भजनाचे स्वर ऐकू येत होते.दर्शन घेतल्यावर काही वेळ तिथे थांबलो. पावसाची हजेरी होतीच. वातावरणात एक ओजसपणा भरून राहिला होता. विठ्ठल रखुमाइ जणू काही आमचीच वाट पहात होते. काय रुप , काय प्रेम .....सगळे प्रेममय भाव ओसंडून वहात होते......अगदी राजस सुकुमार मदनाचा पुतळा...
वर्सोलीचा मंदिर परिसर अतिशय लोभस, देखणा आहे.
या सात्विक सुरात निसर्गाने पण त्याचा सा लावला होता. सगळीकडे हिरवीगार व्रुक्षवल्ली , शेतांचे गालिचे, पक्षांचा किलबिलाट .......कहाण्यानमधे रंगवलेले निसर्गाच्या सानिध्यातले देउळाचे चित्र साक्षात माझ्यासमोर होते. मनाची एकतानता काय याचा आज मला खरा प्रत्यय आला.
आज ख-या अर्थाने देव मला भेटला .

मनाचिये गुंती .....( १७ )
काळा कोट.....उमर वर्षे 100
नाटकाचा शंभरावा प्रयोग, क्रिकेट्पटूच्या धावांचे शतक आपण सहज ऐकतो ...
आमच्या तीन पिढ्यानी वकिली व्यवसायाची या वर्षी शंभरी पुरी केली. ( 1914 - 2014 )
त्या निमित्त आयोजित आनंद सोहळ्याची ही काही क्षणचित्रे.....




मनाचिये गुंती..... ( १८ )

बालदिनाच्या निमित्ताने छोट्या मुलांच्या ब-याच कार्यक्रमांची गडबड बघितली...एकाच दिवशी खूप मज्जा , फनफेअर, स्पर्धा आणि बरच काही......एकाच दिवसापुरता त्या बाल्याचा उत्सव ?
या निमित्ताने मला माझ्या मुलांच अलिबाग मधल बालपण आठवल ..किती सहजसुंदर होत ते ...आमचा वाडा माणसानी भरलेला होता. बालगोपाळ खूप होते. सगळे एकत्र दंगा करत. माझी मुल लहान , त्यांचे मग लाड व्हायचे. खाण,पिण,अभ्यास,विहीरीच पाणी काढण त्यातच डुंबण , अंगणात क्रिकेट, मग काचा फुट्ण , सायकल वरून शाळेत जाण , येताना जमतील ते ते सर्व उपद्रवी उद्द्योग करत येण , मातीत खेळण, कुत्रा, मांजर, पक्षी हे पण त्यात अजून असायचेच .......................
आता अस वाटत की अरे यांचा तर रोजच बालदिन होता की.....
आज हे सर्व बाल गोपाळ शादीशुदा होउन आपापल्या उद्द्योग व्यवसायात स्थिरावले आहेत.
त्या सर्वान्ची या निमित्ताने आठवण येते.

मनाचिये गुंती.....(१९ )

गेल्या शुक्रवारीता.27 नोव्हेंबर ला अलिबागचे ज्येषठ वकिल आदरणीय भाउ खानविलकर याना देवाद्न्या झाली. त्या नंतर ता. 2 डिसेंबरला अलिबागचे तसेच रायगडच्या गळ्यातले ताइत माजी मुख्यमंत्री बॅ.अ.र.अंतुलेसाहेब अल्लाला प्यारे झाले.आणि आज ता.5डिसेंबर ला अलिबागचे अजून एक ज्येष्टह वकिल इहलोक सोडून गेले. या आठ दिवसात तीन ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाना काळाने हिरावून नेले.या तिघांचेही अलिबागच्या मातीशी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध होते. अजून एक माझ्या दृष्टीने समान दुवा म्हणजे या तिघांचेही आमच्या घराशी वकिली तसेच राजकारण या माध्यमातून गेल्या तीन पिढ्यांचे संबंध ! ह्या तीन ही व्यक्तिमत्वानी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली. यांच्या निधनामुळे अलिबागकराना बसलेल्या सामाजिक व मानसिक धक्क्यातून सावरायला वेळ लागेल हे नक्की !
इश्वर त्यांच्या मृतात्म्यास शांति देवो !
शाळेत शिकलेल्या कवितेच्या ओळी मला इथे आठवतात...
ही क्षुद्र बाहुली कोण करी निर्माण ?
बेताल नाचवी,सूत्रधार हे कोण ?
मातीतच अंती त्याचेही निर्वाण ?
स्वामित्व जगाचे अखेर अमुच्या हाती
मातीवर चढणे एक नवा थर अंती.
.............कुसुमाग्रज.

