मनाचिये गुंती....(१)
सध्या माझ्या अंगणातला आंबा मोहोराने फुलून गेलाय. पानोपानी मोहोराची नाजूक फुलं डोकावत आहेत. ती कमी म्हणून का काय मध्येच बिट्ट्या कै-या पण डुलत असतात. म्हणतात आम्हीही आहोत बरं का ?आसमंतात मोहोराचा एक प्रकारचा गोड,मधुर पण थोडा उग्र सुवास भरून राहिलाय. आंबेमोहोर, आंबेमोहोर म्हणतात ते अगदी रोज याची देही याची डोळां अनुभवा येते. ....रात्री अंगणात शतपावली करण्यासारखा आनंद नाही. फणस पण खुशीत आलाय...फुलताना त्याच्या जवळुन गेलं की चक्क फुलासारखा सुवास येतो... पुढे सुवर्णचंपक आणि पिवळा कवठीचाफा आहेच ! पांढरा ढोपरी चाफ्याचा सुवास मला थेट माझ्या आजोळी केळशीला घेऊन जातो. देवीच्या देवळाजवळ मस्त फुलायचा. सोसासोसाने मी त्याला अलिबागला रुजवलाय ... माझ्या आजोळची ती एक फुलती आठवण आहे.
आठ दिवसांपूर्वी आठवडाभर आम्ही तीन तरुण आजी-आजोबा निसर्गाच्या सहवासात... नैनितालला गेलो होतो. नैनिताल-अल्मोडा-बिनसर-रानीखेत इ. सगळा परिसर खूप सुंदर ! निसर्गाने सगळ्याच गोष्टींची मुक्त हस्ताने उधळण केली आहे. शुद्ध निर्मळ हवा, हिरव्याकंच झाडांनी वेढलेली पर्वतराजी, डोंगर उतारांवरचा ऊन-सावल्यांचा खेळ, खळाळत्या नद्या, फुलांचे रंगीबेरंगी ताटवे ,पानांचे अगणित रंग, रानफुलांची पखरण, डोळ्यांत आणि कॅमे-यात काय साठवू नि काय नको अशी गत ! याच्या जोडीला तिथल्या माणसांमधली आपुलकी,प्रेम, सादगीभरं त्यांचं आदरातिथ्य आणि तितकीच साधी -चविष्ट खाद्यसंस्कृती ! तिथे निसर्गाचा एक स्वत:चाच ख्याल चालू असतो. कधी प्रचंड उकाडा तर कधी थोडंसं मळभ त्यानंतर मधेच चार थेंब हजेरी लावायचे आणि वातावरण मस्त गार होऊन जायचं. यात भरीला एक गोष्ट म्हणजे आम्ही तिथे भाड्याने घेतलेल्या गाडीच्या ड्रायव्हरचं गाण्यांचं कलेक्शन आश्र्चर्यकारकरित्या इतकं सुंदर होतं की प्रवासाचा कुठे कणभरही शीण जाणवला नाही. किशोरदा, महम्मद रफी, हेमंतहुमार, लता - आशा, वेगवेगळी duets, असा मस्त evergreen हिंदी गाण्यांचा खजिना आणी शिवाय मधेच कधीतरी गझल......आहाहा !!!..... जोडीला मराठी गाण्यांचा मोबाईल मधला आमचा खजिना होताच ! एकदा तर आम्ही एका प्रसन्न सकाळी प्रवासात ज्ञानेश्र्वरी वरचं भाष्यंही ऐकलं.तिथल्या निर्मोही वातावरणात ते इतकं सुंदर वाटलं की ते शब्दातीत आहे. याच साठी केला होता अट्टाहास असं काही क्षण वाटून गेलं.... इथून जाताना असलेला शारिरीक-मानसिक ताण सगळा तिकडे सोडून अगदी प्रसन्न मनाने परतलो...
सालाबाद प्रमाणे आषाढी एकादशी वाजत गाजत आली. " बोलावा विठ्ठल...पहावा विठ्ठल " या चालीवर बोलावी भक्ती...पहावी भक्ती, बोलावी दिंडी...पहावी दिंडी, इकडे निरुपण...तिकडे प्रवचन...चोहिकडे भक्तीरसाचा सुकाळू झाला. साधारण आषाढ महिना निघाल्यापासूनच एकादशीचे वेध लागतात. वारक-यांची पाऊले पंढरीच्या वाटेकडे चालू लागतात. वर्तमानपत्रे,मासिके,दूरदर्शन सगळीकडे विठूनामाचा गजर सुरू होतो. कुठे पाऊले चालती पंढरीची वाट, कुठे चंद्रभागेच्या तीरी, तर कुठे अवघा रंग एकचि .... वगैरे वगैरे. मजसारख्या पामराला काय वाचू नी काय पाहू कळो येईना ! एकदम भक्तीरसाचा पूरच पूर. मार्केटिंगचे तंत्र का काय म्हणतात ते हेच का ? असो !
बालदिनाच्या निमित्ताने छोट्या मुलांच्या ब-याच कार्यक्रमांची गडबड बघितली...एकाच दिवशी खूप मज्जा , फनफेअर, स्पर्धा आणि बरच काही......एकाच दिवसापुरता त्या बाल्याचा उत्सव ?
या निमित्ताने मला माझ्या मुलांच अलिबाग मधल बालपण आठवल ..किती सहजसुंदर होत ते ...आमचा वाडा माणसानी भरलेला होता. बालगोपाळ खूप होते. सगळे एकत्र दंगा करत. माझी मुल लहान , त्यांचे मग लाड व्हायचे. खाण,पिण,अभ्यास,विहीरीच पाणी काढण त्यातच डुंबण , अंगणात क्रिकेट, मग काचा फुट्ण , सायकल वरून शाळेत जाण , येताना जमतील ते ते सर्व उपद्रवी उद्द्योग करत येण , मातीत खेळण, कुत्रा, मांजर, पक्षी हे पण त्यात अजून असायचेच .......................
आता अस वाटत की अरे यांचा तर रोजच बालदिन होता की.....
आज हे सर्व बाल गोपाळ शादीशुदा होउन आपापल्या उद्द्योग व्यवसायात स्थिरावले आहेत.
त्या सर्वान्ची या निमित्ताने आठवण येते.

