हो ssss ली हो....
होळी , शिमगा आणि कोकण याच्या अनेक रंजक गोष्टी लहानपणापासून ऐकल्या , वाचल्या होत्या पण अनुभवलेल्या नव्हत्या. तसं काही कारणही नव्हतं म्हणा ! मनात सुप्त इच्छा होती एवढीच ! इथे कोकण म्हणजे प्रामुख्याने रत्नागिरी असं समजायचं बरं का ! श्री देव भैरी बुवा , गावाच्या बारा वाड्या आणि समस्त रत्नागिरीकर यांचं एक वेगळं नातं आहे. मुंबईतला चाकरमानी सगळं काही बासनात बांधून ठेवून होळीला रत्नागिरीत हजर होणारच. माझ्या धाकट्या सुनेचं माहेर रत्नागिरीचं असल्यामुळे या वर्षी आम्हाला ही होळी जवळून पाहण्याचा आणि तो माहोल अनुभवण्याचा योग आला.
श्री देव भैरी व देवी जोगेश्वरी ( जुगाई ) यांची भेट हा सर्व उत्सवातला प्रमुख गाभा आहे . श्री देव भैरी बुवा हा सगळ्या गावाचं रक्षण करतो , आपल्या भक्तांच्या अडचणींचं निवारण करतो अशी सर्व ग्रामस्थांची गाढ श्रद्धा आहे. होळीच्या दिवशी रात्री बारा वाजता श्री देव भैरीची पालखी मोठ्या दिमाखात निघते. पालखी फुलं , हार यांनी सजवलेली असते.
होळीच्या दिवशी सकाळी श्री देव भैरीची मूर्ती पालखीत ठेवण्यात येते. मूर्ती सोन्याची असून सुंदर सजवलेली असते. त्याला रूपं लावणं म्हणतात. या श्री भैरीला वेगवेगळ्या गावातून पालख्या येतात. काही भैरीच्या असतात तर काही जुगाईच्या असतात. रात्री या वेगवेगळ्या पालख्यांची वाटेत प्रेमाची भेट होते. ढोल ताशा च्या तालावर धुंद होऊन भाविक या पालख्या पुढे नेतात. भैरी व जुगाई हे पती पत्नी आहेत असा समज आहे. गावात असलेल्या जुगाईला भैरी वर्षभराने होळी पौर्णिमेला भेटायला जातो. तिथे ही पालखी २/३ तास थांबते. यावेळी भाविकांना दर्शन घ्यायला परवानगी नसते. पहाटे परत ही पालखी उठते व दुतर्फा उभ्य असलेल्या सुवासिनींकडून पूजा , आरती , मान घेऊन बारा वाड्यांचा मान घेऊन दुपारपर्यंत सहाणेवर जाऊन थांबते. दुसरीकडे होळीचं प्रतिक म्हणून सुरमाड तोडण्याची तयारी चालू असते. तो तोडणे , त्यानंतर तो सर्व गावकऱ्यांनी वाहून नेणे या साठी वेगवेगळ्या ज्ञातींचे मानकरी ठरलेले आहेत. हे सर्व काम जोखमीचे असते. पण सर्व ग्रामस्थ ते प्राणपणाने व मोठ्या श्रद्धेने ते पार पाडतात. तोडलेला सुरमाड म्हणजेच होळी ठरलेल्या मार्गावरून मिरवत सहाणेवर नेऊन उभा करतात. पहाटे परत ही पालखी जुगाईच्या (जोगेश्वरीच्या)देवळातून निघून तिच्या ठरलेल्या मार्गाने ढोल ताशांच्या गजरात मार्गात दुतर्फा पूजा आरती घेवून उभ्या असलेल्या सुवासिनींकडील मान घेवून ज्या ठिकाणी होळी असते तेथे येते.व होळी(सुरमाड)उतरे पर्यत तिथेच थांबते.सुरमाड उतरल्यानंतर(तोडल्यानंतर)तो सर्व ग्रामस्थ मिळून सहाणेपर्यंत उचलून नेतात.या होळीसोबतच पालखी सहाणेवर येवून स्थानापन्न होते.मग उचलून आणलेली सुरमाडाची होळी सहाणेसमोर उभी करतात. धुलीवंदनाच्या दिवशी पालखी सहाणेवर बसते ती रंगपंचमीच्या दिवशी ऊठून ठरलेल्या मार्गाने रंग खेळत आपल्या मंदिरात जाते.मात्र सहाणेवर उभी केलेली होळी ही गुढीपाडव्याला ढोलताशांच्या गजरात उतरवली (तोडली) जाते. इथे प्रत्यक्ष होळीचा होम हा त्या सुरमाडा शेजारी थोड्या प्रमाणात करण्याची प्रथा आहे.
एकूणच या सणात ग्रामस्थांचा एकोपा , श्री देव भैरी वर असलेली परम श्रद्धा , आणि हा उत्सव साजरा करण्यासाठी जीवाचं रान करायची सर्वांची तयारी दिसून येते. समस्त रत्नागिरी आणि पंचक्रोशीतील सर्व गावे शिमगामय झालेली असतात. काही गावांमध्ये श्री देव भैरीच्या पालखी बरोबर शंकासूर नाचवण्याची प्रथा आहे. होळीच्या वेळी घातलेल्या फाका हा स्थानिक संस्कृतीचा महत्त्वाचा घटक आहे.
त्याच प्रमाणे दापोली , खेड , मंडणगड या भागात शिमग्याची सोंगे दिसून येतात. यात शंकासूराची भूमिका महत्त्वाची असते. काळ्या कपड्यातला शंकासूर भितीदर्शक आकर्षणाचा भाग असतो. लांजा ,राजापुर रत्नागिरी येथे खेळे खेळले जातात. एखादी पौराणिक कथा घेऊन त्यावर स्थानिक कवि काव्य करून नाट्यरूपात सादर केली जाते. स्त्री पात्रे पुरुष च रंगवतात. संस्कृतीची ही सारी रुपं मजेशीर असतात.
तसं पाहिलं तर प्रत्येक उत्सव आपापली खासियत जपतच असतो. . पण होळीच्या पुरणपोळीच्या पुरणाचा गोडवा , आणि मऊसूतपणा हा जेव्हा मानवी नातेसंबंध आणि संस्कृती जपण्यात उतरतो तेव्हा तो सण , सण न राहता संस्कृतीचा मापदंड बनतो.
©️ स्वाती लेले, अलिबाग.
swatilele31@gmail.com.
No comments:
Post a Comment