मनाचिये गुंती..... (२० )

नुकतीच दत्तजयंती झाली . ब्राह्मणआळी अलिबाग येथील दत्तमंदिरातहे सालाबाद प्रमाणे दत्तजन्माचा सोहळा पार पडला . उत्सव सगळीकडेच साजरे होतात .पण या देवळाच वैशिष्टय म्हणजे या देवस्थान चा सर्व कारभार महिलावर्ग सांभाळतो . विशेष म्हणजे या सर्व महिला ज्येष्टह नागरिक आहेत पण सर्वांचा उत्साह तरुणाना लाजवेल असा आहे. हे व्यवस्थापन गेली अनेक वर्षे चालू आहे.माझ्या सासूबाइ अध्यक्ष आहेत .व त्याना सर्व भगिनींची उत्तम साथ आहे.
दत्तजयंतीच्या आधी दोन दिवस उत्सव सुरू होतो.रोज काही ना काही कार्यक्रम असतात .व जन्माच्या दिवशी संध्याकाळी किर्तन ! या सर्व काळात छोटी मोठी कामे सर्व बायका रोज जमून हासत खेळत वातावरणात करतात. सोबत मदतीला पुरुषवर्ग, आमच्यासारखी नवशिके मंडळी ही असतात. उत्सवाच्या नंतर श्रमपरिहार ही होतो. संपूर्ण उत्सवाला सात्विक, सोज्वळ स्वरुप असत . वर्षभर हा महिलावर्ग देवळात रोज एक तास जमतो व कोणत्यातरी आध्यात्मिक पुस्तकाच वाचन करतो.
सध्याच्या बाजारु उत्सवी चकचकीत वातावरणात हा ' सादगीभरा ' उत्सव मनात पुढील अनेक दिवसांकरता आनंदाच चांदण शिंपून जातो .
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !

मनाचिये गुंती.....(२१ )

आम्ही सारे खवय्ये......
काही कामा निमित्त आम्ही वापीला गेलो होतो. तिथे हायवे वर ठिकठिकाणी अशा " उभारियो " च्या टप-या असतात. आपल्याकडे जी पोपटी असते तिचच हे गुजराथी रुप. विशेष म्हणजे याचा सर्व व्याप स्त्रिया सांभाळतात. गम्मत म्हणजे रस्त्याच्य कडेलाच गोव-या मध्ये "उभारियो " च मडक भाजल जात. तयार झाल की मागणी प्रमाणे वजनावर दिल जात. तिथेच छोटीशी बसायची व्यवस्था केलेली असते.
तिथे बसून एकीकडे गरम गरम उभारियो चा आस्वाद घेतानाच बाजूने भाजका सुवास दरवळत असतो. पेपर ओतलेल गरमा गरम उभारियो सोबत कोथिंबीरीची चटणी ....आणि एकूणच सगळा सोहळा अम्मळ झणझणीतच.
आजूबाजूला नजर टाकल्यास चहाप्रेमीना " कटींग " ची सोय होउ शकते.
थंडीच्या दौ-यात ही खवय्येगिरी फारच आनंददायी आहे.....
या जगण्यावर या खाण्यावर शतदा प्रेम करावे.

सरते शेवटी.....
' मनाचिये गुंती ' या शीर्षकाखाली गेली दोन वर्षे मी फेसबुकच्या माध्यमातून इ-लेखांकांचे नैमित्तिक लेखन केले. रोजच्या जगण्यातला एखादा अनुभव , घटना, विचार मनाला स्पर्शुन गेल्यावर त्याचे जे उत्स्फुर्त तरंग मनात उठले ते फक्त मी इथे शब्दबध्द केले व आपणा सर्वांबरोबर शेअर केले.आपणा सर्वानीच वेळोवेळी दिलेल्या प्रतिसादामुळे मला नेहमीच लिहित केल.आणि बघता बघता एकवीस दुर्वांची जुडी झाली.अर्थातच ही ' इ-दुर्वांची जुडी ' आपणा सर्वांच्या फेसबुक मैत्रीला स-प्रेम अर्पण !
भेटू पुढील वर्षी.....
तुर्तास अल्पविराम.....