मनाचिये गुंती .....(२)
सध्या माझ्या बागेचा कायापालट करणे चालू आहे. तिच माती तिच झाडं तेच गवत मग कायापालट कसला? मनात आलं आपण नाही का वेगवेगळे कपडे घालतो, स्वत:ला सजवतो,नटवतो, झाडांना नसेल का कंटाळा येत तेच ते आजूबाजूचं दृष्य बघण्याचा....आपल्याला कसं थोडा हेअरकट बदलला तरी रुपात फरक पडल्या सारख वाटतं...झाडांचं पण तसंच आहे.....त्यांच्या वाढलेल्या , वाळलेल्या फांद्यांचा पसारा कमी केला. कुंड्यांच्या भाऊगर्दीमुळे झाडांना फुलं दिसत नव्हती, फुलांना पलिकडची मित्रमंडळी दिसत नव्हती ...हे म्हणजे एकाच वसाहतीत राहूनही भेटही होऊ नये असा प्रकार झाला होता.
पण हे सर्व करायचं म्हणजे काहींची उचलबांगडी करायला हवी , काहींची जागा बदलायला हवी ......माझ्यासाठी कठीण होतं...पटंत होतं पण करताना त्रास होत होता....शेवटी सगळ्या मंडळींना समजावलं शाळेत असताना नाही का सगळ्या मुलांची बाकं बदलतात तसंच थोडे दिवस नविन मंडळींच्या बरोबर रहा. थोड्या नाठाळ झाडांना एकटंच ठेवलं.... म्हटलं थोडा विरह थोडी नवी मैत्री होऊ दे...
पण हे सगळं करताना माझ्या मनात खूप खळबळ होती. हे स्वयंपाकघरातले डबे बदलणे किंवा कपाटातल्या साड्या बदलण्या इतकं सोपं नव्हतं... पण हे मी त्यांच्या प्रेमापोटीच केलं होतं........ आता सगळी मंडळी मोकळा आणि भरपूर श्वास आणि प्राणवायू घेऊ शकतील.
हळूहळू माझी बाग परत छान हसायला लागेल.....नक्की...
नव्या रंगांत, नव्या ढंगात....
नव्या रंगांत, नव्या ढंगात....
मनाचिये गुंती..... (३)
सध्या आमच्या मुरुडच्या शेतात कांदा काढणीचे काम चालू आहे. अलिबागच्या अनेक प्रसिद्ध गोष्टींपैकी ( तोंडली, वाल, चिंच इ.इ. ) एक म्हणजे पांढरा कांदा ! अतिशय गोड आणि आौषधी... या निमित्ताने माझी ब-याच वेळा शेतावर वारी झाली. कांद्याचे बी पेरणे, त्याचे वाफे करणे, मग परत ती रोपे लावणे अशी क्रमवार कामे चालू असतात. मेहनतीची असली तरी त्या कामातही एक नजाकत असते. रोपं लाईनशीर , सारख्या अंतरावर हवीत. ठरविक दिवसांनी त्याला पाणी देणे, योग्य आकाराचा झाल्यावरच तो उपटायचा, शेतात वाळत ठेवायचा मग त्याच्या वेण्या वळायच्या...ती पण एक कला आहे. वेणी इतकी घट्ट आणि सुरेख वळलेली असते की वर्षभर सहज टिकते.
आता हा कांदा खायला तयार झाला... घरात सुंदरपणे लटकलेल्या पांढ-याशुभ्र कांद्याच्या माळेची ही जन्मकथा आहे. ही सर्व प्रक्रिया यावेळी मी स्वत: अनुभवली... त्या मागचे मजूरांचे कष्ट बघितले. आपल्याला गोड लागणा-या कांद्या मागे त्यांचे खरे जाणते हात असतात. आपण याची नम्र जाणीव ठेवायला हवी.
हा मृदगंध @ My Farm मला मनापासून आवडतो. कारण तो ख-या अर्थानं आपल्याला जमिनीवर ठेवतो. " आमची माती आमची माणसं " जय हो !
मनाचिये गुंती ..... (४)
रोज सकाळी चालायला जाण्याचा रिवाज बराच जुना. घरी परत येताना एस.टी. स्टँड वरून येण्याचा माझा रस्ता... वाटेत ताजी भाजी घ्यायची आणि घरी यायचं. या परिसरात सकाळी अक्षरश: एक झुंबड,लगीनघाई चालू असते. भाज्यांचे टेंपो येत असतात, त्यातून घाऊक भाजी घेणारे, किरकोळ घेणारे यांची हाणामारी, टमटम रिक्षातून स्थानिक भाजी विकायला येणारा बहुतांश महिला वर्ग, त्यांची उतरण्याची,टोपल्या उतरवण्याची रिक्षावाल्याला पैसे देण्याची घाई आणी पाठोपाठ भाजी विकण्याकरता जागा मिळवण्याची घाई... हो तिथे सुद्धा चक्क मुंबईच्या रेल्वेप्रमाणे रोजच्या बायकांच्या जागा ठरलेल्या.... एखादीला उशीर झाला की तिची जागा दुसरीनं घेतलीच...अर्थात ही सगळी धडपड आपला माल पटकन विकला जावा या साठीच... किती तरी वयोगटाच्या, अनेक स्वभाव वैशिष्ट्यांच्या, भगिनी इथे बघायला मिळतात.
आपल्याला सकाळी जी भाजी छान,ताजी मिळते त्या साठी या भगिनी वर्गाचा दिवस पहाटेच सुरू होतो... शेतात जाऊन भाजी, फुलं काढून आाणायची टोपल्या भरायच्या, घरचं जमेल तसं आवरायचं आणि ठराविक वेळेची टमटम रिक्षा पकडायची....... नाहीतर परत जागा जाण्याची आणि माल विकला न जाण्याची भिती आहेच. आपल्याला सकाळची भाजी रात्री चालत नाही, आज केलेली उद्या नको असते... इथे रोज शेतात जाऊन तिच तोंडली, पालक,माठ,मेथी ,भोपळा, दुधी.........त्यांना नसेल कंटाळा येत ? आपल्या बागेत येणा-या फुलांचं आपल्याला कोण कौतुक असतं पण इथे पोटाच्या खळगी करता त्या सुकुमार फुलांचाही व्यवहार करावा लागतो..... सगळी टोपली पटकन संपली तर बाईचा चेहरा फुलासारखा फुलतो. सगळी धडपड कमाईसाठी. आज सकाळी एक नेहमीची आोळखीची बाई भेटली...म्हणाली " काय वैनी हिकडं कुठं ?" म्हटलं " चालून आले. तू इथे कशी ?" तर म्हणाली " कै-या आनल्या हुत्या नं सगल्या संपल्या.आता सितारा मिलला तर परत घरी जाऊन घिऊन येत्ये" एकूण ती खुश होती. मी मनातल्या मनात तिला सलाम ठोकला. आम्हा दोघींचेही त्या वेळी तिथे असण्याचे हेतू वेगवेगळे होते.
