शुभ मंगल (अति ) सावधान......
विवाह हा खरं तर हिंदूंच्या सोळा संस्कारांपैकी एक संस्कार ! हिंदू धर्म शास्त्राप्रमाणे विवाहाचे एकूण आठ प्रकार आहेत . आज सर्वसाधारणपणे जी पध्दत प्रचलित आहे ती त्यापैकी ब्राह्म विवाह या पध्दतीतून निर्माण झाली आहे . वेदांना अपेक्षित विवाह म्हणजे शारिरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम स्त्री व पुरूष यांनी एकत्र येउन विशिष्ट समाजाचे , कुळाचे , संस्कारांचे वहन करणे म्हणजेच पुढे नेणे. यात सहचर्य , सहजीवन, प्रेम , त्याग ,कर्तव्य हेही अपेक्षित असल्यामुळे विवाह हा केवळ " करार " नसून नव्या सक्षम प्रजेच्या उत्पत्तीसाठी समाजमान्यता मिळालेला तो एक " संस्कार " आहे .
असं म्हटलं जातं की लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात.
पण हे झालं बाबा आदम च्या काळातलं विधान ! स्वर्ग ते पृथ्वी इतका प्रवास करताना या गाठी खिळखिळ्या होतात की काय असं वाटावं अशी सध्या परिस्थिती आहे ." विवाह " या विषयाला अनेक कंगोरे आहेत आणि सर्वच गोष्टींचा उहापोह करणे इथे शक्यही होणार नाही . त्यामुळे लग्न जमण्याच्या प्रकीयेतील अडचणी हा या लेखाचा केंद्रबिंदू आहे .माझा वकीलीचा व्यवसाय , समाजकार्य , माझ्या स्वत:च्या तसंच नातेवाईक ,मित्रपरिवारातल्या मुलां मुलींच्या लग्नाच्या वेळचे अनुभव हे या लेखाचे स्फूर्तिस्थान आहे .
कोणत्याही काळात कोणत्याही प्रांतात लग्न किंवा विवाह हा मुला मुलीं इतकाच कुटुंबातल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे . असं जरी असलं तरी सध्याच्या काळात लग्न आणि त्या संबंधी अनेक गोष्टींचे आयाम बदलले आहेत . अर्थात बदलत्या सामाजिक परिस्थितीचा हा परिणाम असावा . आणि सामाजिक परिस्थिती काही एका दिवसात बदलत नाही . अनेक स्थित्यंतरांचा तो परिपाक असतो . लग्न जमणे / जमवणे ही एक प्रक्रिया आहे . पति - पत्नीचं नातं विवाहाच्या संस्काराने पक्कं होतं . साधारण ६०/७० वर्षांपूर्वी टिपण चांगलं जुळतय या निकषावर लग्न ठरत असे . या प्रकारात मुला मुलीची पसंती दुय्यम असे .ज्येष्ठ लोक घराण्याची माहिती काढत व त्यांच्या निकषांनुसार लग्नाची गाडी पुढे सरकत असे .३०/३५ वर्षांपूर्वी पत्रिके बरोबर मुला - मुलीच्या फोटोचीही देवाण घेवाण होऊ लागली . पत्रिके इतकच व्यक्तीचे प्राथमिक दिसणेही महत्वाचे आहे असे वाटू लागले . थोडीफार कुटुंबाची रुपरेषा माहिती करुन घेणे व एकमेक कुटुंब एकमेकांना तोलामोलाची आहेत की नाहीत हे पहात असतानाच गुप्तपणे कुटुंबाची माहिती काढणे, वगैरे सुरक्षापट्ट्यांचा उपयोग करणं सुरू झालं . या सगळ्यात थोडी खेळीमेळी आणण्यासाठी " कांदेपोहे " कार्यक्रमही सुरू झाला . " कांदेपोहे " नी लग्नाच्या मार्केटमधे बऱ्यापैकी जम बसवला होता . काळाच्या ओघात आता " कांदेपोहे " ची गाडी सीसीडी / बरिस्ताच्या स्थानकापर्यंत येउन पोचली आहे . एखाद्या ठिकाणी ते उपलब्ध