देवाज्ञा...
आज सकाळीच मोबाईल बघितला आणि पं . यशवंत देवांच्या दुख:द निधनाची बातमी कळली . मन सुन्न झालं .लहानपणापासून ऐकलेल्या त्यांच्या अनेक गाण्यांनी मनात ताल धरला . सर्वच गाणी सर्वोत्तम- एकाच नाव घ्याव तर दुसऱ्यावर अन्याय होईल इतकी मधुर , गोड , श्रवणीय !
१ नोव्हेंबर १९२६ रोजी रायगड जिल्ह्यातील पेण गावात या देव माणसाचा जन्म झाला . ते जात्याच गुणवंत , कलावंत , विचारवंत , ज्ञानवंत आणि म्हणूनच शब्द - सुरांचे प्रत्यक्ष ' यशवंत ' ' देव ' !
कळत्या - नकळत्या वयाच्या उंबरठ्यावर उभं असल्यापासून आकाशवाणीच्या माध्यमातून यशवंत देवांच्या गाण्यांची ओळख होत गेली . १९७० च्या दशकात आकाशवाणीने मराठी संगीतप्रेमींना उदंड श्रवणानंद दिला - त्या पिढीची मी प्रतिनिधी ! आकाशवाणीच्या समृद्ध मराठी गीतांच्या कार्यक्रमातला ' भावसरगम ' हा असाच एक ' देवस्पर्शी ' कार्यक्रम. सुगम संगीताची मधुर धारा चोहोबाजूंनी अक्षरश: बरसत होती . गीतकार , संगीतकार , गायक /गायिका सर्वांच्याच स्वरांचं , शब्दांच , देवांनी शब्दशः सोनं केलं . पण तरीही मंगेश पाडगावकर ,अरुण दाते , आणि यशवंत देव या त्रिगुणात्मक त्रयीने मराठी सुगम संगीताच्या शिरपेचात अनेक नवे तुरे खोवले . बाबूजी , आशा भोसले , लतादीदी, सुधा मल्होत्रा ,सुमन कल्याणपूर ,रविन्द्र साठे , सुरेश वाडकर ,रंजना जोगळेकर यांच्या सारखे गायक तसंच गदिमा , वसंत बापट , कुसुमाग्रज ,सुधीर मोघे ,वंदना विटणकर असे अनेक गीतकार , तसंच प्रभाकर जोग , मिलिंद जोशी ,बाबूजींसारख्या संगीतकारांच्या विश्वात देवांच संगीत व काव्यप्रतिभा खऱ्या अर्थानं बहरत गेली फुलत गेली .
स्वर आले दुरुनी , जीवनात ही घडी , शुक्रतारा मंद वारा , येशील येशील राणी , कधी बहर कधी शिशिर , प्रिया आज माझी , दिल्या घेतल्या वचनांची , तुझ्या चंद्रशाळेत नेशील का रे , तुझे गीत गाण्यासाठी, या जन्मावर , अशी एका पेक्षा एक सुरेल सरस गाण्यांची त्यांनी निर्मिती केली .
यशवंत देवांनी शब्द - सुरांना कुरवाळत ज्या रचना स्वरबद्ध केल्या त्या सरळ , साध्या ,सोप्या शब्दप्रधान होत्या . आणि म्हणूनच त्यांच्या हाती आलेली सगळी शब्द लेणी सुरांच्या धुमाऱ्यानी तेजाळली . अजिबात विसरता न येणारं '' विसरशील खास मला ' हे गीत त्याचं उत्तम उदाहरण आहे . आज पाच दशकांहून अधिक काळ त्यांची गीतं रसिकांच्या ह्रदयावर अधिराज्य करत आहेत . सुगम संगीतातल्या ' भावा ' इतकाच कुठे शोधिसी रामेश्वर , हे आदिमा हे अंतिमा ,कोटि कोटि रुपे तुझी अशा काही रचनांमधून त्यांचा चिंतनशील आध्यात्मिक पिंडही दिसतो . ओशोंच्या सानिध्यात आल्यानंतर त्यांनी स्वतः काही स्वतंत्र हिंदी रचना करुन त्या स्वरबद्ध केल्या .
सुरांचं साम्राज्य निर्माण करताना ' शब्द ' हा ब्रह्मस्थानी आहे या विचारधारेचे ते प्रथम उद्गाते ! या मध्यवर्ती भूमिकेवर ठाम राहूनच त्यांनी अनेक अनवट सुरावटींची निर्मिती केली . भावगीतातला भाव कटाक्षाने जपला जाईल याची कायम काळजी घेतली. शब्दप्रधान गायकीच्या कार्यशाळेचा उगम यातूनच झाला . या माध्यमातून अनेक उभरत्या कलाकारांना या ' देवाचे ' आशीर्वाद मिळाले .
त्यांच्या लेखणीने अनेक अजरामर गीतं लिहिली तसच कृतज्ञतेच्या सरी ,रियाजाचा कानमंत्र , शब्दप्रधान गायकी , पत्नीची मुजोरी अशी काही पुस्तकेही लिहिली. पत्नीची मुजोरी मधे त्यांच्यातला मिश्किल , खट्याळ स्वभावही दिसतो . याच पुस्तकातली ' मी शिवाजी ' ही कविता कोणत्याही काळाला पूरक वाटते .
लग्नानंतर मी मुंबईहून अलिबागला आले . संसारसंगीता सोबत मनातल्या मनात इतर गाण्यां बरोबर देवगाण्यांची रुंजी चालू असे . अलिबागला त्यांचे खाजगी ,सार्वजनिक अनेक कार्यक्रम झाले . शब्दसुरांची प्रेमी म्हणून त्या प्रत्येक कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित राहिले केवळ देवदर्शनाच्या ओढीनं ! देवसरां नी सुरु केलेले सुगम संगीताचे क्लास कालौघात अलिबाग इथेही सुरु झाले . मंदार भिडे या शिष्योत्तमाने देवदूताची भूमिका बजावली व त्यांची देवगाणी आमच्यासारख्या नवशिक्यांपर्यंत पोचवली . आयुष्याच्या या टप्प्यावर देव असे गाण्यांमधून भेटण्याचा दैवी योग होता .
यशवंत देवांच संगीत म्हणजे पौर्णिमेच्या अर्ध्या रात्री उमलणारं चंद्रविलसिनी ब्रह्मकमळच ! वाऱ्यावर डुलताना फुलणारं ते सहस्त्रदळ पाहणं , त्याचा पसरणारा मंद सुगंध अनुभवणं यातून मनाला जो ताजेपणा येतो तो , आनंद अवर्णनीय असतो . आज अनेकजण या सुगंधात परत हरवून गेले असतील .
देवांच्या शब्द सुरांच्या या अथांग सागरात कितीही डुबकी मारली तरी त्यांनी दिलेल्या अविनाशी अवीट संगीताचा अमाप ठेवा उरतोच .
गेले अनेक दिवस ते वेगवेगळ्या व्याधींशी सामना करत होते. पण या लढाईला अखेर यश यायचं नव्हतं . दोनच दिवसांनी येणारा त्यांचा वाढदिवस स्वर्गलोकात साजरा करण्याची ' त्या ' देवाची इच्छा असावी . परम ईश्वराने पं . यशवंत देवांना तशी ' देवाज्ञा ' दिली आणि ती शिरसावंद्य मानून ईहलोकावरील हा सर्वाथाने ' यशवंत ' देव आज देवाघरी ' गेला .
ईश्वरेच्छा बलियसी !
प्रणाम !
©️स्वाती लेले
अलिबाग
No comments:
Post a Comment