इथे भाजी विकणा-या भगिनी वर्गात एक अलिखित नातं आहे, एक अदृश्य भावबंध आहे, इथे भाजी विकण्याचं एक खास तंत्र - शास्त्र आहे. त्यांच्या धडपडीला खरोखर ' अर्थ ' आहे आणि म्हणूनच त्यांचं ' अर्थशास्त्र ' अर्थपूर्ण आहे.
आमचं पोट ज्या हातांवर आहे त्या 'सकाम' हातांना मनापासून त्रिवार सलाम !!!!!
मनाचिये गुंती..... (५)
सहल / ट्रीप.... असं नुसतं म्हटलं तरी सगळा शीण गेल्याचा फील येतो. कुठेही फिरायला जायचं म्हटलं की माझ्या मनात थेट लहानपणची शाळेतली सहल आठवते. सहलीची तयारी....स्पेशल डबा,नेहमी पेक्षा थोडा जास्त खाऊ,गोळ्या, खास सहली साठी आईने दिलेली पिशवी, लवकर उठून तयारी वगैरे वगैरे... थोडं मोठं झाल्यावर या गोष्टी गौण वाटू लागल्या आणि जरा बरे कपडे,कमीत कमी सामान, इ.गोष्टी नजरेसमोर यायल्या लागल्या. कॉलेजची ट्रीप ही ' ट्रीप ' असते, ' सहल ' नसते. त्याची मजा काही आौरच असते. ती मजा,त्या दिवसांची सर कशालाच येणार नाही.
कालांतराने लग्न झाल्यावर नवे गाव,नवे बंध तसेच नवे मैत्र तयार झाले. आता खास मैत्रिणिंचा वेगळा ग्रुप तयार झाला. त्यांच्या बरोबर ट्रीप म्हणजे एक वेगळाच आनंद सोहळा असतो. त्यात हसण्याचे फवारे नाही धबधबेच असतात, मनं मोकळी करण्याचे सर्व मार्ग अवलंबण्याचं स्वातंत्र्य असतं, खादी आणि खरेदी हे 'ख' कार मोकाट सुटलेले असतात, विचारांची म्हणजे रेसिपीजची देवाणघेवाण असते, गाणी,कविता आणि बरं....च काही बाही ' शेअर ' करण्याजोगं असतं.
' मुलांबाळां लेकीसुनांसुद्धा सहकुटूंब सहपरिवार ' अशी ट्रीप सुद्धा छान असते. यात ' लळा जिव्हाळा ' आोतप्रोत भरलेला असतो किंबहुना असावाच लागतो. प्रत्येक जण आपापले संदर्भ सांभाळत पण चिमटा काढण्याची संधी न दवडता मनं मोकळी करत असतो. या ट्रीप मध्येही मजा असते. नात्यांना पुनरुज्जीवन येते.
समवयस्क मित्र मंडळींबरोबर मुलांसह केलेली ट्रीप पण छान असते. रोजच्या नात्यापलिकडे एक नविन दोस्ताना तयार होतो. मुलं लहान असताना अशा ट्रीप झाल्या तर एक वेगळे बंध तयार होतात. अशाच मोठ्या मित्र परिवारातून उरलेले तीन सदस्य डोंगरे,कर्वे,लेले.... आमच्या मुलांनी नाव ठेवलं होतं ' डोंकले ट्रॅव्हल्स'.... आता आमच्या मुलांची लग्नं झाली, त्यांना मुलं झाली तरी त्यांना आमच्या बरोबर यावंसं वाटतं...... ही खरी अॅटॅचमेंट !
पण यावेळी 'डोंकले ट्रॅव्हल्स' चे सदस्य अर्थात तीन (तरूण )आजी-आजोबा उद्या आठ दिवसांच्या ट्रीपला चालले आहेत. आता चित्र....तयारी उडत उडत, कपडे-- जास्त नको, (म्हणजे आोझं), खायची वगैरे सोय आहे म्हणून तिथेही चाट आणि थोडी फार स्वताची आौषधे वगैरे... अजून कामाचा व्याप संपत नाही म्हणून तीनही कुटूंब आपापले एअरपोर्टवर भेटणार आहोत.... पण तरी मी आणि माझी मैत्रिण वैशाली एकदा फोनवर बोलून उगीच कपडे कोणते, पर्स कोणती, तू काय घेणार मी काय घ्यायचे वगैरे चिवचिव आज केलीच.....काय आहे त्या शिवाय ट्रीपचा माहोल तयार होत नाही.
कुठे जाणार ? अं............. याचं उत्तर ब्रेक के बाद !
मनाचिये गुंती.....( ६ )
आठ दिवसांपूर्वी आठवडाभर आम्ही तीन तरुण आजी-आजोबा निसर्गाच्या सहवासात... नैनितालला गेलो होतो. नैनिताल-अल्मोडा-बिनसर-रानीखेत इ. सगळा परिसर खूप सुंदर ! निसर्गाने सगळ्याच गोष्टींची मुक्त हस्ताने उधळण केली आहे. शुद्ध निर्मळ हवा, हिरव्याकंच झाडांनी वेढलेली पर्वतराजी, डोंगर उतारांवरचा ऊन-सावल्यांचा खेळ, खळाळत्या नद्या, फुलांचे रंगीबेरंगी ताटवे ,पानांचे अगणित रंग, रानफुलांची पखरण, डोळ्यांत आणि कॅमे-यात काय साठवू नि काय नको अशी गत ! याच्या जोडीला तिथल्या माणसांमधली आपुलकी,प्रेम, सादगीभरं त्यांचं आदरातिथ्य आणि तितकीच साधी -चविष्ट खाद्यसंस्कृती ! तिथे निसर्गाचा एक स्वत:चाच ख्याल चालू असतो. कधी प्रचंड उकाडा तर कधी थोडंसं मळभ त्यानंतर मधेच चार थेंब हजेरी लावायचे आणि वातावरण मस्त गार होऊन जायचं. यात भरीला एक गोष्ट म्हणजे आम्ही तिथे भाड्याने घेतलेल्या गाडीच्या ड्रायव्हरचं गाण्यांचं कलेक्शन आश्र्चर्यकारकरित्या इतकं सुंदर होतं की प्रवासाचा कुठे कणभरही शीण जाणवला नाही. किशोरदा, महम्मद रफी, हेमंतहुमार, लता - आशा, वेगवेगळी duets, असा मस्त evergreen हिंदी गाण्यांचा खजिना आणी शिवाय मधेच कधीतरी गझल......आहाहा !!!..... जोडीला मराठी गाण्यांचा मोबाईल मधला आमचा खजिना होताच ! एकदा तर आम्ही एका प्रसन्न सकाळी प्रवासात ज्ञानेश्र्वरी वरचं भाष्यंही ऐकलं.तिथल्या निर्मोही वातावरणात ते इतकं सुंदर वाटलं की ते शब्दातीत आहे. याच साठी केला होता अट्टाहास असं काही क्षण वाटून गेलं.... इथून जाताना असलेला शारिरीक-मानसिक ताण सगळा तिकडे सोडून अगदी प्रसन्न मनाने परतलो...