नसेल तर मग एखाद निवांत रेस्टॉरंटही चालत . कांदेपोह्यात गुदमरलेल्या मुला / मुलींच्या गप्पा या नविन वातावरणात खुल्या दिलाने होऊ लागल्या . तो पर्यंत दोन्ही कडचे पालक पत्रिका जुळवून सज्ज असतात. आता त्यांना बाहेर भेटायला गेलेल्या मुलाकडून / मुलीकडून काय होरा येईल याची आस लागलेली असते . पहिल्याच भेटीत सकारात्मक चित्र दिसण्याचे भाग्य फार थोड्या कुटुंबांच्या बाबतीत दिसतं . सुरुवातीच्या काही भेटी नकारघंटा वाजवण्यात जाऊ लागल्या की दोन्ही कडची कुटुंब , आपापल्या मुला / मुलीची समजूत काढतात की इतक्या काय फटी काढायच्या , हे आधी कळत नव्हतं का ? किंवा हे सांगून मगच पत्रिका दिली होती - भेटायच्या आधी विचार करायचा वगैरे वगैरे. या आणि अशा प्रसंगांची पुनरावृत्ती व्हायला लागली व ती खूप काळ टिकून राहायला लागली की दोन्ही बाजूची उद्वीग्नता वाढायला लागते आणि आपल्यात काय कमी आहे पासून आपल्यात किती काय काय वरचढ आहे याची यादी करणं सुरू होतं . आणि इथेच frustration ला सुरूवात होते . याचं खोलात जाऊन कारण शोधलं तर मुलांचा ( इथे मुलीही अध्यारुत आहेत ) पालकांशी सुसंवाद नाही हेच दिसून येतं . बरेच वेळा पालकांचा थोडा दबावही कारणीभूत असतो .
लग्न जुळवण्याच्या प्रक्रियेतील अडथळे :-
१) वय - आज काल लग्नाचे वय ३० च्या जवळपास येउन ठेपलय .३०/३५ वर्षांपूर्वी तिशीतल्या जोडप्याला निदान एक मूल झालेलं असायचं . काय गैर होतं त्यात ? सर्वसाधारणपणे दोघेही पदवीधर असायचे , ( काही कुटुंबात पालकही पदवीधर असत )दोघांचीही नोकरी किंवा एकाचा उद्योग/व्यवसाय असायचा , थोड्या मौजमजेनंतर यथावकाश मूल होत असे. आता जी पिढी ६०-६५ च्या दरम्यान आहे ती बरीचशी जबाबदारीतून मुक्त आहे . काहींनी लग्नानंतरही स्वतःचे शिक्षण पूर्ण केले अथवा वाढवले व स्वत:ला परिपक्व केलं . नविन टेक्नॉलॉजीही गरजेनुसार शिकून घेतली.
पण आजकाल मुलगा किंवा मुलगी कोणालाही स्वखुशीने लवकर लग्न करायच नसतं . ठराविक वयानंतर मतं जास्त ठाम होत जातात , नोकरी/व्यवसायातील आव्हानं साद घालतात, ती पुरी करताना दमछाक होते पण ती शेअर करायला आता आई वडील कमी वाटू लागतात , एकीकडे लग्न ठरत नसल्याची चिडचिड आणि मग frustration वाढीला लागतं . अरे माझ्यात सर्व चांगल्या क्वालिटीज आहेत मग माझ लग्न का ठरत नाही ? असंच प्रत्येकाला वाटत असतं . वाढतं वय हा एक प्रमुख अडथळा आहे . हे झालं स्वेच्छेने लग्न पुढे ढकललेल्या मुलांबाबत .! पण काही मुलां/मुलींचे त्यांची चूक नसताना अकारण वय वाढते उदा : मुलाला गलेलठ्ठ पगाराची नोकरी नसणे , मुलगा महानगर सोडून अन्य गावात अथवा शहरात रहात असेल , मुलावर आई वडिल किंवा अन्य जबाबदारी असेल , मुलगी एकुलती एक असेल , मुलीच्या नोकरीच्या शिफ्ट डुट्या असतील , मुलीवर काही जबाबदारी असेल तर त्यांची लग्न ठरण्यातही अडचणी येतात .
वयातलं अंतरही खूप कमी म्हणजे दोघे बरोबरीचे हवे असतात .
