कैवल्याचे चांदणे .....
२२ ऑगस्ट २०१८ ला माझ्या सासूबाईंना देवाज्ञा झाली . गेले काही महिने त्यांच्या भोवती सुरु असलेला दिनक्रम अचानक थांबला आणि आठवणींचं मोहोळ उठलं . १९८१ साली लग्न होऊन मी या घरात आले . तेव्हापासून आज ३७ वर्षांचा माझा त्यांच्या बरोबर सहवास झाला . त्यांच्या विषयीच्या मनातल्या भावना / आठवणी या लेखातून व्यक्त करणे एवढाच या लेखाचा प्रांजळ हेतू आहे .
पूर्वाश्रमीच्या सुधा भिकाजी भिडे लग्नानंतर सुमती पद्माकर लेले झाल्या. भिडे घराणं मुंबईचं तर लेले घराणं अलिबागचं ! मुंबई महानगरी तर तुलनेने अलिबाग निमशहर ! दोन्ही शहरांचा प्रादेशिक आब सोडला तर लौकिक धन, विचारधन, बुध्दीमत्ता या सर्वच दृष्टीने दोन्हीही घराणी समसमान ! लग्नापूर्वी इंटर आर्टस पर्यंतचं कॉलेजच शिक्षण त्यांच विल्सन कॉलेजला झालं . अलिबागच्या घरात पुढील शिक्षण पूर्ण करायला मुभा होती किंबहुना त्यांच्या सासऱ्यांची तशी इच्छाच होती. नंतर रुइया कॉलेज मधून त्यांनी बी . ए .केलं . बी .ए . झाल्यावर अलिबागला को. ए .सो. च्या शाळेत नोकरी सुरु झाली. . यथावकाश त्यांनी मुंबई एस .एन .डि .टी . मधून बी .एड . व पुणे विद्यापीठातून एम .एड . केलं . साधारण २५ वर्ष शिक्षणसेवा केली. या काळात त्यांनी थळ व खंडाळा येथील शाळांमध्ये मुख्याध्यापकपदाची धुरा सांभाळली. त्यांचा आवाज चांगला होता व लग्नापूर्वी त्यांच्या गाण्याच्या थोड्या परीक्षाही झाल्या होत्या . गाण्याचं पुढचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांच्या सासूबाईंनी पाठिंबा दिला आणि त्यांच संगीत विशारद पूर्ण झालं . या कामी सुरुवातीचं संगीत शिक्षण नव्याने सुरु करताना त्याना अलिबागच्या वाखारकर बाई व उकिडवे बाई यांनी खूप सहकार्य केलं अस त्या आवर्जून सांगत .सुप्रसिद्ध गायिका सरला भिडे , मुक्ता भिडे या त्यांच्या चुलत बहिणी तर माणिक भिडे चुलत वहिनी व विदुषी आश्विनी भिडे देशपांडे त्यांची भाची ! अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे शास्त्रीय संगीताचे रितसर क्लास त्यांनी अलिबागमधे सुरु करुन हाच संगीताचा वारसा पुढे चालू ठेवला . जवळजवळ ३०/३५ वर्ष त्यांनी क्लास चालवले .त्यांचे अनेक विद्यार्थी संगीत क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत . अलिबागला श्वेता कारभारी या त्यांच्या क्लासच्या आता उत्तराधिकारी म्हणून चांगली धुरा सांभाळत आहेत .
अलिबागच्या वीणा भजनी मंडळात त्यांनी हार्मोनियमची साथ अनेक वर्ष केली . क्वचितप्रसंगी त्या तबल्याची साथही करत असत. मंडळात त्या अनेक पदं म्हणत . मला स्वत:ला त्यांचं " वृंदावनी वेणू वाजे " खूप आवडायचं . त्यांना दिलरुबाही वाजवता येत असे . आमच्याकडे एक दिलरुबाही होता .दत्त मंदिर देवस्थानच्या त्या १२/१३ वर्ष अध्यक्ष होत्या. त्यांच्या कालावधीतच देवळाचा जीर्णोद्धार झाला .शाळा , क्लास , भजनी मंडळ या सर्वच ठिकाणी त्या लेलेबाई म्हणूनच ओळखल्या जायच्या. माझे सासरे सुद्धा त्यांना " लेलेबाई "नावानेच हाक मारत ! नातवंडां मुळे मात्र आम्हां कुटुंबियांमध्ये त्या सर्वांसाठी "आबी " होत्या .
स्वभाव मुळातच शांत ! क्लास किंवा शाळे मधले विद्यार्थी असोत किंवा भजनी मंडळातील भगिनी असो चुकलेली गोष्ट समजावून सांगण्याकडेच कल असायचा. शाळेत इंग्लिश ,गणित , भूगोल , संगीत हे त्यांचे खास विषय असत . त्यातही गणितावर विशेष प्रभूत्व होतं .
निसर्गत:च त्यांची प्रकृती राजस ! त्यामुळे तामसी खाणं त्यांना विशेष रुचत नसे . दुधी , पडवळ , भोपळा, गवार ,ताकातली पालकाची भाजी या भाज्या, सर्व कोशिंबीरी विशेष आवडायच्या . दुधीच्या भाजीला त्या सुकुमार भाजी म्हणायच्या .सर्व प्रकारची फळं ,सुकामेवा आवडत असे .दही आणि दह्याचे पदार्थ हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय ! पाककृतींमध्ये दुधी हलवा , सुरळीची वडी , दही वडा , मोदक ,कणसाची मसालाभाजी सुंदर करत असत .