तिथल्या निसर्गात फिरताना सगळ्यांच्याच मनात " कितना हँसी ये मोसम, कितना हँसी सफर है, साथी ये खूबसुरत, ये मोसम को भी खबर है " असाच भाव होता.
मनाचिये गुंती.....(७)
आज फारा दिवसांनी फेसबुकचा ' फेस ' पाहिला. संपूर्ण मे महिना पाहुण्यांनी आणी घरगुती समारंभांनी व्यापला होता. तात्पर्य काय की वेळ मिळाला नाही.... आणी अजून एका व्यक्तीने माझा मे महिना व्यापून टाकला होता ना..... माझी राधामाऊ, माझी गोडू गोडू नात....मे महिन्यात ती मी आणि आंबे... खूप धम्माल केली... तिच्या मागे पळताना दिवस कधी उगवायचा आणि कधी संपायचा कळायचंच नाही. तिला चुकवून जरा कॉंम्प्युटर समोर बसावं की आलीच रांगत बटनांशी खेळायला. हं... ही २१ व्या शतकातली मूलं ....लहान मूल घरात असलं की सारं घर हलत असतं.
या वर्षी पावसाने पण पहिलीच हजेरी दमदार लावल्ये. ' नको नको रे पावसा ...' असं म्हणण्याची पाळी आणल्ये बेट्यानं... याच्या आगमनानं लगेच विजेचा लपंडाव, इंटरनेटचा व्यत्यय, घरातली गळती, इ.इ. सारे ग्रह आवाहन केल्यासारखे वस्तीला आले. त्यांना शांत करताना आपण गरम होतो.
आकाशातून कोसाळणा-या पाण्याने शेतक-यांच्या तोंडचं पाणी पळवलंय एवढं खरं !
मनाचिये गुंती..... (८)
प्रिय वरुणराजा,
' पाऊस कधीचा पडतो '..... म्हणजे खरंतर कधीचा पडून राहिलाय;वैताग आलाय असंच म्हणायचं होतं. जूनच्या सुरुवातीला जो प्रवेश करता झालास,तो exit घ्यायचं नावंच नाही.
खरंतर तुझ्या इतक्या सुरेख,तरल,सुंदर आठवणी मनाच्या कोप-यात आहेत. पूर्वी मे महिन्याच्या अखेरीला आकाशाचा रंग पालटायचा. कधी मळभट असायचं तर संध्याकाळी लाला छटा... यात भरीला गुलमोहरही लाल रंगाने वेडा झालेला असायचा. जणू सांगायचा की वरूणराजे लवकरच येणार आहेत. या वातावरणात मोग-याचा गंधही मिसळून गेलेला असायचा. मध्येच वा-याची हलकी झुळूकही यायची... कुठेतरी दूर 'दिवाना हुवा बादल... ' चे सूर कानी यावेत आणि अचानक एखाद्या बेसावध संध्याकाळी तू अवतीर्ण व्हावास. तो मातीचा सुवास-- आहाहा ! गंधभारलं सारं वातावरण... विसरू म्हटलं तरी कशी विसरू ? मग ती छत्र्या,रेनकोट शोधण्याची गडबड, इंद्रधनुष्य बघण्याची धडपड, पाण्यात होड्या सोडण्याची मज्जा ... कुठे गेलं हे सगळं ?
तुझ्या आगमनाची शान तू दिवसेंदिवस घालवून बसला आहेस. एकतर ' काले मेघा काले मेघा पानी तो बरसा आो ' असं डोळ्यात पाणी आणून म्हणायला लावतोस नाहीतर आत्ता पडतोयस तसा इतका बदाबदा पडतोस की लोक आाता Rain rain go away म्हणू लागलेत. सृजनाची संजीवनी असलेला तू अलिकडे चक्क विध्वंसक झाला आहेस.
सध्या सगळीकडे ' पाऊस गाण्यांचा ' जरी पाऊस पडत असला आणि आम्ही किती जरी ' बरस रे घना ' असं आळवत असलो तरी ते इतकं का मनावर घ्यायचं ? बघ... 'अतिपरिचयात् अवज्ञा ' होईल असे काही करू नकोस बाबा.
तुझी,
एक पाऊसवेडी.
मनाचिये गुंती..... (९)
सालाबाद प्रमाणे आषाढी एकादशी वाजत गाजत आली. " बोलावा विठ्ठल...पहावा विठ्ठल " या चालीवर बोलावी भक्ती...पहावी भक्ती, बोलावी दिंडी...पहावी दिंडी, इकडे निरुपण...तिकडे प्रवचन...चोहिकडे भक्तीरसाचा सुकाळू झाला. साधारण आषाढ महिना निघाल्यापासूनच एकादशीचे वेध लागतात. वारक-यांची पाऊले पंढरीच्या वाटेकडे चालू लागतात. वर्तमानपत्रे,मासिके,दूरदर्शन सगळीकडे विठूनामाचा गजर सुरू होतो. कुठे पाऊले चालती पंढरीची वाट, कुठे चंद्रभागेच्या तीरी, तर कुठे अवघा रंग एकचि .... वगैरे वगैरे. मजसारख्या पामराला काय वाचू नी काय पाहू कळो येईना ! एकदम भक्तीरसाचा पूरच पूर. मार्केटिंगचे तंत्र का काय म्हणतात ते हेच का ? असो !
पूर्वी आषाढीला टाळ, मृदुंग,चिपळ्यांच्या तालावर नाचत-गात वारकरी मंडळींच्या दिंडया गावांतून,शहरांतून जवळपासच्या विठ्ठलाच्या देवळापर्यंत जात असत. ' ज्ञानोबा माऊली तुकाराम ' या पालुपदावर तल्लीन होऊन वेगवेगळ्या मंडळांच्या दिंड्या जात. त्यात कधी कधी संत ज्ञानेश्वर, तुकाराम, मुक्ताबाई यांच्या व्यक्तीरेखाही चितारलेल्या असत. ते पहाताना मन खरंच प्रसन्न होत असे. अर्थात हि गोष्ट आहे ४०/४५ वर्षांपूर्वीची . परंतू आता हे प्रमाण थोडं कमी झालेलं दिसतं.