२) उत्पन्न - बाकी सगळ्या बाबतीत समानतेचे वारे वहात असताना मुलीना मुलाचा पगार मात्र आपल्यापेक्षा जास्त हवा असतो . पण मग वयात अंतर अगदी कमी हवे . दोघेही जर बरोबरीचेच असतील आणि शिक्षण पण समान पध्दतीचं असेल तर मुलाला वरचढ पगार कसा असेल .? त्याच प्रमाणे मुलगीही शक्यतो वरचढ पगाराची नको असते .
३५/४० वर्षांपूर्वी अशी किती तरी जोडपी मी पाहिल्येत ( आमची वरची पिढी )की पत्नीचं शिक्षण किंवा कमाई पतीपेक्षा लौकिकार्थाने वरचढ असे . पण त्यांच्या संसारात या गोष्टीमुळे काही वादंग झाला असं फारसं कधी ऐकिवात नाही . हां ! नियमाला अपवाद असतोच .
३) रहाण्याचं ठिकाण ( अर्थात मुलाचं ): मुलाचं रहातं ठिकाण हा आजकाल खूप महत्वाचा मुद्दा ठरत चालला आहे . मोठ्या शहरांचा विचार केला तर मुलींच्या नोकरी व माहेरच ठिकाण या भोवती विचाराची सुई फिरते . निमशहरं किंवा गावांच्या ठिकाणी तर परिस्थिती अजूनच बिकट आहे कारण तिथे शहरीकरणाचा वारा पोचलेला नसतो . शहरातलं पोशाखी नोकझोकवालं वातावरण नसतं . एरवी वीकएन्ड साठी आवडणाऱ्या destinations ना अशावेळी फुल्ली मारली जाते . काहीवेळा मुलींच व तिच्या पालकांच बरोबरही असतं . तिचं शिक्षण , तिची नोकरी जर तेवढ्याच जबाबदारीची ( Hi profile )असेल तर तिच्या भविष्याकरता तिने लग्नानंतरही मोठ्या शहरात रहाणंच केव्हाही योग्य ! पण दर वेळीच अशी परिस्थिती नसते .मध्यम किंवा निमशहरां मधे तुलनेने स्वास्थ्य, रहाणीमानाचा दर्जा , सुरक्षित वातावरण जास्त चांगलं असतं .काही मुलींची प्रोफाइल सर्वसाधारण असते( अशी की ज्यांच शिक्षण, नोकरी विचारात घेता त्या कुठेही adjust होऊ शकतील )अशावेळी पालकांनी दुरदृष्टीने मुलीना समजवण्याची व आपण कुठे आहोत या बाबत आत्मनिरिक्षण करण्याची गरज आहे असं वाटतं . अस झाल तर लग्न ठरण्यातला विलंब कमी होईल. व योग्य वयात संसाराची गाडी सुरू होईल.
४) छंद, आवडी निवडी , विभक्त / एकत्र कुटुंब , कपडे वापरायच्या पध्दती , स्वत:ची स्पेस वगैरे - या प्रकाराबाबत मुलगे फार आग्रही असतात अस दिसत नाही. अगदीच वेगळ्या पध्दतीचं करिअर असेल तरच ते आग्रही असतात कारण त्या करिअरला सपोर्ट करणारी मुलगी असेल तर सहजीवन नक्कीच आनंदी होतं . मुलांना शक्यतो आई वडिलांसोबत रहाण्याची इच्छा असते . नविन मुली बरोबर संसार सुरू करताना एक माध्यम म्हणून किंवा मॉरल सपोर्ट म्हणून त्यांना ती मानसिक गरज वाटत असावी. काळाप्रमाणे, बदलत्या परिस्थितीनुसार मुलगे ही विभक्त रहायला तयार होतात . थोडी वाट पहायची तयारी हवी . आजकाल सुनांनी आधुनिक कपडे घालायला सासरच्या लोकांची सहसा ना नसते . प्रश्न असतो आपल्याला काय शोभतं आणि वेळप्रसंगी काय उचित दिसेल याचं भान त्यांनी राखणं गरजेच आहे .
