अंदमान सफर - एक समृद्ध अनुभव.
२/३ वर्षांच्या विश्रांती नंतर आम्हां मित्र मंडळींच्या या वर्षी फिरायला कुठे जावं या चर्चेत अंदमान वर एकमतानं शिक्कामोर्तब झालं. प्रवासाची तिकीटस्, हॉटेल बुकिंग्ज वगैरे प्राथमिक फेरीचे सोपस्कार पूर्ण झाले आणि आम्ही थोडे निश्चिंत झालो. माझ्या मनात पर्यटनाच्या आनंदा बरोबरच अंदमानचा नितांतसुंदर निसर्ग , स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोठडीचं दर्शन, या बेटांचा आपल्या पासून भौगोलिक आणि शासकीय दृष्ट्या असलेला दूरस्थपणा , तांत्रिकदृष्ट्या सुधारणांचा अभाव, त्सुनामीचे दूरगामी परिणाम अशा अनेक उत्सुकतांच्या संमिश्र भावना दाटल्या होत्या. अजून एक आकर्षण होतं ते म्हणजे राजधानीचं शहर असलेलं पोर्ट ब्लेअर बंदर ! या बंदराचं भारताच्या सामान्य जीवनाशी असलेल्या तुटलेपणा विषयी वाचून होते. आणि म्हणूनच ते पहाण्याची मनात खूप उत्सुकता होती.
अंदमानचं बोलीभाषेतलं स्थानिक रुढ नाव अंडमान आहे. अंदमान हा एक द्विपसमूह आहे. भारताचा केंद्रशासित प्रदेश म्हणून अंदमानचे पालकत्व भारताकडे आहे. पण भौगोलिकदृष्ट्या हे बेट भारताच्या सीमेपासून खूप दूर आहे. इतके की तिथल्या आणि आपल्या सूर्योदय - सुर्यास्ताच्या वेळेतही खूप फरक आहे. सकाळी ५/५:३० ला चांगलं उजाडलेलं असतं व संध्याकाळी ५:१५/५:२० ला सूर्यास्त झाला की ५:३० ला सगळीकडे अंधाराचं साम्राज्य पसरलेलं असतं. त्यामुळे हॉटेल मधली खाद्यसंस्कृती ९:३० ला च बंद होते. इथली माणसं निसर्गाच्या कलाकलानी जगणारी, त्याचे नियम पाळणारी आहेत. निसर्गाला नमवणारी नाहीत. एकूणच जनजीवनाचा वेग स्वभावत:च मंद आहे. त्या वेगाशी आपल्याला जुळवून घ्यावं लागतं. इथे ऐहिक श्रीमंतीच्या तुलनेत निसर्गाची अमाप श्रीमंती आहे. लौकिक दृष्टीने श्रीमंत कुटुंबसमूहातील एखादे कुटुंब आचार विचार आणि मूल्यांची जपणूक करणारं परंतू तुलनेनं कमी श्रीमंत असेल तर त्यांचा बाणेदारपणा जसा चारचौघांमध्ये उठून दिसतो त्याचा मला इथे भास जाणवला. आमच्या गाईडने पहिल्याच दिवशी सांगितलं की इथे गरीबी असली तरी सर्व लोकं कष्ट करून खातात, इथे एकही भिकारी दिसणार नाही. आणि खरोखरच आमच्या मुक्कामात आम्हाला एकही भिकारी दिसला नाही. थर्मास मधून हिंडून चहा/ कॉफी विकणं , फळं विकणं ही कामं आणि अशी अनेक कामं पुरुषांच्या बरोबरीने बायकाही करताना दिसत होत्या. एकदा एका बेटावरील रिसॉर्टमध्ये एका मुलाला मी , इथे इंटरनेट सेवाच नाही तर तुम्ही कसे काय व्यवहार करता बुवा ? असं भाबडेपणाने विचारल्यावर " अच्छा है नं, इधर का नेचर, पौधे , पंछी, जानवर सब अच्छे रहते है. इंटरनेट टॉवर की वजह से नेचर और सब पर गंदा असर होता है न , हमे आदत हो गयी है " अशी एक बाणेदार चपराक मला त्या रिसॉर्टच्या मुलाने दिली. मी अवाक झाले. हाच तो स्वाभिमानाचा भास !