सध्या लाखोंच्या संख्येने लोक वारीला जातात. त्यांच्या व्यवस्थापनेवर किती ताण येत असेल याचा अंदाजच केलेला बरा. इतके लोक त्या विठ्ठल-रखुमाईच्या पायी आपला माथा टेकतात, आपली गा-हाणी त्याला सांगतात, संकटातून हात देण्याची विनवणी करतात पण किती जण ' भूतां परस्परे जडो / मैत्र जीवांचे ' अशी आळवणी करत असतील ? एकूणच काय विठूरायाच्या कामांची ' फाईल ' दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
म्हणूनच तर रखूमाई विठूरायाला एका गीतात म्हणते...
" पंढरीनाथा झडकरी आता, पंढरी सोडून चला,
विनविते रखुमाई विठ्ठला, विनविते रखुमाई विठ्ठला, "
विनविते रखुमाई विठ्ठला, विनविते रखुमाई विठ्ठला, "
' ज्ञानोबा माऊली तुकाराम '
मनाचिये गुंती .....(१०)
मा तुझे सलाम !!!
“ स्वतंत्रते भगवती ”
सालाबाद प्रमाणे माते १५ ऑगस्टच्या जन्मदिनी
परत परत उजळल्या जातील स्वातंत्र्याच्या आठवणी......
परत परत उजळल्या जातील स्वातंत्र्याच्या आठवणी......
नेत्यांच्या भाषणांतून मुक्ताफळे उधळली जातील
आणि आठवांनी राष्ट्रपित्यांच्या फुका कढ काढले जातील.....
आणि आठवांनी राष्ट्रपित्यांच्या फुका कढ काढले जातील.....
भगतसिंग,नेहरू,गांधी एकाच दिवशी अवतरतील
आणि त्यांच्या त्यागांनी सत्ताधारी गहिवरतील.....
आणि त्यांच्या त्यागांनी सत्ताधारी गहिवरतील.....
मोठमोठ्या हारांनी सजतील राष्ट्रपित्यांच्या तसबिरी
गाड्यांमध्ये अन् दुकानी झेंडे फडकतील दारोदारी.....
गाड्यांमध्ये अन् दुकानी झेंडे फडकतील दारोदारी.....
सारे जहाँ से अच्छा अन् ए मेरे वतन चे सूर गुंजतील
संध्याकाळच्या बातम्यांना ‘ दिन साजरा’ चे विषय मिळतील.....
संध्याकाळच्या बातम्यांना ‘ दिन साजरा’ चे विषय मिळतील.....
पण खरंच माते स्वातंत्र्य देवी झाली आहेस का स्वतंत्र ?
घेते आहेस का मोकळा श्वास झुगारून जुने पारतंत्र्य ?.....
घेते आहेस का मोकळा श्वास झुगारून जुने पारतंत्र्य ?.....
वाटतंय गुदमरतो आहे तुझा जीव या भ्रष्ट,मतलबी वातावरणात
विश्वास,स्वाभिमान,त्याग,समाधान गेलंय कधीच विस्मरणात.....
विश्वास,स्वाभिमान,त्याग,समाधान गेलंय कधीच विस्मरणात.....
बघता बघता आई तू ‘ सिनिअर सिटीझन ’ झालीस गं
अजून तुझ्या लेकरांना स्वास्थ्य,स्थैर्य नाहीच गं...
अजून तुझ्या लेकरांना स्वास्थ्य,स्थैर्य नाहीच गं...
शिक्षणात बजबजपुरी, शेतीमध्ये काबाडकष्ट
महागाईचा भस्मासूर, अन् एका घोटाळ्यातून दुसरी गोष्ट.....
महागाईचा भस्मासूर, अन् एका घोटाळ्यातून दुसरी गोष्ट.....
उच्चशिक्षित आहे बेकार, ‘कार’ वालाही रडतो आहे
सामान्यांची सारी स्वप्नं, ‘स्वप्नांच्या पलिकडे ‘आहेत.....
सामान्यांची सारी स्वप्नं, ‘स्वप्नांच्या पलिकडे ‘आहेत.....
वरकरणी सारे छान आहे, मनात सल सलतो काही
इतकी वर्षे लोटली तरी, तुझा ‘झोका उंच नाही’.....
इतकी वर्षे लोटली तरी, तुझा ‘झोका उंच नाही’.....
मनाचिये गुंती..... (११)
नेटची " ग्रेट भेट "...
गेले जवळजवळ महिनाभर आमच्या नेटने आमची इतरेजनांशी नेट मार्फत थेट भेट होऊ द्यायची नाही असा विडा उचलला होता. टेलिफोन आणि नेट हे हातात हात घालून चालतात त्यामुळे फोनचाही वांधा ! संपर्क माध्यमं संपावर गेली की आपली खरी परीक्षा सुरू होते. काही दिवसांनी टेलिफोनने प्रेमाने येऊन सांगितले की बाई गं, माझं आता वय झालंय पण तुमच्या प्रेमाखातर रुजू होतो सेवेत..... कोण आनंद झाला घरात सर्वांना ! पण या नेट ने तर बेट्याने त्याचा असहकार नेटाने लावून धरला होता.
इकडे माझ्या मुलाने दुसरे पर्याय अवलंबायला सुरुवात केली. त्यातही तांत्रिक अडचणी काही कमी नव्हत्या. तेवढ्यात काही काळाकरता आमच्याकडे मुंबई-पुण्याचे पाहुणे येऊन गेले. त्यांच्याकडे कसा नेटचा स्पीड छान मिळतो वगैरे वगैरे.... गप्पांनी आपण अगदीच कुठेतरी आडगावी आहोत की काय असाही " फील " दिला.
या नविन मंडळींनी खरं तर अल्पवधीतच आपला ताबा घेतला आहे हे खरोखर कबूल करायला हवं. इंटरनेट नाही तर मेल चेक करणं, त्यांना सविस्तर उत्तरं देणं, फेसबुकचा खरा आनंद घेणं, नविन माहिती मिळवणं या सगळ्याला आपण मुकतो आणि मग ते करता येत नाही म्हणून चिडचिड होते. हां ! आता काही जण म्हणतील मोबाईल द्वारे पण तुम्ही संपर्कात राहू शकता. हे जरी खरे असले तरी ती शेवटी दुधावरची तहान ताकावरच !
आणि काय सांगू महाराजा ... आज नेटने आपला ' तिसरा डोळा ' आनंदाने उघडला आहे ( डोळ्यांची साथीमुळे चिकटला होता काय ?) आणि माझ्या मुलाच्या पर्यायी व्यवस्थेलाही यश आलंय... अरे देणा-याने देत जावे म्हणजे किती ????