५) स्वत:चं घर : साधारण १९८०-९० च्या दशकापर्यंत वडिलांच स्वत:चं घर असण हे उत्तम रहाणीमानाच लक्षण समजलं जायचं . आपली मुलगी तिथेच रहाणार आहे हे ही त्यात गृहीत असायचं . आज काल जर अरेंज मॅरेज असेल तर दाखवायच्या दिवशीच मुलीचे आईवडिल विचारतात हे घर वडिलांच्या नावावर आहे की अन्य कोणाच्या ? किंवा मुलाचं स्वत:चं घर आहे /फ्लॅट आहे का ? मुलाला भाऊ असतील तर ते सर्व एकत्र रहाणार का त्यांची वेगळी काही सोय आहे ? २८ ते ३०/३२ वयाच्या मुलाकडून जो कधी कधी मुली इतक्याच वयाचा व थोडफार तिच्या इतकाच कमावणारा असतो त्याच day one ला स्वत:च घर असण्याची अपेक्षा आपण कोणत्या गृहितकावर करतो ? आणि स्वताच घर असेलच तर मग ते लोनच्याच जोरावर घेण्याची शक्यता जास्त. म्हणजे लग्न झाल्यापासून आपली मुलगी कर्जाच्या छायेत जाईल हा व्यावहारिक विचार आजकाल होताना दिसत नाही. मुलाच घर /फ्लॅट ,गाडी , मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी , गलेलठ्ठ पगार हेच लग्नाच्या बाजारतलं आजच्या आदर्श लग्नाळु मुलाच चित्र आहे. बाकीचे प्रोफाईल हे लो प्रोफाईल समजण्याचा प्रघात बळावत चाललाय .
६) जबाबदारीच्या जाणीवेचा अभाव : आजकाल सर्वचजण मॅट्रिमोनी साईट्स वर मुला/मुलीचे प्रोफाइल अपलोड करतात . प्रोफाइल बघितल्यावर समोरच्या व्यक्तीशी संपर्क साधल्यावर योग्य वेळेत उत्तर देउन समोरच्याला मोकळं करणे कोणालाही महत्वाच वाटेनासं झालय . ही तक्रार दोन्ही कडची मंडळी करताना दिसतात. हे कशाचं द्योतक आहे ? जबाबदारीचा विसर पालक व पाल्य दोघांनाही पडतोय हेच यातून दिसतं .
७) सुसंवादाचा अभाव : जेव्हा मुलगा व मुलगी हॉटेलमधे भेटतात त्यावेळी दोघांपैकी कोणीतरी एक पालक किंवा नातेवाईकांच्या रेट्याला घाबरून किंवा योग्य संवादाचा अभाव असलेल्यामुळे मुलांच्या मनातल्या काही गोष्टी पालकांना माहिती नसताना भेट घडवून आणली जाते व त्यावेळी दोघांच्या प्रत्यक्ष भेटीत अशा काही गोष्टींचा उलगडा होतो की गाडी पुढे नेणं शक्यच नसतं . अशावेळी दोघांचाही वेळ , हॉटेलच बिल वाया , व निष्पन्न काही नाही अशी वेळ येते . अशा वेळा सुसंवादाने टाळता येउ शकतात.
ह्या आणि अशा अनेक छोट्या मोठ्या कारणांमुळे लग्न ठरण्याची प्रक्रिया सध्या लांबत चालली आहे . सगळ्याच गोष्टी सुरुवातीपासून चित्रातल्या चौकटीत बसवल्या सारख्या मिळत नाहीत हे पालकांनी व मुलां/मुलींनी समजून घ्यायला हवं . लौकिक सुखाची चौकट परिपूर्ण असावी ही इच्छा रास्त असली तरी वाट पहाण्याची समंजस सबूरीही हवी हे दोन्ही पालक व मुला/मुलींनी विसरून चालणार नाही . " हे लग्नाच्या आधीच सांगितल होतं मग आता असं कसं म्हणता ? तेव्हा तुम्ही अस अस म्हणला होतात वगैरे वगैरे .... " असा कडक करारातला सूर लावणं योग्य नाही . यामुळे नात्याची वीण घट्ट होण्याऐवजी सैलावते व त्यामुळेच कुटुंबसंस्था धोक्यात येते . कोणत्याही गोष्टीची खात्री ही आधी करुन मगच पुढे जाणं केव्हाही योग्य .