अंदमान ला जाताना प्रत्येक भारतीयाची पहिली ओढ ही सावरकर स्मारक पहाण्याची असते. पोर्ट ब्लेअरलाच हे राष्ट्रीय स्मारक आहे. राष्ट्रीय स्मारकाच्या तुलनेत पर्यटकांच्या दृष्टीने व्यवस्थापन व स्वयंस्पष्टतेचा थोडा अभाव जाणवला. सावरकरांच्या कोठडीत बाहेर भाऊगर्दी असतानाही दोन घटका निवांत बसता आलं, " ने मजसी ने " या गीताने आदरांजली वाहता आली याचं आत्मिक समाधान आम्हां सर्वांना नक्कीच आहे. बाकी स्मारक छान आहे. पर्यटकांचं दुसरं आकर्षण म्हणजे इथला निसर्ग अर्थात वेगवेगळे समुद्र किनारे. तिथलं सुरक्षाव्यवस्थापन मात्र वाखाणण्या सारखं आहे. प्रत्येक किनाऱ्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पाण्यात जाणारे पर्यटक, बोटचालक , हवामानात होणारे तात्कालिक बदल यावर त्यांची बारीक नजर असते व त्याबाबत माईकवरून सतत सूचना ही दिल्या जातात. अंदमानला पर्यटक खास करून हॅवलॉक , रॉस व नील आयलंडस् ना भेट देतात. रॉस आयलंड वर मुक्तपणे विहरणारे प्राणी, पक्षी आणि त्यांच्याशी आणि आपल्याशी ही संवाद करणाऱ्या अनुराधा ताई हा अतिशय सुंदर अनुभव आहे.सर्वदूर दिसणारी हिरवीगार वनश्री आणि निळाशार समुद्र मन मोहून टाकतो. बऱ्याचशा रिसॉर्टमध्ये खाजगी किनाऱ्याचीही सोय असते. त्यामुळे निळ्याशार अथांग जलाशयासमोर बसून आपापल्या आवडीप्रमाणे वेळ घालवण्याचा आनंद घेता येतो.
इथल्या सेवा सर्वसाधारणपणे महाग आहेत. कारण इथल्या व्यावसायिकांना सर्व गोष्टींसाठी कलकत्ता , मद्रास , विशाखापट्टणम या शहरांवर अवलंबून रहावे लागते. सर्वसाधारणपणे खाद्यसंस्कृती थोडी बेतानेच दिसली. ताजे पदार्थ बनवून देण्याच्या हातगाड्या ही पद्धत फारशी दिसली नाही. नारियल पानी, फ्रूट डिश , क्वचित कुठे भेळ वगैरे आणि चहा/ कॉफी ती देखिल थर्मास मधे .... मिळते. गरमागरम भजी / समोसे / अमृततुल्य वगैरे सर्व फक्त बीच परिसरात दिसून आलं. एकूण जनजीवन शांत, सुशेगाद वाटलं. इथे प्रगत तंत्रज्ञानाचा वेग मोठ्या शहरांच्या तुलनेत कमी आहे. सरकारी इमारतींवर " शासकीय " ऐवजी
" राजकीय " असा उल्लेख बघून मजा वाटली. काही बीच व आयलंडस् वर त्सुनामीच्या खुणा बघून मन गलबलून जातं.
मूळ प्रवाहापासून तुटलेपण म्हणजे काय आणि त्यात स्वत:ला निभावणं म्हणजे काय , ही क्रांतीवीरांची भावना समजून घ्यायची असेल तर ऐहिक सुखाच्या मागे धावणाऱ्या आणि नविन तंत्रज्ञानाच्या वेगात होसपटणाऱ्या आपल्या सारख्या जीवांनी अंदमानची सफर एकदा तरी करावीच !
उत्सुकतांची सगळी गाठोडी मोकळी झाली होती . तिथल्या वातावरणातली शांत निळाई आणि निसर्गसमृद्ध अनुभव घेऊन आम्ही सारे तृप्त मनाने परतलो.
©️ ॲड.स्वाती लेले
अलिबाग - रायगड
No comments:
Post a Comment