लांब घनदाट केसांची निसर्गदत्त देणगी त्यांना लाभली होती. शाळेतल्या नोकरीच्या काळात त्या इंग्रजी 8 आकाराचा अंबाडा घालत असत . पण अलिकडे काही वर्षं पांढऱ्या केसांची लांबसडक वेणी ही व्यकिमत्वाची खास ओळख म्हणता येईल. केसांच्या निगराणीसाठी कायम शुध्द खोबरेल तेलाचाच वापर केला .
आमच्या अंगणात पूर्वी सकाळी पुरुष व संध्याकाळी महिला असा रितसर बॅडमिंटन क्लब चालत असे . भगिनीवर्गात त्या बॅडमिंटनही खेळायच्या . पत्ते आणि क्रिकेटची मॅच बघणे हे आवडीचे खेळ. मनोरंजनासाठी पेपर वाचन , शब्दकोडे - सुडोकू सोडवणे , चायनीज कोडे , अवांतर वैचारिक वाचन , टिव्ही , इत्यादी गोष्टी आवडायच्या .
या व्यतिरिक्त शिवण , वीणकाम , या गोष्टींवर सफाई होती . दोन सुयांवरील वीणकामात विशेष गती होती . लोकर आणून दिल्या पासून अगदी कमी कालावधीत सेट तयार होत असे .
माझे सासरे जिल्हा होमगार्ड कमांडंट होते . त्या सहयोगातून होमगार्ड संघटनेतही त्यांचे योगदान होते . अलिबाग नगरपालिकेच्या त्या सदस्यही होत्या . हौशी नाटकां मधूनही त्यांनी काम केले होते . शाळा , भजनी मंडळ , ट्रॅव्हल कंपनीच्या माध्यमातून जवळजवळ भारतभ्रमण झाले होते .चारधाम , नर्मदा परिक्रमा , काशीयात्रा या विशेष पण कठीण अशा यात्रांचा योगही त्यांनी साधला होता. योग्य ठिकाणी दानधर्म करण्याची त्यांना आवड होती .
निवृत्तीनंतर विशेष करुन त्यांनी गाण्याचे क्लास , दत्तमंदिर सेवा , वीणा भजनी मंडळ यात स्वत:ला गुंतवून घेतले होते . रोजच्या जीवनातलं त्यांचं वागण म्हणजे जणू पाण्यातलं लोणीच ! पाण्यापासून अलिप्त पण तुम्ही स्पर्श केलात तर मधुर चव मिळेल .निरलसपणे कसं जगावं , कशातही अवास्तव न गुंतता कसं रहावं , अविचार नाही आणि अति विचार नाही याचा त्या वस्तूपाठ होत्या .
कौटुंबिक पातळीवर नातवंडे / पणतवंडे यांच्या सहवासाने त्या समृद्ध होत्या .
ईश्वर आणि ईश्वरी योजना यावर त्यांचा गाढ विश्वास होता . गेले काही महिने श्वसनाच्या विकाराने त्यांना हैराण केले होते. दोन महिन्यांपूर्वी माझ्याकडून कॅलेंडर घेउन आषाढी एकादशी कधी आहे ते पाहिले होते . अजून त्यांनी काय हेरलं होतं कळायला मार्ग नाही . पण दिवसेंदिवस प्रकृती खालावत होती व औषधोपचारांचा म्हणावा तसा फायदा दिसत नव्हता .
२१ ऑगस्टला माझ्याकडे मंगळागौरीचा कार्यक्रम होता . त्या आधी आठवडाभर त्यांनी मला व माझ्या मिस्टरांना २१ ता.चा कार्यक्रम पुढे ढकलावा असं सूचित केलं . त्याप्रमाणे आम्ही पूर्वनियोजित कार्यक्रमाचे स्वरुप बदलून अगदी घरगुती स्वरूपात करायच ठरवलं . पण आत्तापर्यंतच्या दुखण्यां मधे त्यांनी दाखवलेली उमेद आता कमी पडत्ये हे जाणवत होतं . नकारात्मक विचार दिसू लागले होते.
जन्मत:च घेउन आलेले 'सुधा'मृत सु ' मती ' ने आतापर्यंत अनेकांना देउन झाले होते .
आता मोक्षाची आस लागली होती. गेल्या आठ दिवसांपासूनच त्यांनी भैरवीसाठी तानपुरा लावायला घेतला होता . आम्ही त्यांना त्यापासून परावृत्त करण्याचा निष्फळ प्रयत्न करत होतो पण त्यांनी मनातून वेळ निश्चित करून ठेवली असावी . २१ ऑगस्टच्या मध्यरात्रीच त्यांनी भैरवी आळवायला सुरुवात केली ती २२ तारखेच्या सूर्योदयानंतर मैफिल संपली .
कैवल्याच्या चांदण्याला आसुसलेला चकोर " चंद्र व्हा हो पांडुरंगा " म्हणत श्रावण शु . एकादशीला कैवल्यधामाकडे मार्गस्थ झाला .
ईश्वरेच्छा बलियेसी !!!
प्रणाम !!!
©️स्वाती लेले
अलिबाग .
मो . 9923885500
No comments:
Post a Comment