माझ्या वकिली व्यवसायात गेल्या २८ वर्षात कौटुंबिक केसेसचे अनेक वेगवेगळे नमुने बघायला मिळाले . काही ठिकाणी खरोखरच अन्याय झालेला असतो तर काही ठिकाणी अन्यायाचा बेमालूम आभास तयार केलेला असतो .
कुटुंबसंस्थेशी निगडीत बरेच कायदे सध्या महिलांच्या बाजूने आहेत. त्यांच्यासाठी ते सध्या दुधारी शस्त्र ठरतय . लग्न करायच ,जरा काही पटल नाही की नवऱ्यावर कोर्टात केस घालायची की कोणत्या ना कोणत्या कायद्याखाली पोटगी लागू होतेच . नवऱ्याला हे टाळायच असेल तर उगती पोटगी देणे हाच पर्याय उरतो . कुठूनही नवऱ्याच्या खिशाला भगदाड आहेच .
व्यवसायाचा भाग म्हणून आणि कुटुंबसंस्था टिकायला हवी यावर विश्वास असल्याने मी समुपदेशनही करते . १५/२० वर्षापूर्वी नवरा बायकोच्या भांडणांमधे साधारणपणे ६० ते ७० % तडजोडी खूप प्रयत्नांअंती का होईना यशस्वी होत असत . कितीतरी टोकाच्या भूमिकांमधेही मी यशस्वी तडजोडी करुन संसार नांदते करुन दिले आहेत . पण गेल्या ५/७ वर्षात तडजोड करणे , १/२ पावलं दोघांनीही मागे येणे , वेगळ्या पर्यायांचा विचार करणे हे होत नाही . दोघेही आपापले पक्के विचार घेउन आलेले असतात व त्यात त्यांना जराही बदल करायची इच्छा नसते . आपण तडजोड घडवून आणायला कमी पडलो या पेक्षा त्यांना सहजीवन , साहचर्य , एकमेकांसाठी सोसणं , काही गोष्टींचा त्याग करणं , काही सोडून देणं या भावना कळत नाहीत किंबहुना त्या कळून घ्यायची इच्छाही नाही याचं दु:ख होतं . संसार हा उभयतांच्या राग , लोभ, प्रेम , त्याग , समंजसपणा , यावर चालतो ५/१० अटींच्या करारावर नाही चालत हे या मंडळीना समजावायला हवं . अति चिकित्सा , काटेकोरपणा ,सावधानता कधी कधी घातक ठरू शकते . आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगाना तोंड देण्याचं सामर्थ्य आपण आपल्या पाल्याला दिलय याबाबत पालकांना विश्वास हवा . मुलींच्या बाबतीत मुलगा बघताना ज्या फूटपट्ट्या असतात त्या त्यांचा मुलगा लग्नाच्या बाजारात उतरतो तेव्हा बदललेल्या असतात. हे ही योग्य नाही .
अर्थात नियमाला अपवादही असतात. पण त्यांच प्रमाण अगदी नगण्य आहे . काही लोक अर्थात दोन्हीकडचे खूपच मृदू , प्रॅक्टिकल विचारांचे, ऋजू मानसिकतेचेआणि समंजस असतात.
शिक्षणाच प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे पण त्याबरोबर पालकांमधल व लग्नाच्या मुला / मुलींमधल्या सजगतेचं , समंजसपणाचं, स्वत:चा आवाका , कुवत ओळखण्याचं ,सुखाचे मापदंड डोळसपणे बघण्याचं, प्रमाणही वाढायला हवं , तरच लग्न जमवणं हा केवळ एक उपचार न रहाता ( म्हणजे ठरलं बाबा एकदाचं ही भावना न रहाता ) भावी पती पत्नी साठी संस्कारक्षम " विवाह " ठरेल .
आणि घटस्फोटांचं वाढतं प्रमाण आटोक्यात येईल व कुटुंबसंस्था अबाधित राहिल .
ॲड . स्वाती लेले ,
अलिबाग - रायगड
swatilele31@gmail.com
हा लेख पुणे प्रतिष्ठान च्या २०१८ च्या " शुभलग्न विशेषांक " या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला होता.
हा लेख पुणे प्रतिष्ठान च्या २०१८ च्या " शुभलग्न विशेषांक " या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला होता.

No comments:
Post a Comment