असू दे ! असू दे !!..........तेवढ्यात न जाणो ..........
मनाचिये गुंती.....( १२ )
आज वर्षाचा शेवटचा दिवस... आणि माझा जन्मदिन ! दरवर्षी या दिवशी माझ्या मनात अनेक संमिश्र भावना असतात. नविन वर्ष खुणावत असते. नवे संकल्प मनात असतात. काही गोष्टींची उजळणी मनात चालू असते. काही प्रकर्षाने टाळायच्या असतात तर काही न चुकता करायच्या असतात. सारं वर्ष सरलेलं असतं. मनात खूप काही दाटलेलं असतं. दरवर्षी ते मागे सारून पुढेच जाते. हाच दिवस माझा जन्मदिन असलेल्याने दिवसभर शुभेच्छांचे फोन, sms, whats app, मित्र-मैत्रिणींच्या भेटी गाठी यांनी माझा दिवस अगदी भरगच्च जातो.
अनेकांना ३१ डिसेंबर हा जन्मदिन असल्याची खूप गंमत वाटते. कारण सगळं जग हा दिवस साजरा करतं.
अनेकांना ३१ डिसेंबर हा जन्मदिन असल्याची खूप गंमत वाटते. कारण सगळं जग हा दिवस साजरा करतं.
या दिवशी अस्मादिकांना पृथ्वीतलावर पाठवल्या बद्दल मी परमेश्वराची आणि माझ्या आईची ऋणी आहे.
अरे... बघता बघता १२ वाजून गेले.......२०१३संपले... उद्याचा सूर्योदय २०१४ घेऊन येणार आहे. सर्वांना नविन वर्षाच्या अनेकानेक शुभेच्छा !!!
नवे वर्ष.. नव्या आशा,
नवे रंग ..नव्या दिशा,
नवे ध्यास.. नव्या प्रेरणा,
पु-या होवोत हिच कामना...
नवे रंग ..नव्या दिशा,
नवे ध्यास.. नव्या प्रेरणा,
पु-या होवोत हिच कामना...
मनाचिये गुंती..... (१३)
अलिबागचे '' अलिबाग " हे नाव ज्या अलिशहा बाबामुळे पडले त्या अलिशहाबाबाचा दर्गा अलिबाग येथे आहे. विशेष बाब म्हणजे तो आमच्या घराजवळच आहे. दरवर्षी आपल्या मकर संक्रांतीच्या जवळपास अलिशहाबाबाचा दोन दिवस उरुस असतो. या वर्षी काल उरुस होता व आज कव्वाल्यांचा रंगतदार कार्यक्रम आहे. या वर्षी अझिम नाझा हे प्रसिद्ध कव्वाल हजेरी लावत आहेत. आमच्या दारातच ह्या कव्वाल्यांचा कार्यक्रम रंगतो. या कव्वाल्या ऐकताना नीट ऐकल्या तर त्यातला गर्भितार्थ छान कळतो. वरवर पहाता ती कव्वाली एखादं प्रेमगीत वाटतं, पण शेवटच्या कडव्यात ख्वाजा चिश्तीला केलेली आळवणी असते.ती इतकी मनापासून असते की त्या गीताचा सर्व अर्थ एखाद्या प्रियकरा इतकाच त्या ख्वाजालाही लागू होतो. मला भाषेची अभ्यासक म्हणून या गीत रचनेचे नेहमीच कौतुक वाटते. ख्वाजा चिश्तीच्या प्रेमळ आशिर्वादाकरता, त्याच्या कृपाछत्राकरता आसुसलेल्या भक्तीभावाने आोथंबलेल्या या गीतरचना असतात. चांगल्या,सघन अर्थाने द्वयर्थी....
यावर्षी यहाँ ख्वजा का सिक्का चलता है, हम ख्वाजा के साये में रहते है, चढता सूरज धीरे धीरे ... अशा बहारदार कवाल्यांनी हा कार्यक्रम रंगला. जसं भजन, किर्तन ऐकल्यावर मनावर एक सात्विक-आोजस परिणाम होतो तसंच या भक्तीभाव आणि जीवनाचं तत्वज्ञानपूर्ण कव्वाल्या ऐेकून वाटतं.
आता पुढच्या वर्षीपर्यंत हा आनंद तीळा तीळाने जपून ठेवणं हेच आपल्या हाती आहे...
मनाचिये गुंती..... (१४)
जादूची पेटी अर्थात ग्रामोफोन
अंदाजे सात दशकं मागे घेऊन जाणारा हा सुरांचा नजराणा ! हा ग्रामोफोन माझ्या वडिलांचा आहे. त्यांच्या आठवणीप्रमाणे ते लहान असल्यापासून तो घरात आहेच. जणू कुटूंबातील एक सदस्यच ! आता ते ८० वर्षांचे असून गेली अनेक वर्षे त्यांनी तो प्राणपणाने जपलाय. त्यातली रेकॉर्ड ही लाखेची असते. या रेकॉर्ड ना ७८ स्पीडच्या रेकॉर्डस् म्हणत.मध्यभागी म्युझिक कंपनीचं चित्र असतं. HMV, Columbia या त्याकाळी रेकॉर्डक्षेत्रातील अग्रेसर कंपन्या ! ७०/७५ वर्षांपूर्वी त्याची किंमत अंदाजे रु. २००/ २५०/- होती. आणि रेकॉर्डची किंमत असायची ६ ते ८ रुपये. गंमत वाटली ना ? त्यांच्याकडे लाखाची गोष्ट, ऊन-पाऊस, अमर भूपाळी, भाऊबीज, बरसात, आह, श्री ४२०, आवारा...अनेक भावगीते, नाट्यगीते अशा अतिशय जुन्या व दुर्मिळ रेकॉर्डस् चा खजिना आहे. आणि त्याच्याशी निगडीत आठवणी सुध्दा ! सर्वांनी एकत्र बसून गाणी ऐकण्याचा आनंद काही वेगळाच असतो ! सध्या सगळं जवळ असूनही एकटेपण वाटण्याच्या या काळात या सार्वजनिक करमणूकीचं मोल जास्त वाटतं.
या रेकॉर्डस् च्या पिना कुठे मिळतात तसंच त्या अजून चांगल्या टिकण्यासाठी कोणाला काही माहिती असल्यास हवी आहे.
या ग्रामोफोनने गेल्या दोन पिढ्या अजरामर गीतांनी आमची सुरेल करमणूक केली आहे. हा अमोल ठेवा अजून जतन व्हावा व आपल्याकडून त्याची चांगली मरम्मत व्हावी एवढीच निरपेक्ष इच्छा !

मनाचिये गुंती..... (१५)
आज सकाळी नेहमी प्रमाणे चालायला बाहेर पडले. रस्ता नेहमीचाच. वाटेत एका वडाच्या मोठ्या झाडा जवळून जाताना भपकन, कुजट वास आला. म्हणून जवळ जाऊन पाहिलं तर काल वटपौर्णिमेच्या निमित्ताने ज्याला डोक्यावर घेतलं होतं त्याची दयनीय अवस्था आज बघवत नव्हती. त्याला काही तुम्ही वृक्षप्रेमी, पर्यावरणवादी वगैरे असायला हवं अशातला भाग नाही. त्या वडाच्या आसपास काय नव्हतं ? वडाचीच पाने, कुजलेली फुले, फळांचे ताकडे तुकडे,आणि अजून काही बाही पूजेचं साहित्य, त्यात रात्री पाऊस पडलेला, त्यामुळे त्याच्या जवळून जाताना एक विचित्र उग्र दर्प हवेत भरलेला......
त्याच्या कडे निरखून बघितल्यावर तो माझ्याशी बोलू लागला. अगं मला या सूताने इतकं बांधून ठेवलंय की मलाच मोकळा श्वास घेता येत नाहिये. माझ्या अासपास बघ किती कचरा करून ठेवलाय. तुम्ही माणसं तरी रहाल का गं अशा स्थितीत ? माझ्यातला मुबलक प्राणवायू तुमच्या पर्यंत पोचवण्या इतके तरी तुम्ही वाढू देता का आम्हाला ? वटवृक्ष होण्यासाठी फांद्या- पारंब्या शाबूत ठेवाव्या लागतात ना ? तुम्ही तर फांद्या तोडून लचके तोडता आमचे आणि असलाच एखादा वटवृक्ष तर हे असं करून ठेवता. आम्हाला पण स्वच्छ,मोकळ्या वातावरणात, डौलदारपणे उभं राहून तुम्हां मंडळींना सावली द्यायला आवडतं गं ! पण आमचे ऐकतो कोण ?
हेच चित्र कमी अधिक फरकाने वेगवेगळ्या गावांमध्ये,शहरांमध्ये बघायला मिळतं....पूजेसाठी अमाप गर्दी करणारा,त्यासाठी भरपूर वेळ खर्च करणारा भगिनी वर्ग दुस-या दिवशी कुठे जातो ? एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा होत असेल, झाडांची लागवड करण्या ऐवजी तोड होत असेल तर मला वाटतं या गोष्टीचा गांभिर्याने विचार व्हायला हवा. श्रद्धेचं स्तोम किती करायचं हे आपणच ठरवायला हवं. नाही का ?
मनाचिये गुंती..... ( १६ )
भेटी लागे जीवा, लागलीसे आस...
खूप दिवस मनात इछा होती की आषाढी एकादशी ला भल्या सकाळी विठूरायाचे दर्शन घ्यावे. पण आपण पडलो संसारी ."आधी प्रपंच करावा नेटका "
या उक्तीचे पालन करण्यात एवढी वर्ष गेली. असो.
मी व माझी मैत्रीण दिपा ने या वर्षी जायचच अस
ठरवल आणि आज आमच्या येथील वरसोली येथील विठ्ठल मंदिरात गेलो.
इतक सुंदर, प्रसन्न ,मन लुभावणार दर्शन आज पर्यंत झाल नव्हत. सकाळची पूजा नुकतीच झालेली,
गाभारा फुल,उदबत्ती,कापूराच्या वासाने भरलेला, बाहेर भजनाचे स्वर ऐकू येत होते.दर्शन घेतल्यावर काही वेळ तिथे थांबलो. पावसाची हजेरी होतीच. वातावरणात एक ओजसपणा भरून राहिला होता. विठ्ठल रखुमाइ जणू काही आमचीच वाट पहात होते. काय रुप , काय प्रेम .....सगळे प्रेममय भाव ओसंडून वहात होते......अगदी राजस सुकुमार मदनाचा पुतळा...

वर्सोलीचा मंदिर परिसर अतिशय लोभस, देखणा आहे.
या सात्विक सुरात निसर्गाने पण त्याचा सा लावला होता. सगळीकडे हिरवीगार व्रुक्षवल्ली , शेतांचे गालिचे, पक्षांचा किलबिलाट .......कहाण्यानमधे रंगवलेले निसर्गाच्या सानिध्यातले देउळाचे चित्र साक्षात माझ्यासमोर होते. मनाची एकतानता काय याचा आज मला खरा प्रत्यय आला.

आज ख-या अर्थाने देव मला भेटला .
मनाचिये गुंती .....( १७ )
काळा कोट.....उमर वर्षे 100
नाटकाचा शंभरावा प्रयोग, क्रिकेट्पटूच्या धावांचे शतक आपण सहज ऐकतो ...
आमच्या तीन पिढ्यानी वकिली व्यवसायाची या वर्षी शंभरी पुरी केली. ( 1914 - 2014 )
त्या निमित्त आयोजित आनंद सोहळ्याची ही काही क्षणचित्रे.....
आमच्या तीन पिढ्यानी वकिली व्यवसायाची या वर्षी शंभरी पुरी केली. ( 1914 - 2014 )
त्या निमित्त आयोजित आनंद सोहळ्याची ही काही क्षणचित्रे.....
मनाचिये गुंती..... ( १८ )
बालदिनाच्या निमित्ताने छोट्या मुलांच्या ब-याच कार्यक्रमांची गडबड बघितली...एकाच दिवशी खूप मज्जा , फनफेअर, स्पर्धा आणि बरच काही......एकाच दिवसापुरता त्या बाल्याचा उत्सव ?
या निमित्ताने मला माझ्या मुलांच अलिबाग मधल बालपण आठवल ..किती सहजसुंदर होत ते ...आमचा वाडा माणसानी भरलेला होता. बालगोपाळ खूप होते. सगळे एकत्र दंगा करत. माझी मुल लहान , त्यांचे मग लाड व्हायचे. खाण,पिण,अभ्यास,विहीरीच पाणी काढण त्यातच डुंबण , अंगणात क्रिकेट, मग काचा फुट्ण , सायकल वरून शाळेत जाण , येताना जमतील ते ते सर्व उपद्रवी उद्द्योग करत येण , मातीत खेळण, कुत्रा, मांजर, पक्षी हे पण त्यात अजून असायचेच .......................
आता अस वाटत की अरे यांचा तर रोजच बालदिन होता की.....
आज हे सर्व बाल गोपाळ शादीशुदा होउन आपापल्या उद्द्योग व्यवसायात स्थिरावले आहेत.
त्या सर्वान्ची या निमित्ताने आठवण येते.
मनाचिये गुंती.....(१९ )
गेल्या शुक्रवारीता.27 नोव्हेंबर ला अलिबागचे ज्येषठ वकिल आदरणीय भाउ खानविलकर याना देवाद्न्या झाली. त्या नंतर ता. 2 डिसेंबरला अलिबागचे तसेच रायगडच्या गळ्यातले ताइत माजी मुख्यमंत्री बॅ.अ.र.अंतुलेसाहेब अल्लाला प्यारे झाले.आणि आज ता.5डिसेंबर ला अलिबागचे अजून एक ज्येष्टह वकिल इहलोक सोडून गेले. या आठ दिवसात तीन ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाना काळाने हिरावून नेले.या तिघांचेही अलिबागच्या मातीशी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध होते. अजून एक माझ्या दृष्टीने समान दुवा म्हणजे या तिघांचेही आमच्या घराशी वकिली तसेच राजकारण या माध्यमातून गेल्या तीन पिढ्यांचे संबंध ! ह्या तीन ही व्यक्तिमत्वानी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली. यांच्या निधनामुळे अलिबागकराना बसलेल्या सामाजिक व मानसिक धक्क्यातून सावरायला वेळ लागेल हे नक्की !
इश्वर त्यांच्या मृतात्म्यास शांति देवो !
इश्वर त्यांच्या मृतात्म्यास शांति देवो !
शाळेत शिकलेल्या कवितेच्या ओळी मला इथे आठवतात...
ही क्षुद्र बाहुली कोण करी निर्माण ?
बेताल नाचवी,सूत्रधार हे कोण ?
मातीतच अंती त्याचेही निर्वाण ?
स्वामित्व जगाचे अखेर अमुच्या हाती
मातीवर चढणे एक नवा थर अंती.
.............कुसुमाग्रज.
बेताल नाचवी,सूत्रधार हे कोण ?
मातीतच अंती त्याचेही निर्वाण ?
स्वामित्व जगाचे अखेर अमुच्या हाती
मातीवर चढणे एक नवा थर अंती.
.............कुसुमाग्रज.
मनाचिये गुंती..... (२० )
नुकतीच दत्तजयंती झाली . ब्राह्मणआळी अलिबाग येथील दत्तमंदिरातहे सालाबाद प्रमाणे दत्तजन्माचा सोहळा पार पडला . उत्सव सगळीकडेच साजरे होतात .पण या देवळाच वैशिष्टय म्हणजे या देवस्थान चा सर्व कारभार महिलावर्ग सांभाळतो . विशेष म्हणजे या सर्व महिला ज्येष्टह नागरिक आहेत पण सर्वांचा उत्साह तरुणाना लाजवेल असा आहे. हे व्यवस्थापन गेली अनेक वर्षे चालू आहे.माझ्या सासूबाइ अध्यक्ष आहेत .व त्याना सर्व भगिनींची उत्तम साथ आहे.
दत्तजयंतीच्या आधी दोन दिवस उत्सव सुरू होतो.रोज काही ना काही कार्यक्रम असतात .व जन्माच्या दिवशी संध्याकाळी किर्तन ! या सर्व काळात छोटी मोठी कामे सर्व बायका रोज जमून हासत खेळत वातावरणात करतात. सोबत मदतीला पुरुषवर्ग, आमच्यासारखी नवशिके मंडळी ही असतात. उत्सवाच्या नंतर श्रमपरिहार ही होतो. संपूर्ण उत्सवाला सात्विक, सोज्वळ स्वरुप असत . वर्षभर हा महिलावर्ग देवळात रोज एक तास जमतो व कोणत्यातरी आध्यात्मिक पुस्तकाच वाचन करतो.
सध्याच्या बाजारु उत्सवी चकचकीत वातावरणात हा ' सादगीभरा ' उत्सव मनात पुढील अनेक दिवसांकरता आनंदाच चांदण शिंपून जातो .
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !
सध्याच्या बाजारु उत्सवी चकचकीत वातावरणात हा ' सादगीभरा ' उत्सव मनात पुढील अनेक दिवसांकरता आनंदाच चांदण शिंपून जातो .
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !
मनाचिये गुंती.....(२१ )
आम्ही सारे खवय्ये......
काही कामा निमित्त आम्ही वापीला गेलो होतो. तिथे हायवे वर ठिकठिकाणी अशा " उभारियो " च्या टप-या असतात. आपल्याकडे जी पोपटी असते तिचच हे गुजराथी रुप. विशेष म्हणजे याचा सर्व व्याप स्त्रिया सांभाळतात. गम्मत म्हणजे रस्त्याच्य कडेलाच गोव-या मध्ये "उभारियो " च मडक भाजल जात. तयार झाल की मागणी प्रमाणे वजनावर दिल जात. तिथेच छोटीशी बसायची व्यवस्था केलेली असते.
तिथे बसून एकीकडे गरम गरम उभारियो चा आस्वाद घेतानाच बाजूने भाजका सुवास दरवळत असतो. पेपर ओतलेल गरमा गरम उभारियो सोबत कोथिंबीरीची चटणी ....आणि एकूणच सगळा सोहळा अम्मळ झणझणीतच.
आजूबाजूला नजर टाकल्यास चहाप्रेमीना " कटींग " ची सोय होउ शकते.
आजूबाजूला नजर टाकल्यास चहाप्रेमीना " कटींग " ची सोय होउ शकते.
थंडीच्या दौ-यात ही खवय्येगिरी फारच आनंददायी आहे.....
या जगण्यावर या खाण्यावर शतदा प्रेम करावे.
सरते शेवटी.....
' मनाचिये गुंती ' या शीर्षकाखाली गेली दोन वर्षे मी फेसबुकच्या माध्यमातून इ-लेखांकांचे नैमित्तिक लेखन केले. रोजच्या जगण्यातला एखादा अनुभव , घटना, विचार मनाला स्पर्शुन गेल्यावर त्याचे जे उत्स्फुर्त तरंग मनात उठले ते फक्त मी इथे शब्दबध्द केले व आपणा सर्वांबरोबर शेअर केले.आपणा सर्वानीच वेळोवेळी दिलेल्या प्रतिसादामुळे मला नेहमीच लिहित केल.आणि बघता बघता एकवीस दुर्वांची जुडी झाली.अर्थातच ही ' इ-दुर्वांची जुडी ' आपणा सर्वांच्या फेसबुक मैत्रीला स-प्रेम अर्पण !
भेटू पुढील वर्षी.....
तुर्तास अल्पविराम.....
भेटू पुढील वर्षी.....
तुर्तास अल्पविराम.....

No comments:
Post a Comment